राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

Posted On: 16 MAY 2025 6:30PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 मे, 2025) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित  कार्यक्रमात संस्कृत पंडित  जगद्गुरू रामभद्राचार्य जी यांना 58 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे अभिनंदन केले. पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या गुलजार यांचेही त्यांनी  ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अभिनंदन केले. गुलजार जी लवकर बरे व्हावेत  आणि ते लवकरच सक्रिय व्हावेतकला, साहित्य, समाज आणि देशासाठी त्यांनी योगदान देत राहावे, अशा सदिच्छा राष्ट्रपतींनी  व्यक्त केल्या.

साहित्य समाजाला एकत्र आणते आणि उद्बोधन करते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. 19 व्या शतकातील समाज प्रबोधनापासून ते 20 व्या शतकातील स्वातंत्र्य लढ्यापर्यंत कवी आणि लेखकांनी लोकांना एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले 'वंदे मातरम' हे गीत जवळजवळ 150 वर्षांपासून भारतमातेच्या मुलांना जागृत करत आहे आणि पुढेही ते करत राहील. वाल्मिकी, व्यास आणि कालिदासांपासून ते रवींद्रनाथ टागोर यांसारख्या महाकवींच्या अजरामर काव्यातून आपल्याला भारताच्या चैतन्याची स्पंदने जाणवतात. ही स्पंदने भारतीयत्वाचा स्वर आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

सन 1965 पासून विविध भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांचा गौरव केल्याबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय ज्ञानपीठ न्यासाचे कौतुक केले. भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांना पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत, भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडकर्त्यांनी सर्वोत्तम साहित्यिकांची निवड केली आहे आणि या पुरस्काराची प्रतिष्ठा जपली आहे आणि ती संवर्धित केली आहेअसे त्या म्हणाल्या.

आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी स्वामी रामभद्राचार्य  यांच्या बहुविध योगदानाचे कौतुक केले. उत्कृष्टतेचे उदाहरण त्यांनी स्थापित केले असल्याचे, त्या म्हणाल्या. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग  असूनही त्यांनी त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाने साहित्य आणि समाजाची असाधारण सेवा केली आहे.  रामभद्राचार्य यांनी साहित्य आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.  रामभद्राचार्य यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन भावी पिढ्या साहित्य निर्मिती, समाज-निर्माण आणि राष्ट्र-निर्माणात योग्य मार्गावर पुढे जात राहतील असा विश्वास राष्ट्रपतींनी  व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129201)