आयुष मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 हा केवळ एक मैलाचा टप्पा नव्हे तर जागतिक निरामयता चळवळ आहे - केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 मध्ये विशाखापट्टणम इथे ऐतिहासिक योग सत्रात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक सहभागी होणार
Posted On:
12 JUN 2025 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2025
आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर इथे 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा पूर्ववर्ती कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 च्या भव्य उत्सवाची औपचारिक सुरुवात झाली असून, 21 जून रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी गेल्या दशकभरातील आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रवासावर भाष्य केले. “2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आवाहनाची फलश्रुती होती आणि त्याद्वारे भारताच्या पारंपरिक शहाणपणावर आधारित एक जागतिक निरामयता चळवळ सुरू झाली,” असे ते म्हणाले.
2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जात आहे. “दिल्लीतील विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या कार्यक्रमापासून ते मैसूर, न्यूयॉर्क आणि श्रीनगरमधील महत्त्वाच्या सत्रांपर्यंत प्रत्येक वर्षी विविध संस्कृतीतील लोकांनी आरोग्य, संतुलन आणि शांततेच्या समान उद्दिष्टासाठी एकत्र येण्याचा आदर्श स्थापित केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
या वर्षीच्या योग दिवसाचे महत्त्व प्रतापराव जाधव यांनी अधोरेखित केले, “आपण 11व्या वर्षात प्रवेश करत आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 हा केवळ एक उत्सव नाही, तर हे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योगप्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांमध्ये वाढ करण्यासाठीचे आवाहन आहे.”
'एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग' ही संकल्पना भारताच्या जी -20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मांडलेला जागतिक आरोग्याबद्दलच्या दृष्टिकोनावर आणि सर्वे सन्तु निरामय अर्थात सर्वांना रोगमुक्त, निरामय आयुष्य लाभो या भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानावर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योगदिनाचा राष्ट्रीय कार्यक्रम 21 जून 2025 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच लाखांहून अधिक सहभागींसह कॉमन योगा प्रोटोकॉल सत्राचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच देशभरातील एक लाखांहून अधिक ठिकाणी 'योग संगम' या कार्यक्रमाची सत्रे आयोजित केली जाणार असून ते इतिहासातील सर्वात मोठ्या समन्वित योग प्रात्यक्षिकांपैकी एक बनेल. यातून सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने 'योगसमावेश' या कार्यक्रमापासून ते आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी 'योगबंधन' या कार्यक्रमापर्यंत योगाभ्यासाचा प्रसार दूरवर करण्याची सरकारची धोरणात्मक दृष्टी दिसून येते.
योगदिनाच्या उलटगणतीसाठी दिल्ली, भुवनेश्वर, नाशिक आणि पुद्दुचेरी येथे अनुक्रमे 100 दिवस, 75 दिवस, 50 दिवस आणि 25 दिवसांच्या टप्प्यांवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेला जनतेच्या उत्साही प्रतिसादाची जोड मिळाल्याची नोंद त्यांनी यावेळी घेतली. या कार्यक्रमांमुळे मुख्य कार्यक्रमाआधी आवश्यक ती वातावरणर्निर्मिती केली आहे.

"योग ही केवळ मुद्रा आणि श्वसनाची पद्धत नसून तो जीवनाचा मार्ग आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण उपक्रम करु इच्छितो ज्यामुळे लाखो लोकांना योगाभ्यासाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी आणि एक आरोग्यपूर्ण, आनंदी आणि अधिक सुसंवादी समाज बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल." असे जाधव यांनी मध्यमप्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले.
S.Kakade/R.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136024)
Visitor Counter : 7