पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशात कानपुर येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
30 MAY 2025 5:20PM by PIB Mumbai
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, इथले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री , खासदार , आमदार आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
इथे एका मुलीने एक चित्र काढले आहे, एसपीजीच्या लोकांनी ते घ्यावे. तिथेही कोणीतरी एक चित्र काढून आणले आहे, त्या कोपऱ्यात. तुम्ही त्यावर तुमचा पत्ता लिहा, मी पत्र पाठवेन. त्या कोपऱ्यात एक तरुण आहे, त्याचाही पत्ता लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला पत्र लिहू शकेन. इथे हा मुलगा कधीपासून हात उंचावत आहे, तुझा खांदा दुखू लागेल, तू थकून जाशील. आज कानपूरमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोणीतरी जरा तिथे पहा, फोटोग्राफर जरा तिथे पहा, एसपीजीच्या लोकांनी कृपया त्या मुलाला मदत करावी.
भारत माता की जय!
भारत माता की जय!
कानपूरमध्ये विकास कामांच्या शुभारंभाचा हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी होणार होता, परंतु पहलगामवरील हल्ल्यामुळे मला माझा कानपूर दौरा रद्द करावा लागला. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात, आपल्या कानपूरचे शुभम द्विवेदी देखील या क्रूरतेचे बळी ठरले. त्यांची पत्नी ऐशान्या यांचे दुःख, वेदना आणि अंतर्मनातील आक्रोश आपण सर्वजण समजू शकतो. आपल्या बहिणी आणि मुलींचा तोच आक्रोश ऑपरेशन सिंदूरच्या रूपात संपूर्ण जगाने पाहिला आहे. आपण पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या घरांमध्ये घुसून, शेकडो मैल आत जाऊन त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आणि आपल्या सैन्याने असे शौर्य दाखवले , असा पराक्रम गाजवला की पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकून युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली.
स्वातंत्र्य लढ्याच्या या भूमीवरून, मी सैन्याच्या शौर्याला पुन्हा-पुन्हा सलाम करतो. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ऑपरेशन सिंदूर दरम्यान विनवणी करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढ्यात भारताने तीन सूत्रे स्पष्टपणे निर्धारित केली आहेत. पहिले - भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देईल. त्याची वेळ, प्रतिसादाची पद्धत आणि उत्तर देण्याच्या अटी आपले सैन्य स्वतः ठरवेल. दुसरे म्हणजे, भारत आता अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही आणि त्या आधारे कोणताही निर्णय घेणार नाही. तिसरे म्हणजे भारत दहशतवादाचे प्रमुख सूत्रधार आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारकडे एकाच नजरेने बघेल. पाकिस्तानचा थेट आणि छुपा हा खेळ आता चालणार नाही. थेट कानपुरिया भाषेत बोलायचे तर शत्रू जिथे कुठे असेल तिथून त्याला हाकलून लावले जाईल.
मित्रहो,
ऑपरेशन सिंदूरमध्ये, जगाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची आणि मेक इन इंडियाची ताकद देखील पाहिली आहे. आपल्या भारतीय शस्त्रास्त्रांनी, ब्रह्मोस क्षेपणास्त्राने शत्रूच्या घरात घुसून कहर केला आहे. जिथे लक्ष्य निश्चित केले तिथेच स्फोट घडवून आणले गेले. ही ताकद आपल्याला आत्मनिर्भर भारताच्या संकल्पातूनच मिळाली आहे. एक काळ असा होता जेव्हा भारत आपल्या लष्करी गरजांसाठी, आपल्या संरक्षणासाठी इतर देशांवर अवलंबून होता. आम्ही ती परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. आपल्या सुरक्षाविषयक गरजांसाठी स्वयंपूर्ण बनणे हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी तर आवश्यक आहेच शिवाय देशाच्या स्वाभिमानासाठीही तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही देशाला त्या अवलंबित्वापासून मुक्ती देण्यासाठी आत्मनिर्भर अभियान सुरू केले आहे आणि संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी ही अभिमानाची बाब आहे, संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्यात ते मोठी भूमिका बजावत आहे. ज्याप्रमाणे कानपूरमध्ये एक जुना आयुध कारखाना आहे, तसेच 7 आयुध कारखाने आम्ही मोठ्या आधुनिक कंपन्यांमध्ये रूपांतरित केले आहेत. आज देशातील सर्वात मोठा संरक्षण कॉरिडॉर उत्तर प्रदेशात तयार होत आहे. या कॉरिडॉरचा कानपूर नोड संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे एक प्रमुख केंद्र आहे.
