पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानमधील बिकानेर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 MAY 2025 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2025

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

थाने सगलां ने राम-राम!

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीयुत भजन लाल जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, अर्जुन राम मेघवाल जी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी, प्रेमचंद जी, राजस्थान सरकारमधील अन्य मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी मदन राठौर जी, अन्य खासदार आणि आमदारगण, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.
तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने, आणि या भयंकर उष्णतेमध्ये इथे आला आहात. आणि आज या कार्यक्रमाशी, देशातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधूनही लाखो लोक आज ऑनलाइन आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, इतर लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत. देशभरातून जोडल्या गेलेल्या सर्व मान्यवरांचे, जनता-जनार्दनाचे, मी अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

मी येथे करणी मातेचा आशीर्वाद घेऊन तुमच्यामध्ये आलो आहे. करणी मातेच्या आशीर्वादाने विकसित भारत बनवण्याचा आमचा संकल्प आणखी मजबूत होत आहे. थोड्या वेळापूर्वी, विकासाशी संबंधित 26 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे येथे भूमीपूजन आणि लोकार्पण झाले आहे. मी या प्रकल्पांसाठी देशवासियांचे, राजस्थानमधील माझ्या बंधू-भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

विकसित भारत घडवण्यासाठी आज देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा एक मोठा महायज्ञ सुरू आहे. आपल्या देशातील रस्ते आधुनिक असावेत, आपल्या देशातील विमानतळ आधुनिक असावेत, आपल्याकडे रेल्वे आणि रेल्वे स्थानके आधुनिक असावीत, यासाठी गेल्या 11 वर्षांत अभूतपूर्व वेगाने काम करण्यात आले आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पायाभूत सुविधांच्या या कामांवर देश पूर्वी जितका पैसा खर्च करत होता, आज त्यापेक्षा 6 पट जास्त पैसा खर्च करत आहे, 6 पट जास्त. आज भारतात होत असलेल्या या विकास कामांना पाहून जगालाही आश्चर्य वाटत आहे. तुम्ही उत्तरेकडे जाल, तर चिनाब ब्रिज सारखी निर्मिती पाहून लोक थक्क होतात. पूर्वेकडे जाल, तर अरुणाचलमधील सेला टनेल, आसाममधील बोगीबिल ब्रिज तुमचे स्वागत करतात. पश्चिम भारतात आल्यास, मुंबईत समुद्रावर बांधलेला अटल सेतू दिसेल. टोकाकडे दक्षिणेकडे पाहिल्यास, पंबन ब्रिज दिसेल, जो अशा प्रकारचा, देशातील पहिला पूल आहे.

मित्रांनो,

आज भारत आपले रेल्वेचे जाळे देखील आधुनिक करत आहे. या वंदे भारत ट्रेन्स, अमृत भारत ट्रेन्स, नमो भारत ट्रेन्स, या देशाची नवीन गती आणि नवीन प्रगती दर्शवतात. सध्या देशात सुमारे 70 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यामुळे दूरदूरच्या भागांमध्येही आधुनिक रेल्वे पोहोचली आहे. गेल्या 11 वर्षांत, शेकडो रोड ओव्हर ब्रिज आणि रोड अंडर ब्रिज बांधले गेले आहेत. चौतीस हजार किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वे ट्रॅक टाकले गेले आहेत. आता ब्रॉड गेज लाइन्सवरील मानवरहित फाटके ही एक इतिहासजमा गोष्ट झाली आहे, ती संपली आहे. आम्ही मालगाड्यांसाठी स्वतंत्र विशेष रुळ, म्हणजेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे कामही वेगाने पूर्ण करत आहोत. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प वेगात सुरू आहे. आणि या सर्वांसोबतच, आम्ही एकाच वेळी देशातील सुमारे 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानके देखील आधुनिक करत आहोत.

