पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले


त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहेः पंतप्रधान

मला खात्री आहे की 500 वर्षांनंतर राम लल्ला अयोध्येत परतल्याचे स्वागत आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने केले असेल- पंतप्रधान

भारतीय समुदाय हा आमचा मानबिंदू आहे- पंतप्रधान

प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमात, मी जगभरातील गिरमिटिया समुदायाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली

अंतराळातील भारताचे यश जागतिक स्वरुपाचे आहे- पंतप्रधान

Posted On: 04 JUL 2025 6:46AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन स्वागत सोहळ्याचा अनुभव देण्यात आला.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना, पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी घोषणा केली की त्रिनिदाद आणि टोबॅगो त्यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, "द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो" प्रदान करणार आहे. पंतप्रधानांनी या सन्मानाबद्दल त्यांचे आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांचे मनापासून आभार मानले.

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी पंतप्रधान कमला पेरसाद-बिसेसर यांचे त्यांच्या जिव्हाळ्याबद्दल आणि दोन्ही देशांमधील चैतन्याने परिपूर्ण आणि विशेष असलेले संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की त्यांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा ऐतिहासिक दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा हे राष्ट्र भारतीय स्थलांतरितांच्या पहिल्या आगमनाला 180 वर्षे साजरी करत आहे, ज्यामुळे हा दौरा आणखी विशेष ठरला आहे.

पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांच्या जिद्दीची, सांस्कृतिक समृद्धतेची तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी त्यांनी दिलेल्या भरघोस योगदानाची प्रशंसा केली.त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय वंशाचे लोक त्यांचा भारतीय सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जपत आणि जोपासत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. हे बंध आणखी मजबूत करण्यासाठी, आता त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय वंशाच्या सहाव्या पिढीला ओसीआय कार्ड दिले जातील अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. या विशेष उपक्रमाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. गिरमिटिया वारशाचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकार अनेक उपक्रमांना पाठिंबा देईल, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, उत्पादन, हरित मार्ग, अवकाश, नवोन्मेष आणि स्टार्ट-अप्स या क्षेत्रातील भारताच्या जलद विकास आणि परिवर्तनाची रूपरेषा पंतप्रधानांनी सर्वांसमोर मांडली.

गेल्या एका दशकात भारताने समावेशक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, 25 कोटींहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले आहे, असे  त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की भारत लवकरच जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंगवरील राष्ट्रीय मोहिमा देशाच्या विकासाचे नवीन इंजिन बनत आहेत, यांवर पंतप्रधानांनी भर दिला.

भारतातील यूपीआय आधारित डिजिटल पेमेंटच्या यशावर प्रकाश टाकत, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्येही त्याचा अवलंब तितकाच उत्साहवर्धक असेल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.कोविड महामारीच्या काळात स्पष्टपणे दाखवलेल्या वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच जग एक कुटुंब आहे या भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाचे प्रतिबिंबित करत, त्यांनी प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नात टी अँड टीला सतत पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली.

4000 हून अधिक लोकांची उपस्थिती असलेल्या या भव्य कार्यक्रमात महात्मा गांधी सांस्कृतिक सहकार्य संस्थेच्या कलाकारांनी आणि इतर संस्थांनी  मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

***

 JPS/ShaileshP/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2142089) Visitor Counter : 3