सहकार मंत्रालय
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद येथे गुजरात,मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकार क्षेत्रातील महिला कामगारांसाठी 'सहकार संवाद' कार्यक्रमाचे आयोजन
जनऔषधी केंद्राच्या सेवा देणाऱ्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांनी गावात किफायतशीर औषधांच्या उपलब्धतेबाबत जनजागृती करावी असे केंद्रीय मंत्री अमित शह यांचे आवाहन
Posted On:
09 JUL 2025 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकार क्षेत्राशी संबंधित महिलांसाठी गुजरातमधील अहमदाबाद येथे 'सहकार संवाद' आयोजित केला होता.
सहकार संवाद'ला संबोधित करताना केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की, त्रिभुवनदास पटेल यांच्या नावाने आणंद जिल्ह्यात “त्रिभुवन” सहकारी विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, सहकार क्षेत्रात तरुण व्यावसायिक तयार करण्याची मूळ कल्पना त्रिभुवनदास यांची होती आणि या उद्देशाने हे विद्यापीठ स्थापन होत आहे. त्रिभुवनदास यांनी खऱ्या अर्थाने सहकाराचा पाया घातला होता, ज्यामुळे आज गुजरातमधील 36 लाख महिला 80 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत. केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, पॅक्स (PACS), म्हणजेच प्राथमिक कृषी पतसंस्था, सीएससी, मायक्रो एटीएम, हर घर नल, बँक मित्र आणि सुमारे 25 इतर उपक्रमांशी जोडल्या गेल्या आहेत. पॅक्सच्या उपनियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर, देशभरातील जिल्हा सहकारी बँकांच्या निरीक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पॅक्सशी संबंधित असलेल्यांनी निरीक्षकांशी बोलून त्यांच्याकडून नवीन बदलांबद्दल माहिती घ्यायला हवी. ते म्हणाले की पॅक्स द्वारे महसूलही निर्माण व्हायला हवा. ते म्हणाले की, जनऔषधी केंद्राची सेवा पुरवणाऱ्या पॅक्सने गावातील लोकांमध्ये पुरेशी जनजागृती करून, बाजारभावापेक्षा कमी दरात त्यांच्या केंद्रांवर औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती द्यावी.
अमित शाह म्हणाले की मका आणि डाळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एनसीसीएफ अॅपवर नोंदणी केली तर नाबार्ड आणि एनसीसीएफ या संस्था शेतकऱ्यांकडून किमान हमी भावाने (एमएसपी) मका आणि डाळी खरेदी करू शकतात. तसेच, शेतकऱ्याला बाजारात अधिक दर मिळत असेल, तर तो आपले पीक बाजारातही विकू शकतो.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, देशाचा गृहमंत्री असणे ही मोठी बाब आहे कारण सरदार पटेल देखील गृहमंत्री होते. मात्र ज्या दिवशी मला सहकार मंत्री बनविण्यात आले, त्या दिवशी मला वाटले की गृह मंत्रालयापेक्षा मोठे खाते मला मिळाले. हे देशातील गरीब, शेतकरी, खेडी आणि पशुधनासाठी काम करणारे मंत्रालय आहे. येत्या काळात तीन राज्यांमध्ये अशा १० चौपालांचे आयोजन करणार असून त्यातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे सहकार मंत्रालय काम करेल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले.
उंटाच्या दुधाचे औषधी गुणधर्म जाणून घेण्याबाबत संशोधन होत आहे. उंटपालकांना उंटाच्या दुधाला अधिक दर मिळवून देण्यासाठी औषधी गुणधर्मांचा वापर करून राजस्थान आणि गुजरात सरकारे लवकरच एकत्र येऊन एक योजना सुरू करतील. उंटपालन आणि उंटाच्या दुधाचे दर वाढतील, तेव्हा त्यांच्या जातीच्या संवर्धनात साहजिकच मोठा फायदा होईल, असे 'सहकार संवाद' कार्यक्रमात अमित शहा यांनी सांगितले.
S.Bedekar/R.Agashe/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143595)