मित्रहो,
एके काळी जिथून पारंपारिक उद्योग पळून जात होते, तिथे आता संरक्षण क्षेत्रातील मोठ्या कंपन्या येत आहेत. इथे जवळच अमेठीमध्ये AK203 रायफलचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने शत्रूंची झोप उडवली , त्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा नवा पत्ता उत्तर प्रदेश हा आहे. भविष्यात, कानपूर आणि उत्तर प्रदेश भारताला संरक्षण सामग्रीचा प्रमुख निर्यातदार बनवण्यात आघाडीवर असतील. इथे नवीन कारखाने उभारले जातील. इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. येथील हजारो तरुणांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळतील.
मित्रहो,
उत्तर प्रदेश आणि कानपूरला विकासाच्या नवीन उंचीवर नेणे हे या दुहेरी इंजिन सरकारचे पहिले प्राधान्य आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा येथील उद्योगांना चालना मिळेल, जेव्हा कानपूरला त्याचे जुने वैभव परत मिळेल. परंतु, बंधू आणि भगिनींनो, मागील सरकारांनी आधुनिक उद्योगांच्या या गरजांकडे दुर्लक्ष केले होते. कानपूरमधून उद्योगांचे स्थलांतर होत गेले. घराणेशाही असणारी सरकारे डोळे मिटून बसून राहिली. परिणामी केवळ कानपूरच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश मागे पडला.
बंधू आणि भगिनींनो,
राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी दोन सर्वात महत्त्वाच्या अटी आहेत, पहिली - ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता, म्हणजे वीजपुरवठा आणि दुसरी - पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी. आज इथे 660 मेगावॅटचा पनकी वीज प्रकल्प, 660 मेगावॅटचा नेवेली वीज प्रकल्प, 1320 मेगावॅटचा जवाहरपूर वीज प्रकल्प,, 660 मेगावॅटचा ओबरासी औष्णिक ऊर्जा प्रकल्प , 660 मेगावॅटचा खुर्जा वीज प्रकल्प यांचे लोकार्पण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या वीज प्रकल्पांनंतर, उत्तर प्रदेशात विजेची उपलब्धता आणखी वाढेल, यामुळे येथील उद्योगांनाही गती मिळेल. आज 47 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि पायाभरणी देखील झाली आहे. इथे वृद्धांच्या मोफत उपचारांसाठी आयुष्मान वय वंदना कार्ड देखील वितरित करण्यात आली आहेत. इतर योजनांच्या लाभार्थ्यांनाही मदत देण्यात आली आहे. या योजना, ही विकास कामे, कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या प्रगतीप्रती आमची वचनबद्धता दर्शवतात.
मित्रहो,
आज केंद्र आणि राज्य सरकार आधुनिक आणि विकसित उत्तर प्रदेशच्या निर्मितीसाठी काम करत आहेत. याचाच परिणाम आहे, ज्या पायाभूत सुविधा, सोयी , जे स्रोत मोठमोठ्या महानगरांमध्ये असतात ते सर्व आता आपल्या कानपूरमध्येही दिसू लागले आहेत.
काही वर्षांपूर्वी आमच्या सरकारने कानपूरला पहिली मेट्रो भेट दिली होती. आता आज कानपूर मेट्रोची ऑरेंज लाईन कानपूर सेंट्रलपर्यंत पोहोचली आहे. प्रथम उन्नत मार्गे आणि आता भूमिगत मार्गे, सर्व प्रकारचे मेट्रो जाळे कानपूरच्या महत्त्वाच्या भागांना जोडत आहे.