मित्रांनो,

आधुनिक होत असलेल्या या रेल्वे स्थानकांना देशाने अमृत भारत स्थानक असे नाव दिले आहे. आज यापैकी 100 हून अधिक अमृत भारत स्थानके  तयार झाली आहेत. समाज माध्यमांवरही लोक पाहत आहेत की या रेल्वे स्थानकांची आधी काय अवस्था होती आणि आता कशा प्रकारे त्यांचे चित्र बदलले आहे.

मित्रांनो,

‘विकास देखील, वारसा देखील’ या मंत्राचे या अमृत भारत रेल्वे स्थानकांवर स्पष्टपणे दर्शन घडते.  स्थानिक कला आणि संस्कृतीची ही नवीन प्रतीके आहेत. जसे राजस्थानच्या मांडलगढ रेल्वे स्थानकावर महान राजस्थानी कला-संस्कृतीचे दर्शन होईल, बिहारच्या थावे स्थानकावर आई थावेवालीच्या पावन मंदिराला आणि मधुबनी चित्रकलेला दर्शवले आहे. मध्य प्रदेशातील ओरछा रेल्वे स्थानकावर तुम्हाला भगवान रामाचे तेजोवलय जाणवेल. श्रीरंगम स्थानकाच्या रचनेवर भगवान श्रीरंगनाथ स्वामीजींच्या मंदिराचा प्रभाव आहे. गुजरातचे डाकोर स्थानक रणछोडरायजींपासून प्रेरित आहे. तिरुवण्णामलै स्थानकाची रचना द्रविड वास्तुकलेनुसार केली आहे. बेगमपेट स्थानकावर तुम्हाला काकतीय साम्राज्याच्या वेळची वास्तुकला पाहायला मिळेल. म्हणजेच प्रत्येक अमृत स्थानकावर तुम्हाला भारताच्या हजारो वर्षांच्या वारशाचे दर्शन देखील होईल. ही स्थानके प्रत्येक राज्यात पर्यटनालाही प्रोत्साहन देण्याचे माध्यम बनतील, तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी देतील. आणि मी त्या-त्या शहरातील नागरिकांना, रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवाहन करतो, की या सर्व संपत्तीचे मालक तुम्ही आहात, त्यामुळे तिथे कधीही घाण होऊ नये, या संपत्तीचे नुकसान होऊ नये, कारण तुम्ही त्याचे मालक आहात.

पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सरकार खर्च करत असलेल्या पैशातून रोजगार निर्माण होतो आणि व्यवसाय सुद्धा वाढतो. सरकार जे हजारो कोटी रुपये गुंतवत आहे, ते पैसे कामगारांच्या खिशात जात आहेत. ते पैसे दुकानदारांना तसेच दुकाने आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळत आहेत. वाळू, खडी आणि सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रक आणि टेम्पो चालकांनाही याचा फायदा होतो आहे. आणि एकदा पायाभूत सुविधा विकसित झाल्या की त्यांचे अनेक फायदे आहेत. शेतकऱ्यांचा माल कमी खर्चात बाजारात पोहोचतो, नासाडी कमी होते. जिथे रस्ते चांगले असतात, नवीन रेल्वेगाड्या पोहोचतात, तिथे नवीन उद्योग सुरू होतात, पर्यटनाला मोठी चालना मिळते, म्हणजेच पायाभूत सुविधांमध्ये गुंतवलेल्या पैशाचा सर्वाधिक फायदा प्रत्येक कुटुंबाला, विशेषतः आपल्या युवा वर्गाला होतो.

मित्रहो,

पायाभूत सुविधांवर होत असलेल्या कामाचा आपल्या राजस्थानलाही मोठा फायदा होतो आहे. राजस्थानातील प्रत्येक गावात आज चांगले रस्ते बांधले जात आहेत. सीमा भागातही उत्कृष्ट रस्ते बांधले जात आहेत. यासाठी गेल्या 11 वर्षांत एकट्या राजस्थानमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्र सरकार राजस्थानमधील रेल्वेच्या विकासासाठी यावर्षी सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2014 सालच्या आधीच्या तुलनेत ही रक्कम 15 पट जास्त आहे. थोड्या वेळापूर्वीच, येथून मुंबईला जाणाऱ्या नवीन रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आजच, अनेक भागांमध्ये आरोग्य, पाणी आणि वीजेशी संबंधित योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे आपल्या राजस्थानामधील शहरांना आणि गावांना जलद गतीने प्रगतीकडे वाटचाल करता यावी, हे या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. राजस्थानमधील युवा वर्गाला त्यांच्याच शहरात चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत.

