माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 : प्रत्येक सर्जकाला एक स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ
3 दिवसांत 3000+ बीटूबी बैठकांमध्ये झालेल्या 1328 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या व्यावसायिक व्यवहारामुळे वेव्हज बाजारने केली उल्लेखनीय यशाची नोंद; महाराष्ट्र सरकारने केले माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार
जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज जाहीरनामा
वेव्हेक्स स्टार्ट अप ऍक्सलरेटरचा भाग म्हणून 50 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित
सर्जनशील अर्थव्यवस्थेकरिता क्षमता उभारणीमध्ये भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (IICT) महत्त्वाचा टप्पा ठरणार
क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार
वेव्हजमध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित
Posted On:
04 MAY 2025 9:46PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 4 मे 2025
वेव्हज अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा आज मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली. प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी प्रारंभ झाला. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हे, तर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.
उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे
पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेत, गेल्या चार दिवसांत वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्च-स्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होता, ज्यामुळे जगभरातील विचारवंत, उद्योगधुरीन, धोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रे, विभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारे, शिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.
वेव्हजची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, डिजिटल मिडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात 1,000 हून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसह, शिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली - अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.
पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानी, टेड सॅरंडोस, किरण मजुमदार-शॉ, नील मोहन, शंतनू नारायण, मार्क रीड, ॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योग, जाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, अक्षय कुमार, नागार्जुन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होते, आभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.
वेव्हज 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंग, फरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईम द्वारे पंचायत बनवणे, ए आर लेन्स डिझाइन करणे, ए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.
वेव्हज मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारण, डिजिटल मीडिया, ओटीटी, ए आय, संगीत, बातम्या, लाइव्ह कार्यक्रम, ॲनिमेशन, गेमिंग, आभासी निर्मिती, चित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटा, गुगल, ॲमेझॉन, एक्स, स्नॅप, स्पॉटीफाय, डी एन ई जी, नेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्की, सी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.
वेव्हज बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले; महाराष्ट्र सरकारने 'माध्यम आणि मनोरंजन' क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले
वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3,000 हून अधिक B2B बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे 'देवी चौधराणी' चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि 'व्हायलेटेड' चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.
महाराष्ट्र सरकारने वेव्हज मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.
जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी 'वेव्हज जाहीरनामा' स्वीकारला
मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज 2025) आयोजित करण्यात आलेला जागतिक माध्यम संवाद 2025 हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होता ज्यामध्ये 77 राष्ट्रांचा सहभाग होता, जो जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. वेव्हज 2025 मधील जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे ‘वेव्हज घोषणापत्र’ स्वीकारले, त्यामध्ये डिजिटल अंतर कमी करण्याची तातडी आणि जागतिक शांतता व सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांचा वापर यावर भर देण्यात आला. चर्चेमध्ये विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या सर्जक अर्थव्यवस्थेत वैयक्तिक कथांचे महत्त्व अधोरेखित झाले.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि परंपरेच्या समन्वयावर जोर देत, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाद्वारे तरुणांना सक्षम करण्याची गरज मांडली. माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी आशय-सामग्री निर्मितीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला आणि स्थानिक आशय-सामग्री, सह-निर्मिती करार आणि संयुक्त निधी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या “क्रिएट इन इंडिया” स्पर्धेतून 700 हून अधिक जागतिक सर्जकांना यशस्वीपणे निवडण्यात आले, आणि पुढील आवृत्तीत ही स्पर्धा 25 जागतिक भाषांमध्ये विस्तारित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. या परिषदेने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भविष्यातील जागतिक सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली, तसेच त्यामध्ये सर्जनशील उत्कृष्टता आणि नैतिक सामग्री निर्मितीवर भर देण्यात आला.
वेव्हज: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक
वेव्हज स्टार्ट-अप प्रवेगकांनी 45 प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांपैकी लुमिकाई, जिओ, कॅबिल, वॉर्मअप व्हेंचर्स सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अद्वितीय कल्पना थेट मांडण्यासाठी 30 माध्यम आणि मनोरंजन स्टार्ट-अप्सची निवड केली. 1000 हून अधिक नोंदणींसह, या उपक्रमामुळे सध्या सुरू असलेल्या 50 कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहेत. याशिवाय, 100 हून अधिक स्टार्ट-अप्सनी समर्पित स्टार्ट-अप पॅव्हेलियनमध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली. वेव्हज एक उपक्रम म्हणून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे एंजल गुंतवणूकदार नेटवर्क तयार करून स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी आणि वाढीसाठी एक स्पष्ट गुंतवणूक परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. टियर 1 आणि टियर 2 मधील स्टार्ट-अप्स वेव्हज मध्ये चमकले आणि त्यांच्या संस्थापकांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. अशा निर्मात्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी, वेव्हज, इनक्यूबेटरचे नेटवर्क स्थापित करेल ज्यामध्ये समर्पित मार्गदर्शक आणि बीज भांडवल गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार असतील. WAVEX अनोखे आहे कारण ते अशा कल्पनांना सुविधा देते ज्यांचे अद्याप मूर्त उत्पादन नाही, परंतु त्यांच्याकडे ठोस क्षमता आहे.
