पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या संसदेला केले संबोधित

Posted On: 09 JUL 2025 10:43PM by PIB Mumbai

नामिबियाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष महामहिम सारा कुगोंगेलवा यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नामिबियाच्या संसदेला संबोधित केले. नामिबियाच्या या विशेष सन्मानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नामिबिया भेट देखील अधिक फलद्रुप झाली.

नामिबियाच्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीची जननी असलेल्या आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताकडून या प्रतिष्ठित सभागृहाचे प्रतिनिधी आणि नामिबियाच्या अत्यंत मनमिळावू लोकांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे तसेच उभय देशांमधील ऐतिहासिक दृढ संबंधांचे स्मरण करून पंतप्रधानांनी नामिबियाचे संस्थापक राष्ट्रपिता आणि पहिले राष्ट्राध्यक्ष, डॉ. सॅम नुजोमा यांच्या वारशाला आदरांजली वाहिली. दोन्ही देशांच्या राष्ट्रपित्यांनी जपलेली लोकशाहीची मूल्ये आणि तत्त्वे आजही दोन्ही राष्ट्रांचा विकासाचा  मार्गा उजळत आहेत,  असे पंतप्रधान म्हणाले. देशात लोकशाहीची मूल्ये रुजवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या नामिबियाच्या सरकारचे आणि नागरिकांचे त्यांनी कौतुक केले.

नामिबियाचा सर्वोच्च नागरी सम्मान प्रदान केल्याबद्दल त्यांनी नामिबियाच्या नागरिकांचे आभार मानले.

त्यांनी नमूद केले की ही विशेष कृती म्हणजे भारतीय आणि नामिबियातील लोकशाहीच्या कामगिरीला आदरांजली आहे. स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचे रक्षक म्हणून, त्यांनी दोन्ही देशांना ग्लोबल साउथ देशांच्या भल्यासाठी काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून तेथील लोकांचे आवाज केवळ ऐकले जाणार नाहीत तर त्यांच्या आशा आणि आकांक्षा पूर्णपणे साकार होतील. आफ्रिकन युनियनला या गटाचा कायमस्वरूपी सदस्य बनवण्यात आल्यावर जी-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने जसे केले होते तसेच आफ्रिकेच्या प्रगतीसाठी भारत नेहमीच काम करेल असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, भारताला नामिबिया आणि  आफ्रिका खंडातील इतर देशांसोबत विकासाचा अनुभव सामायिक करण्याचा बहुमान मिळाला आहे. क्षमता निर्माण करण्यासाठी, कौशल्ये विकसित करण्यासाठी, स्थानिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आफ्रिका  अजेंडा 2063 ला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल सभापतींचे आभार मानले. दोन्ही लोकशाही कायम समृद्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी दोन्ही देशांमधील जनतेशी अधिक संवाद साधण्याचे आवाहन केले. "आपल्या मुलांना केवळ आपण ज्या स्वातंत्र्यासाठी लढलो आहोत तेच नव्हे तर आपण एकत्रितपणे घडवू शकणाऱ्या भविष्याचाही वारसा मिळू द्या." - असे त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हटले.

***

JPS/Bhakti /Hemangi/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143648)