मित्रहो,

राजस्थानच्या औद्योगिक विकासासाठी सुद्धा दुहेरी इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. येथील भजनलाल जी यांच्या सरकारने विविध क्षेत्रांसाठी नवीन औद्योगिक धोरणे जारी केली आहेत. या नवीन धोरणांचा फायदा बिकानेरलाही होईल आणि तुम्हाला माहिती आहेच की जेव्हा बिकानेरचा उल्लेख केला जातो तेव्हा बिकानेरी भुजियाची चव आणि बिकानेरी रसगुल्ल्यांचा गोडवा जगभरात आपली ओळख निर्माण करेल आणि विस्तार सुद्धा करेल. राजस्थानमधील रिफायनरीचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. यामुळे राजस्थान पेट्रोलियम आधारित उद्योगांचे एक मुख्य केंद्र होईल. अमृतसर ते जामनगर असा 6 लेनचा आर्थिक कॉरिडॉर राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमानगड, बिकानेर, जोधपूर, बाडमेर आणि जालोरमधून जात आहे. राजस्थानमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम सुद्धा जवळजवळ पूर्ण झाले आहे. ही कनेक्टिव्हिटी मोहीम राजस्थानमधील औद्योगिक विकासाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

मित्रहो,

राजस्थानमध्ये पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुद्धा वेगाने प्रगती करत आहे. राजस्थानमधील 40 हजारपेक्षा जास्त लोक या योजनेत सामील झाले आहेत. यामुळे लोकांचे वीज बिल शून्य झाले आहे आणि सौरऊर्जा निर्मिती करून लोकांना अर्थप्राप्तीचा एक नवीन मार्गही मिळाला आहे. आज येथे वीजेशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. या प्रकल्पांतून सुद्धा राजस्थानला जास्त वीज मिळेल. विजेचे वाढते उत्पादन राजस्थानमधील औद्योगिक विकासाला नवीन चालना देत आहे.

मित्रहो,

राजस्थानची ही भूमी महाराजा गंगा सिंहजींची भूमी आहे, ज्यांनी वाळूच्या मैदानात हिरवळ आणली. आपल्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे या प्रदेशापेक्षा चांगले कोणाला ठाऊक असेल? आपल्या बिकानेर, श्रीगंगानगर, हनुमानगड आणि पश्चिम राजस्थानमधील अशा अनेक भागांच्या विकासात पाण्याचे महत्त्व मोठे आहे. म्हणूनच आम्ही एकीकडे सिंचन प्रकल्प पूर्ण करत आहोत आणि त्याच वेळी, नद्याही जोडत आहोत. पार्वती-कालिसिंध-चंबळ लिंक प्रकल्पाचा फायदा राजस्थानातील अनेक जिल्ह्यांना होईल, येथील जमीन आणि शेतकऱ्यांना फायदा होईल.

मित्रहो,

देश आणि देशवासियांपेक्षा काहीही मोठे नाही, हे राजस्थानची ही शूर भूमी आपल्याला शिकवते. 22 एप्रिल रोजी, दहशतवाद्यांनी आमचा धर्म विचारून आमच्या बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्या गोळ्या पहलगाममध्ये झाडल्या गेल्या होत्या, पण त्या गोळ्यांनी 140 कोटी देशवासीयांच्या हृदयाला घरे पडली होती. त्यानंतर देशातील सर्व नागरिकांनी एकजूट होऊन, दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल आणि त्यांना कल्पनेपेक्षाही वाईट शिक्षा दिली जाईल असा संकल्प केला. आज, तुमच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्याच्या शौर्यामुळे, आम्ही तो संकल्प पूर्ण केला आहे. आमच्या सरकारने तिन्ही सैन्यदलांना मोकळीक दिली होती आणि तिन्ही दलांनी मिळून असा चक्रव्यूह रचला की पाकिस्तानला गुडघे टेकावेच लागले.