वेव्हज 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईतील वेव्हज परिषद 2025 मध्ये पाच महत्त्वपूर्ण अहवालांचे अनावरण केले. हे अहवाल भारताच्या समृद्ध माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचे सर्वसमावेशक विहंगावलोकन करतात, त्यात आशय सामग्री निर्मिती, धोरणात्मक चौकट आणि थेट कार्यक्रम यांसारख्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- माध्यम आणि मनोरंजनावरील सांख्यिकीय पुस्तिका 2024-25: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली ही सांख्यिकीय पुस्तिका भारताच्या माध्यम परिदृश्यातील वाढीचे कल, प्रसारण, डिजिटल माध्यम, चित्रपट प्रमाणन आणि सार्वजनिक माध्यम सेवांबाबत महत्त्वपूर्ण डेटा-आधारित अंतर्दृष्टी प्रदान करते. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांसाठी अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आवश्यक माहिती उपलब्ध करून देते.
- ‘फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स’ - बीसीजी: बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा हा अहवाल भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेच्या विलक्षण वाढीवर प्रकाश टाकतो, त्यात 20 ते 25 लाख सक्रिय डिजिटल सर्जकांचा सहभाग आहे. या सर्जकांचा वार्षिक 350 अब्ज डॉलरहून अधिक खर्चावर प्रभाव पडतो, आणि 2030 पर्यंत हा आकडा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. हा अहवाल सर्जकांसोबत लघुकालीन व्यवहारांऐवजी दीर्घकालीन, प्रामाणिक भागीदारी निर्माण करण्यावर जोर देतो.
- ‘अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ - अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young): अर्न्स्ट अँड यंगचा हा अहवाल भारताला त्याच्या भाषिक विविधता, समृद्ध संस्कृती आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जागतिक सामग्री केंद्र म्हणून चित्रित करतो. यामध्ये अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांमध्ये भारताला 40%-60% खर्चाचा फायदा आणि भारतीय ओटीटी सामग्रीसाठी वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक राजकीय भूमिका बळकट होत आहे.
- कायदे आणि थेट कार्यक्रम क्षेत्रातील घडामोडी: ‘खैतान अँड कंपनी’च्या नव्या कायदेशीर मार्गदर्शक पुस्तिकेत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि त्यासंदर्भातील नियमावली यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, मिडिया क्षेत्रातील व्यावसायिकांना भारतातील नियामक चौकटीतून वाट काढण्यासाठी मदत मिळणार आहे. याशिवाय, भारतातील थेट कार्यक्रम क्षेत्रावर प्रकाशित करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेनुसार सध्या या क्षेत्राची 15% दराने वाढ होत असून, त्या पार्श्वभूमीवर, या वाढत्या उद्योगासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवाना प्रक्रियेतील सुलभता अत्यावश्यक आहे असेही या श्वेतपत्रिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ AVGC-XR क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील प्रतिभेचा जागतिक उत्सव
वेव्हज 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व 1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला स्टार बनवले आहे.
32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हजमधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती. होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी जगासमोर येण्याची एक संधी देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. "प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.
8वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार
वेव्हजचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या 8व्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तन, समावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.
भारत मंडप– ‘कला ते कोड’ प्रवास
वेव्हज 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा ‘कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या ‘भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.
‘भारत मंडप’ने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आश्चर्यचकीत झाले.
भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हते, तर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोली, कलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.
वेव्हजचा समारोप – सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प
वेव्हज 2025 ने सर्जनशीलता, व्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय करार, मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की, भारत नावीन्य, समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर, वेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाही, तर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा, गुंतवणूक आणि संधी देत राहील.
* * *
PIB Mumbai | JPS/NM/ST/SN/NC/SB/Shailesh/Sandesh/Vasanti/Nikhilesh/Shraddha/Nitin/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126878)
| Visitor Counter:
23