आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
78 व्या जागतिक आरोग्य सभेत जागतिक आरोग्य बांधिलकीबाबत भारताचा दुजोरा
आयुष्मान भारतने व्यापक आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवून, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा तसेच प्रगत उपचारांसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करून डिजिटल आरोग्यसेवा स्वीकारण्यास गती दिल्याने सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्धतेचा मार्ग प्रशस्त: केंद्रीय आरोग्य सचिव
“भारताला अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने ट्रॅकोमा-मुक्त म्हणून प्रमाणित केले असून देश क्षयरोग, कुष्ठरोग, लिम्फॅटिक फायलेरियासिस, गोवर, रुबेला आणि काळाजार यांसारख्या आजारांचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध”
"साथीच्या रोगविषयक करारामुळे वैद्यकीय उपाययोजनांसाठी समतोल उपलब्धता, वेळेवर पारदर्शक डेटा आणि रोगजनक माहितीची देवाणघेवाण सुनिश्चित करावी आणि विशेषतः विकसनशील देशांसाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन द्यायला हवे"
Posted On:
21 MAY 2025 2:31PM by PIB Mumbai
भारताने आज 78 व्या जागतिक आरोग्य सभेच्या पूर्ण सत्राला संबोधित केले आणि "आरोग्यासाठी एक जग" या संकल्पनेंतर्गत जागतिक आरोग्य समतेसाठी आपल्या बांधिलकीला दुजोरा दिला. भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी नवनिर्वाचित समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय संवाद आणि सहकार्याच्या संधीचे स्वागत केले.

सर्वसमावेशक आरोग्यसेवेची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या आयुष्मान भारत सारख्या प्रमुख उपक्रमांनी घेतलेल्या परिवर्तनकारी पावलांसह, सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक आरोग्याप्रती भारताच्या वचनबद्धतेवर श्रीवास्तव यांनी भर दिला. "या कार्यक्रमामुळे व्यापक आरोग्यसेवेची उपलब्धता वाढली आहे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, प्रगत उपचारांसाठी आर्थिक संरक्षण प्रदान केले आहे आणि डिजिटल आरोग्यसेवेचा अंगीकार करण्यास गती दिली आहे, ज्यामुळे सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीचा मार्ग प्रशस्त झाला आहे," असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, माता आरोग्य, कुटुंब नियोजन, बालमृत्यू आणि मृत अर्भक दर कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी आणि संयुक्त राष्ट्रांच्या आंतर-संस्था समूहासह जागतिक संस्थांनी मान्यता दिली आहे. "भारताला अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने ट्रॅकोमा-मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे आणि देश क्षयरोग, कुष्ठरोग, लिम्फॅटिक फायलेरियासिस, गोवर, रुबेला आणि काळाजार यांसारखे आजार दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे" याकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्यांनी माहिती दिली की, एक प्रमुख धोरणात्मक पाऊल म्हणून, भारताने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना, त्यांची आर्थिक स्थिती काहीही असली तरी, आरोग्य कवच प्रदान केले आहे. "भविष्यातील आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही गेल्या दशकात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून 780 पर्यंत वाढवली आहे," असे त्यांनी निदर्शनास आणले.
राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि क्षमतांचा आदर करत जागतिक सहकार्य वाढवणाऱ्या कायदेशीर, बंधनकारक चौकटीसाठी भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य सचिवांनी केला. "साथीच्या रोग विषयक करारामुळे वैद्यकीय उपाययोजना, वेळेवर पारदर्शक डेटा आणि रोगजनक माहितीची देवाणघेवाण सर्वांना सारखीच होण्याची सुनिश्चिती करावी. विशेषतः विकसनशील देशांसाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन दिले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
आपल्या समारोपाच्या भाषणात, त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि सदस्य राष्ट्रांचे साथीच्या रोगाशी संबंधित करार पुढे नेण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले. आरोग्य सचिवांनी भविष्यातील आरोग्य आव्हानांना तोंड देण्यावर भर दिला आणि प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा उपलब्ध असतील आणि कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याची बांधिलकी व्यक्त केली.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130404)