मित्रहो,

22 तारखेला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे सर्वात मोठे नऊ तळ उद्ध्वस्त केले. जेव्हा कपाळाचे कुंकू अर्थात सिंदूर बारूद होतो, तेव्हा काय होते हे जगानेही पाहिले आणि देशाच्या शत्रूंनीही पाहिले आहे.

खरे तर मित्रहो,
    
पाच वर्षांपूर्वी बालाकोटमध्ये देशाने एयर स्ट्राइक केल्यानंतर, माझी पहिली जाहीर सभा राजस्थानमधील सीमेवरच झाली होती, हा योगायोगच म्हणावा लागेल.

या वीरभूमीचेच हे सत्व आहे, की असा योग जुळून येतो. यावेळी जेव्हा ऑपरेशन सिंदूर झाले त्यानंतर माझी पहिलीच सार्वजनिक सभा येथे या वीरभूमीत, राजस्थानच्या सीमेवर, बिकानेरमध्ये तुम्हा सर्वांच्या साक्षीने होत आहे.

मित्रांनो

चुरु मध्ये मी म्हटले होते, एअर स्ट्राईकनंतर मी आलो होतो तेव्हा मी म्हटले होते, - या मातीची शपथ आहे मला, मी देशाला मागे हटू देणार नाही, देशाला कोणाही समोर वाकू देणार नाही.’ आज मी राजस्थानच्या भूमीवरून देशवासियांना अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो, आज देशाच्या कानाकोपऱ्यातून तिरंगा यात्रेचा जो ओघ सुरु आहे, मी देशवासियांना सांगतो,- जे, जे कुंकू पुसायला निघाले होते, जे कुंकू पुसायला निघाले होते, त्यांना आम्ही मातीत गाडले आहे. जे हिंदुस्तानचे रक्त सांडत होते, जे हिंदुस्तानचे रक्त सांडत होते, त्यांनी आज थेंबा-थेंबाचा हिशोब चुकता केला आहे. ज्यांना वाटत होते, ज्यांना असे वाटत होते, भारत शांत बसेल, तेच आज घरात लपून बसले आहेत. जे स्वतःच्या शस्त्रांचा गर्व करत होते, जे स्वतःच्या शस्त्रांचा गर्व करत होते, ते आज ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो,
 
हा सूडाचा खेळ नव्हे, हा सूडाचा खेळ नव्हे, तर हे न्यायाचे नवे रुप आहे, हे न्यायाचे नवे रुप आहे, हे ऑपरेशन सिंदूर आहे. हा केवळ आक्रोश नाही, हा केवळ आक्रोश नाही, तर हे सामर्थ्यवान भारताचे रौद्र रूप आहे. हे भारताचे नवे रुपडे आहे. आधी, आधी घरात घुसून वार केला होता, आधी घरात घुसून वार केला होता, आता सरळ छातीवर प्रहार केला आहे. दहशतवादाचा फणा चेचण्याची, दहशतवादाचा फणा चेचण्याची हीच नीती आहे, हीच पद्धत आहे. हाच भारत आहे, नवा भारत आहे. बोला-

भारत मातेचा विजय असो!

भारत मातेचा विजय असो!

भारत मातेचा विजय असो!

