पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 24 JUL 2025 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2025


पंतप्रधान  स्टार्मर

मित्रांनो,

नमस्कार!

सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या  स्नेहपूर्ण  स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या  संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.

हा करार केवळ आर्थिक भागीदारी नाही तर सामायिक समृद्धीची योजना आहे. एकीकडे भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, सागरी खाद्य आणि अभियांत्रिकी वस्तूंना युकेमध्ये चांगली बाजारपेठ मिळेल. भारतातील कृषी उत्पादने आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी युकेच्या बाजारपेठेत नवीन संधी निर्माण होतील. हा करार भारतातील तरुण, शेतकरी, मच्छिमार आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेषत्वाने लाभदायक ठरेल.

तर दुसरीकडे वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस   पार्ट यासारखी युके-निर्मित उत्पादने भारतातील लोकांना आणि उद्योगांना सुलभ आणि परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध होऊ शकतील.

या करारासोबतच, दुहेरी योगदान करारावरही सहमती झाली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सेवा क्षेत्रांना, विशेषतः तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रांना नवीन ऊर्जा मिळेल. व्यवसाय सुलभतेला गती मिळेल. व्यवसाय करण्याचा खर्च कमी होईल आणि व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास वाढेल. याव्यतिरिक्त, युकेच्या अर्थव्यवस्थेला कौशल्यपूर्ण भारतीय प्रतिभा लाभेल.

या करारांमुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. एवढेच नाही तर दोन लोकशाही देश आणि जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील हा करार जागतिक स्थैर्य आणि समृद्धीला देखील बळकटी देईल.

मित्रांनो,

पुढील दशकात आपल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीला नवीन गती आणि ऊर्जा देण्यासाठी व्हिजन 2035 जाहीर केले जात आहे. हे तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान, शिक्षण आणि जनते -जनतेमधील संपर्क या क्षेत्रांसाठी मजबूत, विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी भागीदारीचा पथदर्शक  आराखडा तयार करेल.

संरक्षण आणि सुरक्षेतील भागीदारीसाठी संरक्षण औद्योगिक पथदर्शक आराखडा तयार करण्यात आला आहे. आपल्या तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमांना अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अत्यावश्यक खनिजापर्यंत, सेमीकंडक्टर्सपासून सायबर सुरक्षेपर्यंत, आपण एकत्रितपणे भविष्य घडवू ही आमची वचनबद्धता आहे.

मित्रांनो,

शिक्षणाच्या क्षेत्रातही दोन्ही देश एकत्र येऊन एक नवा अध्याय लिहित आहेत. युकेमधील 6 विद्यापीठे भारतात आपले  संकुल उघडत आहेत. गेल्या आठवड्यातच, भारतातील गुरुग्राममध्ये साउथ हॅम्प्टन विद्यापीठाच्या संकुलाचे उद्घाटन झाले.

मित्रांनो, 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान स्टार्मर आणि त्यांच्या सरकारप्रति आभार व्यक्त करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी धोरणाला  कोणतेही स्थान नाही यावर आम्ही सहमत आहोत. कट्टर  विचारधारेच्या शक्तींना   लोकशाही स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू दिला जाऊ शकत नाही, यावरही आम्ही सहमत आहोत.

जे कोणी लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर करून लोकशाहीचाच ऱ्हास करण्याचा प्रयत्न करतात त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. 

आर्थिक घोटाळ्याशी संबंधित गुन्हेगारांचे प्रत्यर्पण करण्याबाबत आमच्या संस्था सहयोग आणि समन्वयाने काम करत राहतील. 

मित्रांनो, 

भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता  आणि स्थैर्य , युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष, तसेच पश्चिम आशिया क्षेत्राच्या स्थितीवर आम्ही आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवत आहोत. या क्षेत्रात लवकरात लवकर शांतता  आणि स्थैर्य बहाल व्हावे , याचे आम्ही समर्थन करतो. सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता याचा सन्मान करणे आवश्यक आहे. विस्तारवाद नव्हे  तर विकासवाद ही आजच्या युगाची गरज आहे.

मित्रांनो, 

मागच्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांमध्ये यूकेचे नागरिक असलेल्या अनेक बंधू भगिनींचा समावेश होता. त्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो. 

यूकेमध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक आपल्या संबंधांमध्ये एक प्रकारे सजीव सेतूचे काम करतात. ते भारतातून केवळ खाद्यसंस्कृती घेऊन आले नाहीत तर त्यांनी सृजन, वचनबद्धता आणि चरित्र्य देखील सोबत आणले आहे. या लोकांचे योगदान केवळ यूकेच्या समृद्ध अर्थव्यवस्थेपर्यंत सीमित नाही तर यूकेची संस्कृती, क्रीडा आणि नागरी प्रशासनात देखील त्यांनी योगदान दिले आहे. 

मित्रांनो, 

जेव्हा भारत आणि यूके भेटले आहेत   आणि तेही क्रिकेटच्या कसोटी सामना मालिकेत, अशावेळी क्रिकेटचा उल्लेख तर केलाच पाहिजे. 

दोन्ही राष्ट्रांसाठी क्रिकेट हा केवळ एक क्रीडा प्रकार नसून ती अतिशय  आवड आहे  आणि त्याचबरोबर आपल्या भागीदारीचे  एक सुंदर रुपकही आहे. कधीकधी स्विंग होतात पण आपण नेहमी स्ट्रेट बॅटने खेळतो! आपण एक मजबूत आणि उच्चांकी भागीदारी उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

आज करण्यात आलेले  करार तसेच व्हिजन -2035 हीच भावना पुढे नेणारे  महत्त्वाचे  टप्पे  आहेत. 

पंतप्रधान जी, 

मी पुन्हा एकदा आपल्या आतिथ्यासाठी आभार व्यक्त करतो. 

मी आपल्याला भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण देतो आणि आशा करतो की भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी आम्हाला लवकरच मिळेल. 

खूप खूप धन्यवाद!

 
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2148095)