कानपूर मेट्रोचा हा विस्तार काही सामान्य प्रकल्प नाही. कानपूर मेट्रो या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रमाण आहे की, जर तुमचा निर्धार पक्का असेल, तुमच्याकडे मजबूत इच्छाशक्ती असेल आणि काम करण्याचा हेतू शुद्ध असणारे सरकार सत्तेवर असेल तर, देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी सर्वतोपरी इमाने इतबारे प्रयत्न केले जातात. तुम्हा मंडळींना नक्कीच आठवत असेल की, काही वर्षांपूर्वी लोक काय-काय बोलत होते? चुन्नीगंज, बडा चौराहा, नयागंज, कानपूर सेंट्रल हा संपूर्ण भाग किती प्रचंड गर्दीचा होता. या सर्व भागामध्ये लहान लहान अगदी अरूंद रस्ते होते. त्याचबरोबर या भागात पायाभूत सुविधाही नव्हत्या. कोणत्याही रस्त्यांचे नियोजन करण्यात आलेले नव्हते. लोक म्हणत होते की, इथे- अशा अडचणीच्या भागात कुठे मेट्रोचे काम होवू शकणार? या गर्दीच्या अरूंद मार्गाचे परिवर्तन घडवून आणणे कसे काय शक्य आहे? एक पद्धतीने कानपूर आणि उत्तर प्रदेशातली अन्य प्रमुख शहरे विकासाच्या स्पर्धेतून बाहेरच पडली होती. यामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक अवघड बनायला लागली होती. शहरातील वाहतुकीचा वेग हळूहळू कमी होत चालला होता. परंतु, आज तेच कानपूर, तेच उत्तर प्रदेश राज्य विकासाचे नवीन विक्रम स्थापित करीत आहे. तुम्ही पाहू शकता, मेट्रो सेवेचा आता कानपूरचे लोक किती मोठ्या संख्येने लाभ घेणार आहेत. कानपूर शहर हे व्यापारी वर्गाच्या दृष्टीने खूप महत्वाचे केंद्रस्थान आहे. मेट्रोमुळे आता आमचे व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठी एक नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे आणि बडा चौराहा पोहोचणे सर्वाना आता खूप सोपे होणार आहे. कानपूरला ये-जा करणा-या लोकांना, आयआयटीच्या विद्यार्थ्यांना, सामान्य लोकांना, अशा सर्वच जणांना सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यत पोहोचण्यासाठी लागणा-या वेळेची बचत होवू शकणार आहे. आपल्याला माहिती आहे, शहराची गती हीच शहराची प्रगती बनत असते. या सुविधा, इथली दळणवळणाची -संपर्काची साधने, वाहतुकीच्या आधुनिक सुविधा आज उत्तर प्रदेशच्या आधुनिक विकासाची नवीन प्रतिमा बनत आहे.
मित्रांनो,
आज आपल्या उत्तर प्रदेशने आधुनिक पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या साधनांच्या बाबतीत खूप आघाडी घेतली आहे. ज्या उत्तर प्रदेशची ओळख खड्डे पडलेले, खराब रस्ते अशी होती, त्याच राज्यामध्ये आता द्रुतगती मार्गांचे जाळे तयार झाले असून, ही राज्याची नवीन ओळख बनली आहे. ज्या उत्तर प्रदेशातील लोक संध्याकाळनंतर घराच्या बाहेर जाणे टाळत होते, तिथेच आता महामार्गांवर 24 तास लोक प्रवास करतात. उत्तर प्रदेश नेमके कसे बदलले? ही गोष्ट तर कानपूरच्या लोकांशिवाय आणखी कोणाला माहिती असणार? काही दिवसांतच आता कानपूर-लखनौ या द्रुतगती महामार्गाचा प्रवास अवघ्या 40-45 मिनिटांचा होणार आहे. ‘’ ही मुलगी किती वेळ झाला, हातामध्ये चित्र घेवून उभी आहे, थकली असेल. इथे असलेल्या एसपीजीच्या लोकांना माझे सांगणे आहे की, त्या मुलीकडून ते चित्र आणण्याची व्यवस्था करावी.धन्यवाद , बेटा !! खूप छान, अतिशय उत्तम चित्र काढून तू घेवून आलीस. जरा इकडे लक्ष देणार का? ही मुलगी थकून जाईल. बेटा, त्या चित्राच्या मागे, तुझं नाव आणि पत्ता लिहिले आहेस का? माझ्या कार्यालयाचे लोक तिथे येतील आणि ते चित्र घेतील. आत्ताच पोहोचतील आणि ते चित्रही माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. बेटा, तुला खूप-खूप धन्यवाद!!‘‘
मित्रांनो,
लखनौ इथून पूर्वांचल द्रुतगती मार्गाने थेट संपर्काची सुविधाही आता मिळेल. कानपूर-लखनौ द्रुतगती मार्गाला आता गंगा द्रुतगती मार्गही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना जाण्यासाठी अंतर आणि वेळेचीही बचत होणार आहे.
मित्रांनो,
कानपूरच्या लोकांना आत्तापर्यंत फर्रूखाबाद -अनवरगंज भागात
एकेरी मार्गिका असल्यामुळे त्रासदायक ठरत होते. एक नाही, दोन नाही तर तब्बल 18 रेल्वे क्रॉसिंग पार करावे लागत होते. कधी हे फाटक बंद ; तर कधी दुसरे ते फाटक बंद होत असे. तुम्हा सर्व लोकांची या अडचणीतून आता मुक्तता करण्यात येणार आहे. आता इथेही एक हजार कोटी रूपये खर्च करून उन्नत रेल्वे कॉरिडॉर बनविण्यात येत आहे. यामुळे इथल्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. वाहनांचा वेग वाढू शकणार आहे. तसेच प्रदूषणही कमी होऊ शकणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हा कानपूरच्या लोकांचा वेळ वाचणार आहे.
मित्रांनो,
कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकाचा स्तर उंचावून या स्थानकाला विश्वस्तरीय बनवण्याचे काम सुरू आहे. थोड्याच दिवसात हे काम पूर्ण झाल्यानंतर कानपूर सेट्रल रेल्वे स्थानकसुध्दा विमानतळाप्रमाणे चकचकीत होईल. तसेच तिथे आधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधा मिळत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. आमच्या सरकारने उत्तर प्रदेशातील 150 हून अधिक रेल्वे स्थानकांना अमृत भारत रेल्वे स्थानक योजने अंतर्गत विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. उत्तर प्रदेश हे आधीच देशातील सर्वांधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य बनले आहे. याचा अर्थ महामार्ग, रेल मार्ग आणि हवाई मार्ग अशा सर्वच बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे.
मित्रांनो,
आम्ही उत्तर प्रदेशला औद्योगिक संभावनांचे राज्य बनवणार आहोत. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आम्ही ‘मेक इन इंडिया‘ साठी मिशन उत्पादनाची घोषणा केली आहे. याअंतर्गत स्थानिक उद्योगांना, उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येईल. कानपूरसारख्या शहराला याचा खूप मोठा लाभ मिळेल. तुम्हाला माहितीच आहे की, कानपूरचे औद्योगिक सामर्थ्य इतके होते की, राज्याच्या एमएसएमईअंतर्गत लघु उद्योगांचे सर्वात मोठे योगदान या शहराचे होते. आज आम्ही इथल्या लघु उद्योगांच्या अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्याचे काम करीत आहोत.
मित्रांनो,
काही दिवसांपर्यंत एमएसएमईची व्याख्या अशी केली जात होती की, त्याविषयी विस्ताराने बोलण्याची भीती वाटत होती. आम्ही त्या जुन्या व्याख्या पूर्ण बदलून टाकल्या आहेत. आम्ही लघु उद्योगांची उलाढाल आणि त्यांची व्याप्तीची मर्यादा वाढवली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने पुन्हा एकदा एमएसएमईच्या परिघाचा आणखी विस्तार केला आहे आणि त्यांना आणखी सवलतीही दिल्या आहेत. आधीच्या काळामध्ये ‘एमएसएमई‘ समोर पत पुरवठ्याचीही मोठीच समस्या होती. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही ही पत पुरवठ्याची समस्या संपुष्टात आणण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आज नवयुवकांना आपला उद्योग सुरू करण्याची इच्छा झाली तर त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत त्वरित निधी मिळतो. लहान आणि मध्यम उद्योगांना आर्थिक बळकटी देण्यासाठी आम्ही पत हमी योजना सुरू केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदीनुसार एमएसएमईसाठी कर्ज घेण्यासाठी 20 कोटी रूपयांपर्यंत मर्यादा वाढवली आहे. एमएसएमईसाठी पाच लाखाच्या मर्यादेपर्यंत क्रेडिट कार्ड सुविधाही दिली जात आहे. आम्ही येथे नवीन उद्योग, विशेष करून एमएसएमईसाठी अनुकूल वातावरण तयार करीत आहोत. यासाठी प्रक्रिया अधिक सरल- सुलभ केली जात आहे. कानपूरच्या पारंपरिक चामड्याच्या वस्तू तसेच होजिअरी उद्योगांना ‘एक जिल्हा, एक उत्पादन‘ यासारख्या योजनांच्या माध्यमातून सशक्त केले जात आहे. आमच्या या प्रयत्नांचा लाभ कानपूरच्या जोडीनेच उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांनाही मिळेल.
मित्रांनो,
आज उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणुकीसाठी अभूतपूर्व आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. गरीब कल्याणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणून त्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मध्यम वर्गाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही सरकार त्यांच्याबरोबरीने उभे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही 12 लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. यामुळे कोट्यवधी मध्यमवर्गीय परिवारांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला आहे. त्यांना नवीन ताकद मिळाली आहे. आम्ही सेवा आणि विकासाचे हे संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने पुढे जाणार आहोत. आम्ही देशाला, उत्तर प्रदेशाला एका नवीन विक्रमी उंचीवर घेवून जाण्यासाठी परिश्रम करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. कानपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आपल्या सर्वांना, माझ्या कानपूरच्या सर्व बंधू-भगिनींना खूप-खूप शुभेच्छा देतो.
खूप- खूप धन्यवाद!!
***
M.Pange/S.Kane/S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2132989)