मित्रांनो,

ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद संपवून टाकण्यासाठी तीन तत्वे निश्चित केली आहेत. पहिले तत्व- भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर ठोस उत्तर दिले जाईल. त्याची वेळ आमच्या सेना निश्चित करतील, पद्धत देखील आमच्या सेनाच निश्चित करतील आणि अटी देखील आमच्याच असतील. दुसरे तत्व- अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांना भारत घाबरत नाही. आणि तिसरे तत्व म्हणजे आम्ही दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना आणि दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या सरकारला वेगवेगळे समजत नाही, ते एकच आहेत असे मानतो. पाकिस्तानचा हा स्टेट आणि नॉन-स्टेट अॅक्टरचा खेळ आता चालणार नाही. तुम्ही पाहिलेच असेल, पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्यासाठी आपल्या देशाची सात वेगवेगळी प्रतिनिधीमंडळे जगभरात पोहोचली आहेत. यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोक आहेत, परराष्ट्र धोरणाचे जाणकार आहेत, सन्माननीय नागरिक आहेत, आता पाकिस्तानचा खरा चेहेरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल.

मित्रांनो,

पाकिस्तान भारताला समोरासमोरच्या युद्धात कधीच मात देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा थेट लढाई होते तेव्हा, पुन्हा पुन्हा पाकिस्तानला गुडघे टेकावे लागतात. म्हणूनच पाकिस्तानने दहशतवादाला भारताविरुद्ध लढण्याचे साधन बनवले आहे. स्वातंत्र्यानंतर, गेली अनेक दशके हेच होत आले आहे. पाकिस्तान दहशत पसरवत होता, निर्दोष लोकांची हत्या करत होता, भारतात भीतीचे वातावरण निर्माण करत होता, मात्र पाकिस्तान एक गोष्ट विसरून गेला, आता भारतमातेचा सेवक मोदी येथे निधड्या छातीने उभा आहे. मोदींचे डोके शांत आहे, शांतच असते, मात्र मोदींचे रक्त उष्ण असते. आणि आता तर मोदींच्या नसानसातून रक्त नाही तर उष्ण सिंदूर वाहतो आहे.आता भारताने हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्याची जबर किंमत मोजावी लागेल. आणि ही किंमत पाकिस्तानच्या सेनेला मोजावी लागेल, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल.
 
मित्रांनो,

जेव्हा मी दिल्लीहून येथे आलो तेव्हा बिकानेरच्या नाल विमानतळावर उतरलो. पाकिस्तानने या हवाई तळाला देखील लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला या हवाई तळाचे किंचितही नुकसान करता आले नाही. आणि तेच, येथून थोड्या अंतरावर सीमेपलीकडे पाकिस्तानचा रहीमयार खान हवाई तळ आहे, तो कधी सुरु होईल, माहित नाही, अतिदक्षता  विभागात आहे. भारतीय सेनेच्या अचूक हल्ल्याने या हवाईतळाला उध्वस्त करून टाकले आहे.

मित्रांनो,

पाकिस्तानशी व्यापार होणार नाही आणि चर्चा सुद्धा होणार नाही. जर चर्चा झालीच तर ती पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरची, पाकव्याप्त काश्मीरची. आणि जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना भारतात पाठवणे सुरूच ठेवले तर त्याला पै-पैशासाठी अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तानला आता भारताच्या हक्काचे पाणी मिळणार नाही, भारतीयांचे रक्त सांडणे आता पाकिस्तानला महागात पडणार आहे. हा भारताचा निर्धार आहे, आणि जगातील कोणतीही शक्ती आम्हाला या निर्धारापासून विचलित करू शकत नाही.
 
बंधू आणि भगिनींनो,

विकसित भारताच्या निर्मितीसाठी सुरक्षा आणि समृद्धी दोन्हींची गरज आहे. आणि जेव्हा भारताचा कानाकोपरा मजबूत असेल तेव्हाच हे घडू शकते. आजचा हा कार्यक्रम म्हणजे, भारताच्या समतोल विकासाचे, भारताच्या वेगवान विकासाचे उत्तम उदाहरण आहे. मी पुन्हा एकदा या वीर धरतीवरून सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. माझ्यासोबत बोला, दोन्ही मुठी घट्ट मिटून, संपूर्ण ताकदीने बोला-

भारत मातेचा विजय असो!

भारत मातेचा विजय असो!

भारत मातेचा विजय असो!

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

ST/SP/S.Patil/M.Pange/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2130807)