पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन


आज संपूर्ण जग विकसित भारताच्या आपल्या संकल्पावर चर्चा करत आहे, ज्यामध्ये विशेषतः पायाभूत सुविधांमधील बदल प्रतिबिंबित होत असून, विकसित भारताची इमारत या पायावर उभारली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

आम्ही एक राष्ट्र, एक गॅस ग्रिड या दृष्टिकोनावर काम केले असून, प्रधानमंत्री ऊर्जा गंगा परियोजनेची निर्मिती केली आहे : पंतप्रधान

आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारत साकारायचा असून, विकासाद्वारे सक्षमीकरण, रोजगाराद्वारे आत्मनिर्भरता आणि प्रतिसादाद्वारे सुशासन, हा आपला मार्ग आहे : पंतप्रधान

Posted On: 18 JUL 2025 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्टील सिटी म्हणून ओळखले जाणारे दुर्गापूर हे भारताच्या श्रम शक्तीचे प्रमुख केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. या शहराने भारताच्या विकासात दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन, ही भूमिका आणखी बळकट करण्याची आज संधी असल्याचे ते म्हणाले. आज सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील कनेक्टिविटी वाढेल आणि गॅस-आधारित वाहतूक आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच स्टील सिटी म्हणून दुर्गापूरची ओळख आणखी मजबूत होईल, यावर मोदी यांनी भर दिला. हे प्रकल्प 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेशी सुसंगत असून पश्चिम बंगालला पुढे न्यायला सहाय्य करतील, असे पंतप्रधान म्हणाले. या भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी सांगितले की आज जागतिक चर्चा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पाभोवती फिरते. त्यांनी याचे श्रेय भारतात होत असलेल्या परिवर्तनात्मक बदलांना दिले, जे विकसित भारताचा पाया रचत आहेत. या बदलांचा एक प्रमुख पैलू म्हणजे सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा समावेश, हा आहे यावर भर देऊन, मोदी यांनी महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला: गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक पक्की घरे, कोट्यावधी शौचालये, 12 कोटींहून अधिक नळजोडण्या, हजारो किलोमीटरचे नवे रस्ते आणि महामार्ग, नवीन रेल्वे मार्ग, लहान शहरांमध्ये विमानतळे, आणि प्रत्येक गाव आणि घरापर्यंत व्यापक इंटरनेट सुविधा. या आधुनिक पायाभूत सुविधांचा फायदा पश्चिम बंगालसह प्रत्येक राज्याला होत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील रेल्वे कनेक्टिविटीमधील अभूतपूर्व प्रगतीचा उल्लेख केला आणि सांगितले की, पश्चिम बंगाल हे मोठ्या संख्येने वंदे भारत रेल्वे गाड्या चालवणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. कोलकाता मेट्रोचा झपाट्याने होणारा विस्तार आणि नवीन रेल्वे मार्ग, रुळ दुहेरीकरण आणि विद्युतीकरणावर सुरू असलेल्या कामावर त्यांनी प्रकाश टाकला.अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे तसेच मोठ्या संख्येने रेल्वे उड्डाणपूल बांधले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून दिली. पश्चिम बंगालमध्ये आज आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रयत्नांमुळे इथल्या  लोकांच्या जीवनमानात मोठी सुलभता येईल असे ते म्हणाले. 

या प्रदेशातील विमानतळ उडान या योजनेशी जोडले गेले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. केवळ गेल्या एका वर्षात 5 लाखांपेक्षा जास्त  प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.  अशा पायाभूत सुविधांमुळे सोयी उपलब्ध होतात त्याबरोबरच हजारो तरुणांसाठी रोजगारही निर्माण होतो ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेतूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

गेल्या 10-11 वर्षांत भारताने घरगुती वापराच्या गॅस जोडणीत लक्षणीय प्रगती केली आहे असे ते म्हणाले. गेल्या दशकभरात देशभरातील घरा-घरांपर्यंत एल.पी.जी. ची जोडणी पोहोचली आहे आणि अवघ्या जगाने याची दखल घेतली आहे असे ते म्हणाले. एक राष्ट्र, एक गॅस ग्रिड  या दृष्टिकोनातून केंद्र सरकार काम करत असून, या अनुषंगानेच प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमांतर्गत, पश्चिम बंगालसह पूर्वेकडील सहा राज्यांमध्ये गॅस पाइपलाइन टाकल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या राज्यांमधील उद्योगांना आणि घरांना परवडणाऱ्या दरात पाइप गॅस उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गॅसच्या उपलब्धतेमुळे वाहने सी.एन.जी. वर चालू शकतील आणि उद्योगांना गॅस-आधारित तंत्रज्ञानाचा अवलंबही करता येईल, असे ते म्हणाले. दुर्गापूरचा औद्योगिक प्रदेश आता राष्ट्रीय गॅस ग्रिडचा भाग बनला असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. या प्रकल्पाचा लाभ या भागातील उद्योगांना मिळेल आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 30 लाख घरांना परवडणाऱ्या दरात पाइप गॅसची सुविधा मिळेल, असे त्यांनी सांगितले. यामुळे लाखो कुटुंबांचे, विशेषतः माता आणि भगिनींचे जीवन  सुकर होईल आणि हजारो रोजगार निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दुर्गापूर आणि रघुनाथपूर मधील प्रमुख पोलाद  आणि ऊर्जा प्रकल्पांचे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अद्ययावितीकरण केले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. या प्रकल्पांतर्गत सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प आता अधिक कार्यक्षम झाले आहेत आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनले आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. हे  प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे विशेष अभिनंदनही केले.

