पंतप्रधान कार्यालय
संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकशाहीच्या रक्षकांना वाहिली आदरांजली
आणीबाणीविरोधी चळवळीने आपली लोकशाही चौकट जोपासण्याची चेतना दृढ केली: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2025 9:32AM by PIB Mumbai
आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधःकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले गेले, वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात आली त्याचबरोबर असंख्य राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकले गेले तो 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो.
आपल्या राज्यघटनेतील तत्त्वांना बळकटी देण्याच्या आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचाही मोदींनी पुनरुच्चार केला. आणीबाणीच्या विरोधातील चळवळ हा एक शिकण्याजोगा अनुभव होता, या चळवळीने आपल्या लोकशाही चौकटीचे जतन करण्याची चेतना पुन्हा दृढ केली गेली, असेही ते पुढे म्हणाले.
1975 ते 1977 या लाजिरवाण्या कालखंडाबद्दल तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी, ज्यांना ते आणीबाणीचे काळे दिवस आठवत असतील अशांनी किंवा ज्यांच्या कुटुंबीयांना त्या काळात त्रास सहन करावा लागला अशा सर्वांनी आपले अनुभव समाज माध्यमांवर सामायिक करण्याचे आवाहनही मोदींनी केले.
एक्स या समाज माध्यमावर यासंदर्भात लिहिलेल्या अनेक पोस्टमध्ये ते म्हणतात:
"भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळा अध्यायांपैकी एक म्हणजे, आणीबाणी लागू झाली त्या दिवसाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातील नागरिक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळतात. या दिवशी भारतीय राज्यघटनेतील मूल्ये बाजूला सारली गेली होती, मूलभूत अधिकार थांबवले गेले, विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने जणू काही लोकशाहीलाच कैद केले होते #SamvidhanHatyaDiwas!
"आपल्या राज्यघटनेच्या आत्म्याचे ज्या प्रकारे उल्लंघन केले गेले, संसदेचा आवाज दाबला गेला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा कोणत्याही भारतीयाला कधीही विसर पडणार नाही. 42 वी घटनादुरुस्ती हे त्यांच्या हतबलतेचे प्रमुख उदाहरण आहे. विशेषतः गरीब, उपेक्षित आणि दलितांना लक्ष्य करून त्यांच्या प्रतिष्ठेचा अनादर केला गेला होता. #Samvidhanshatya"
आणीबाणीच्या विरोधात भक्कमपणे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही अभिवादन करतो. हे सर्व जण संपूर्ण भारतातील होते, जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील होते, वैविध्यपूर्ण विचारधारा असणाऱ्या या सर्वांनी एकाच ध्येयासाठी एकजुटीने कार्य केले आणि ते ध्येय म्हणजे भारताच्या लोकशाहीचे रक्षण करणे आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या मूल्यांसाठी आपल्या प्राणांचा त्याग केला त्यांचे रक्षण करणे हे होय. त्यांच्या या एकत्रित संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्स्थापित करावी लागली आणि नव्याने निवडणूका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांचा अतिशय दारूण पराभव झाला. #SamvidhanHatyaDiwas”
आपल्या संविधानातील तत्त्वांना अधिक मजबूत करण्याच्या आणि विकसित भारताचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. आपण यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करु आणि गरीब आणि वंचितांच्या स्वप्नांची पूर्तता करु. " #SamvidhanHatyaDiwas”
ज्यावेळी आणीबाणी लादली गेली तेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो. आणीबाणी विरोधातील चळवळ म्हणजे माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. त्यामुळे आपल्या लोकशाही चौकटीचे जतन करण्याची चेतना अधिक दृढ झाली. त्याच वेळी, मला राजकीय क्षेत्रातील लोकांकडून खूप काही शिकायला मिळाले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने त्यातील काही अनुभव एका पुस्तकाच्या स्वरूपात संकलित केले आहेत याचा मला आनंद आहे, स्वतः आणीबाणीविरोधी चळवळीचे एक प्रमुख नेते असलेल्या एचडी देवेगौडा जी यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.
@BlueKraft
@H_D_Devegowda
#SamvidhanHatyaDiwas”
"द इमर्जन्सी डायरीस" ने आणीबाणीच्या काळातील माझा प्रवास शब्दबद्ध केला आहे. त्यामुळे माझ्या गतस्मृती ताज्या झाल्या आहेत. आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांचे स्मरण असणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या यातना सोसल्या आहेत त्यांनी त्या समाज माध्यमावर सामाईक कराव्यात असे मी आवाहन करतो. यामुळे युवावर्गात 1975 ते 1977 या लाजिरवाण्या काळाविषयी जागरूकता निर्माण होईल.
#SamvidhanHatyaDiwas”
***
SushamaK/ManjiriG/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2139427)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam