सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन


या विद्यापीठामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येऊन पारदर्शकता स्थापित होईल, तसेच सहकारी विद्यापीठातून प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळू लागतील

देशभरातील सहकारी प्रशिक्षण तज्ञांनी स्वतःला या विद्यापीठाशी जोडून घेत योगदान द्यावे असे केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2025 6:48PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे, भूमिपूजन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुटानी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिभुवन दास पटेल यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे, त्यामुळे आजचा दिवस सहकार क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी गरीब आणि गावकऱ्यांच्या जगण्यात आशा निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असे ते म्हणाले. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून, गेल्या चार वर्षांत, सहकार मंत्रालयाने भारतातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी, या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकसमान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 60 नवीन उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती शाह यांनी दिली. सहकार क्षेत्राचा विकास व्हावा, सहकारातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि सहकार चळवळीत महिला शक्ती आणि युवा वर्गाचा सहभाग वाढवा यादृष्टीने  सहकार चळवळ चिरकाल टिकून राहावी, हे क्षेत्र पारदर्शकता आणि लोकशाहीपूर्ण बनावे या हेतूनेच हे सर्व उपक्रम राबवले जात असल्याचे ते म्हणाले.

आज गुजरातमधील आणंद इथे भूमिपूजन झालेले त्रिभुवन सहकारी विद्यापीठ हे भारतातील पहिल्या सहकारी विद्यापीठ 125 एकरच्या विस्तीर्ण परिसरात उभारले जाणार आहे, यासाठी  500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे अशी माहिती शाह यांनी उपस्थितांना दिली. त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे सहकार क्षेत्राला बळकटी देतांना या क्षेत्रातील सर्व उणिवांची कसर भरून काढण्याच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातली सहकार चळवळ वेगाने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टाकले गेलेले एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे असे ते म्हणाले. आज देशभरात 40 लाख कामगार सहकार चळवळीशी जोडले गेले आहेत, 80 लाख जण मंडळांचे सदस्य आहेत आणि 30 कोटी लोक, म्हणजेच देशातील प्रत्येक चौथी व्यक्ती ही सहकार चळवळीशी जोडली गेलेली आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

यापूर्वी देशात सहकार क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगानेसहकारी संस्थांमधील कर्मचारी आणि सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नव्हती, असे त्यांनी सांगितले. पूर्वी कर्मचाऱ्यांना ते सहकारी संस्थांमध्ये भरती झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जात होते, मात्र आता या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर, ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांनाच नोकरी मिळेल, असे ते म्हणाले. यामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येईल, पारदर्शकता स्थापित होईल आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्याही मिळतील असे शाह यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, “या विद्यापीठात युवक केवळ तांत्रिक कौशल्य, लेखा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विपणनाची सर्व आवश्यक वैशिष्ट्येच शिकणार नाहीत, तर सहकार चळवळीच्या माध्यमातून देशातील दलित, आदिवासी आणि महिलांसाठी असलेल्या सहकार मूल्यांचाही अभ्यास करतील.” अमित शाह पुढे म्हणाले की, या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्रातील अनेक समस्या सोडवता येतील.

शाह पुढे म्हणाले की, “सीबीएसईने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात सहकार हा विषय समाविष्ट केला आहे. गुजरात सरकारनेही आपल्या अभ्यासक्रमात सहकार विषय समाविष्ट करावा, जेणेकरून सामान्य लोकांनाही सहकाराबाबत माहिती मिळू शकेल.”

शाह पुढे म्हणाले की, “हे विद्यापीठ संपूर्ण देशभरातील सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणासाठी एकसंध अभ्यासक्रम तयार करून धोरणे, नवोन्मेष, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना पुढे नेण्याचे काम करेल.” त्यांनी हेही सांगितले की,”हे विद्यापीठ प्रतिभावान व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देईल आणि इथून सहकाराचे धोरण तयार केले जाईल जे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि हे विद्यापीठ 2 लाख नवीन व 85 हजार जुन्या पीएसीएस (प्राथमिक कृषी पत संस्थां) च्या माध्यमातून सर्व योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्याचे कामही करेल.”

ते पुढे म्हणाले की, “हे विद्यापीठ त्या मोठ्या रिक्ततेला दूर करेल, जी आपल्या सहकारी चळवळीला संकुचित करण्यास कारणीभूत ठरली. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सहकारी चळवळ बहरेल, वाढेल आणि भारत संपूर्ण जगात सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. “त्रिभुवन” सहकारी विद्यापीठात तयार होणारी धोरणे आणि अभ्यासक्रम सहकाराच्या आर्थिक मॉडेलला एका जनआंदोलनात रूपांतरित करण्याचे कार्य करतील.” त्यांनी हेही सांगितले की,”हे विद्यापीठ सर्व मोठ्या सहकारी संस्थांसाठी पात्र कर्मचाऱ्यांची पूर्तता करेल.”शाह पुढे म्हणाले की,”आम्हाला सहकारी टॅक्सी सेवा सुरू करायची आहे, सहकारी विमा कंपनीही निर्माण करायची आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेले अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी नेते आवश्यक आहेत. त्यांनी संपूर्ण देशातील सहकार क्षेत्राला आवाहन करत सांगितले की, “देशभरातील सहकारी प्रशिक्षण तज्ज्ञांनी या विद्यापीठात सहभागी व्हावे आणि आपले योगदान द्यावे.”

***

S.Patil/T.Pawar/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2142565) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam