ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री डार्क पॅटर्नसंदर्भात हितधारकांची भेट घेणार


अन्न, औषध निर्मिती, प्रवास, सौंदर्यप्रसाधने, किरकोळ विक्री, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या सहभागी होणार

Posted On: 26 MAY 2025 1:59PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी 28 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे  हितधारकांच्या उच्चस्तरीय बैठकीत डार्क पॅटर्नबाबत ग्राहकांच्या चिंता दूर करतील. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अधिक प्रभावी उपाय शोधणे हा या बैठकीचा उद्देश आहे.

अन्न, औषध निर्मिती , प्रवास, सौंदर्यप्रसाधने, किरकोळ विक्री, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या या बैठकीत सहभागी होतील. काही प्रमुख हितधारकांमध्ये ऍमेझॉन , फ्लिपकार्ट ,1Mg.com , ऍपल , बिग बास्केट , मिशो , मेटा , मेक माय  ट्रिप , पेटीएम , ओला , रिलायन्स रिटेल लि . , स्विगी , झोमॅटो , यात्रा , उबर , टाटा , इझ माय ट्रिप , क्लिअर ट्रिप , इंडिया मार्ट , इंडिगो एअरलाईन्स , xigo, जस्ट डायल , मेडिका बाझार , नेटमेड्स , ओएनडीसी , थॉमस कुक आणि व्हाट्सऍप यांचा समावेश आहे. ही यादी ग्राहक हक्कांना चालना देण्यात आणि पारदर्शक, विश्वासार्ह बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी उद्योग सहभाग महत्त्वाचा आहे या केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या विश्वासाला अधिक बळ देते.

प्रमुख उद्योग संघटना तसेच स्वयंसेवी ग्राहक संघटना आणि आघाडीची राष्ट्रीय कायदा विद्यापीठे देखील या बैठकीत सक्रीय सहभागी होतील.  त्यांचे अभ्यासपूर्ण विचार , संशोधन आणि नियामक दृष्टिकोन मजबूत आणि अंमलबजावणीयोग्य उपाय प्रदान करण्यासाठी मौल्यवान सूचना देतील.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास आणि निष्पक्ष व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देण्याप्रति आपल्या अतूट  वचनबद्धतेसह डार्क पॅटर्नच्या अन्याय्य व्यापार पद्धतीला आळा घालण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहे. डार्क पॅटर्न म्हणजे  फसवी वापरकर्ता इंटरफेस डिझाइन जी ग्राहकांची दिशाभूल करते आणि अनिच्छेने निवड करण्यास भाग पाडते . या पद्धती ग्राहकांचा विश्वास कमी करतात, बाजारातील चैतन्य दूषित  करतात आणि डिजिटल कॉमर्सच्या सचोटीला  गंभीर धोका निर्माण करतात.

डार्क पॅटर्नविरोधात लढण्यासाठी विभागाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. व्यापक हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, विभागाने 30 नोव्हेंबर   2023  रोजी डार्क पॅटर्न प्रतिबंधक व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीज्यात ई-कॉमर्समधील  13 प्रमुख डार्क पॅटर्न चिन्हांकित केले गेले. यामध्ये फॉल्स अर्जन्सी, बास्केट स्नीकिंग, कन्फर्म शेमिंग, फोर्स्ड अॅक्शन, सबस्क्रिप्शन ट्रॅप, इंटरफेस इंटरफेरन्स, बेट अँड स्विच, ड्रिप प्राइसिंग, डिसगाईज्ड अॅडव्हर्टायझमेंट, नॅगिंग, ट्रिक क्वेश्चन, सास बिलिंग आणि रॉग मालवेअर यांचा समावेश आहे.

विभागाच्या अग्रगण्य उपक्रमांपैकी एक म्हणजे डार्क पॅटर्न बस्टर हॅकेथॉन 2023 जे 26 ऑक्टोबर 2023रोजी आयआयटी (बीएचयू) च्या सहकार्याने सुरू झाले.  या देशव्यापी नवोन्मेष आव्हानात आयआयटी, एनआयटी आणि इतर विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि व्यक्तींना डार्क पॅटर्न शोधण्यासाठी आणि त्याविरोधात  लढण्यासाठी तंत्रज्ञान  उपाय - ऍप्स, ब्राउझर एक्सटेंशन आणि एआय टूल्स - डिझाइन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.  हॅकेथॉनच्या निकालांच्या आधारे विभागाने आयआयटी (बीएचयू) च्या सहकार्याने तीन शक्तिशाली ग्राहक संरक्षण अॅप्स विकसित केले आहेत जे राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 रोजी सुरु करण्यात आले.

विभागाने व्यापक ग्राहक जागरूकता मोहिमा राबवल्या आहेत आणि फसव्या पद्धती ओळखण्यासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सक्रीयपणे लक्ष ठेवले आहे. ई-कॉमर्समध्ये ग्राहक संरक्षणासाठी समग्र आणि समावेशक दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी विभाग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, प्रमुख धोरणकर्ते आणि ग्राहक संघटनांशी निरंतर  संवाद साधत आहे.

ग्राहक संरक्षण आणि व्यवसाय सुलभता ही परस्परविरोधी नाहीत तर पूरक उद्दिष्टे आहेत यावर विभाग भर देतो. ही हितधारक बैठक प्रशासनासाठी विभागाच्या प्रगतीशील, सहभागी दृष्टिकोनाचे उदाहरण आहे - जी व्यवसायांसाठी समान संधींना प्रोत्साहन देतानाच नियामक परिसंस्था मजबूत करते.

अशा सार्वजनिक-खाजगी भागीदारींना चालना देऊन, ग्राहक व्यवहार विभाग असे भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जिथे ग्राहक सुरक्षा सर्वोपरि असेल आणि डिजिटल बाजारपेठा निष्पक्ष, पारदर्शक आणि  उत्तरदायी असतील.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131303) Visitor Counter : 3