भारतातील कारखाने असोत वा शेती प्रत्येक ठिकाणी होत असलेले प्रयत्न 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाने प्रेरित असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विकासाच्या माध्यमातून सक्षमीकरण, रोजगाराद्वारे आत्मनिर्भरता आणि प्रतिसादशीलतेद्वारे सुशासन या दिशेनेच सरकारची पुढची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या मूल्यांचे पालन करून पश्चिम बंगालला भारताच्या विकासाच्या वाटचालीचे एक मजबूत इंजिन बनवले जाईल, अशी ग्वाही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. 

या कार्यक्रमात पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस, केंद्रीय मंत्री  हरदीप सिंग पुरी, शंतनू ठाकूर, डॉ. सुकांता मजुमदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी यावेळी तेल आणि वायू, वीज, रस्ते आणि रेल्वे क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले.

या प्रदेशातील तेल आणि वायू पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यातील सुमारे 1,950 कोटी रुपये खर्चाच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) शहर गॅस वितरण (सीजीडी) प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे घरे, व्यावसायिक संस्था आणि औद्योगिक वसाहतीतील ग्राहकांना पीएनजी कनेक्शन्स मिळतील आणि किरकोळ दुकानांमध्ये सीएनजी उपलब्ध होईल आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

पंतप्रधानांनी यावेळी दुर्गापूर-हल्दिया नैसर्गिक वायू पाईपलाईनचा दुर्गापूर ते कोलकाता विभाग (132 किमी) राष्ट्राला समर्पित केला. हा भाग महत्वाकांक्षी जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा पाईपलाईनचा भाग असून, त्याला प्रधानमंत्री ऊर्जा गंगा (पीएमयूजी) प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते.1,190 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा  हा प्रकल्प दुर्गापूर ते कोलकाता विभाग पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान, हुगळी आणि नादिया जिल्ह्यांमधून जात आहे. या पाईपलाईनच्या अंमलबजावणी मुळे येथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे आणि आता त्यामुळे या प्रदेशातील लाखो घरांना नैसर्गिक वायूचा सुलभ पुरवठा होईल.

स्वच्छ हवा आणि सर्वांसाठी आरोग्य सुरक्षेच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी दुर्गापूर पोलाद औष्णिक वीज प्रकल्प आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या रघुनाथपूर औष्णिक वीज  प्रकल्पाच्या 1,457 कोटी रुपयांच्या प्रदूषण नियंत्रण प्रणाली-फ्लू गॅस डिसल्फरायझेशन (FGD) चे रेट्रोफिटिंग देखील राष्ट्राला समर्पित केले. यामुळे स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला पाठिंबा देऊन आणि प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण करून प्रदेशाला फायदा होईल.

या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, याशिवाय पंतप्रधानांनी 390 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पुरुलियामधील पुरुलिया-कोटशिला रेल्वे लाईनच्या (36 किमी)  दुपदरीकरणाच्या कामाचे  लोकार्पण केले. यामुळे जमशेदपूर, बोकारो आणि धनबादमधील उद्योगांची रांची आणि कोलकाताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि मालगाड्यांची कार्यक्षम वाहतूक होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि उद्योग आणि व्यवसायांसाठी लॉजिस्टिक्स सुधारतील.

पंतप्रधानांनी पश्चिम वर्धमानमधील तोपसी आणि पांडबेश्वर येथे सेतू भारतम कार्यक्रमांतर्गत 380 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या दोन रस्ते  उड्डाणपुलांचे (आरओबी) उद्घाटन केले. यामुळे येथील दळणवळण सुधारेल आणि रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यास मदत होईल.

 

 

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/तुषार पवार/संपदा पाडगांवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2145913)