शिक्षण मंत्रालय
शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखू आणि मादक पदार्थ- मुक्त करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने देशव्यापी अंमलबजावणी मोहिमेचा केला प्रारंभ
Posted On:
23 MAY 2025 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 मे 2025
तंबाखू आणि मादक पदार्थांच्या गैरवापराच्या हानिकारक प्रभावांपासून विद्यार्थी आणि तरुणांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शैक्षणिक संस्थांभोवतीचा परिसर तंबाखू, दारू आणि अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
15, मे 2025 रोजी झालेल्या नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (एनसीओआरडी) च्या 8 व्या शिखर समितीच्या बैठकीनंतर, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू केली. गृह मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत, हानिकारक पदार्थांपासून युवकांचे रक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आणि शिक्षण व कायदा अंमलबजावणी विभागांमध्ये समन्वित प्रयत्न राखण्याचे आवाहन करण्यात आले.
हे का महत्त्वाचे आहे
भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश असून इथे 29 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. ही तरुण लोकसंख्या देशाच्या भविष्यासाठी एका प्रबळ शक्तीचे प्रतिनिधित्व करते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्यात्मक शक्तीचे संरक्षण करणे विकसित भारताच्या उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की युवकांमध्ये तंबाखूचे सेवन झपाट्याने वाढत आहे ज्यामुळे शाळा/महाविद्यालयीन परिसरात इतर स्वरूपातील मादक पदार्थांच्या गैरवापराचे प्रयोग वाढत आहेत. ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे (GYTS-2), 2019 मध्ये असे दिसून आले आहे की 13–15 वयोगटातील 8.5% भारतीय विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत होते. त्याहूनही चिंताजनक गोष्ट म्हणजे भारतात दररोज 5,500 हून अधिक मुले तंबाखू वापरण्यास सुरुवात करतात.
तंबाखूच्या वापरातूनच पुढे अधिक धोकादायक पदार्थांचा वापर सुरु होतो. बहुतेक प्रौढ वापरकर्ते किशोरावस्थेतच तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात करतात आणि विद्यमान कायदे असूनही, अनेकजण शाळांजवळ असलेल्या दुकानांमधून ही उत्पादने सहज खरेदी करू शकतात.
सरकारचा प्रतिसाद
या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी, शिक्षण मंत्रालय तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था मार्गदर्शक तत्त्वांची सक्रियपणे अंमलबजावणी करत आहे. शाळा आणि महाविद्यालये तंबाखूच्या वापरापासून आणि विक्रीपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 31 मे 2024 रोजी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थासाठी अंमलबजावणी नियमावली जारी केली होती. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था संबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास शाळांना मदत करणे, परिणामी विद्यार्थ्यांसाठी निरोगी, तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही नियमावली सर्व संबंधितांना तंबाखूच्या धोक्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणारी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यास आणि अंमलबजावणी करण्यास सक्षम बनवते.
तंबाखू- मुक्त शैक्षणिक संस्था मार्गदर्शक तत्वांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनी परिसर तंबाखू- मुक्त ठेवण्यासाठी हाती घ्यावयाचे नऊ उपक्रम नमूद केले आहेत -
- परिसराच्या आत 'तंबाखू- मुक्त क्षेत्र' फलक लावणे
- प्रवेशद्वारावर/हद्दीत 'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' फलक लावणे
- परिसरात तंबाखू वापराचे कोणतेही उदाहरण नसावे
- तंबाखूमुळे होणाऱ्या हानीबाबत जागरूकता सामग्री प्रदर्शित करणे
- दर सहा महिन्यांनी किमान एक तंबाखू नियंत्रण उपक्रम राबवणे
- तंबाखू विरोधी पर्यवेक्षकांची नियुक्ती
- शालेय आचारसंहितेत तंबाखू मुक्त धोरणाचा समावेश
- शैक्षणिक संस्थांभोवती 100 यार्ड अंतर पिवळी रेषा आखून तंबाखूमुक्त क्षेत्र निश्चित करणे
- या 100 यार्ड क्षेत्रात कोणतेही दुकान अथवा विक्रेता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, याची काळजी घ्यावी
पुढील दोन कृतींसाठी स्थानिक अधिकाऱ्यांचे तात्काळ सहकार्य आवश्यक आहे:
- कृती 8 - तंबाखूमुक्त क्षेत्र निश्चित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांभोवती 100 यार्ड वर पिवळी रेषा चिन्हांकित करणे.
- कृती 9 - त्या 100 यार्ड क्षेत्रात कोणतीही दुकाने अथवा विक्रेते तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाहीत याची खात्री करणे.
या उपाययोजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी मंत्रालयाने शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली होती.
एक महिन्याची अंमलबजावणी मोहीम
31 मे, 2025, जागतिक तंबाखू विरोधी दिवस ते 26 जून 2025, जागतिक अमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिवस हा एक महिना, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (COTPA), 2003 च्या कलम 6(b) ची अंमलबजावणी करण्यासाठीची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कायदा पुढील गोष्टींवर प्रतिबंध घालतो:
- शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री.
- अल्पवयीन मुलांना तंबाखूची विक्री करणे अथवा त्यांच्याकडून तंबाखू खरेदी करणे.
राज्यांना स्पष्ट स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी), अर्थात आदर्श कार्यपद्धती विकसित करण्याचे प्रोत्साहन दिले जाते, ज्याच्या सहाय्याने शाळा आणि महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची कोणतीही भीती न बाळगता, या कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार नोंदवता येते.
समाजाचा सहभाग आणि जनजागृतीचे महत्व
मंत्रालयाने या मिशनला पाठबळ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी), शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. जागरुकता निर्माण करून आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार करून, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासाकरता सुरक्षित स्थान निर्माण करण्यामध्ये समाजाचे योगदान महत्वाचे आहे.
तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य जनतेला हसत खेळत प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने मायजीओव्ही (MyGov) प्लॅटफॉर्मवर (https://quiz.mygov.in) 'जागतिक तंबाखू विरोधी दिन जागरूकता प्रश्नमंजुषा-2025' सुरू केली आहे. 22 मे 2025 ते 21 जुलै 2025 या काळात प्रश्नमंजुषा सुरु राहील. युवकांना तंबाखूपासून असलेल्या धोक्यांविषयी माहिती देऊन सक्षम करून, तंबाखू सेवना विरोधात मजबूत सामाजिक निकष तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
लिंक: https://quiz.mygov.in/quiz/world-no-tobacco-day-awareness-quiz/
या महत्त्वाच्या मोहिमेला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्रालयाचा असा विश्वास आहे की एकत्रितपणे, सातत्यपूर्ण प्रयत्न करून आणि सार्वजनिक सहकार्याने, भारत आपल्या शाळा आणि महाविद्यालये सुरक्षित, निरोगी आणि हानीकारक पदार्थांच्या प्रभावापासून मुक्त करू शकतो.
शैक्षणिक संस्थांचे परिसर सुरक्षित आणि निरोगी राहावेत, यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कालावधीत या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये सर्वांचा सक्रीय सहभाग राहील, याची खात्री करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130792)