माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते वेव्हज 2025 मध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावरील प्रमुख माहिती अहवालाचे प्रकाशन
जागतिक सर्जनशील ऊर्जाकेंद्र म्हणून भारताच्या उदयावर टाकला प्रकाश
Posted On:
04 MAY 2025 4:45PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 4 मे 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेत भारताच्या गतिमान आणि वेगाने विकसित होणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचा व्यापक आढावा घेणारे पाच महत्त्वाचे अहवाल काल प्रकाशित केले.
प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींनी तयार केलेले हे अहवाल सर्जक अर्थव्यवस्था, आशय निर्मिती, कायदेशीर चौकटी, लाईव्ह इव्हेंट उद्योग आणि डेटा-समर्थित धोरण समर्थन याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात.

माध्यम आणि मनोरंजन 2024-25 वरील सांख्यिकी विषयक हस्तपुस्तिका
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली सांख्यिकी विषयक हस्तपुस्तिका डेटा-चालित धोरण आणि निर्णय घेण्यासाठी एक आवश्यक संसाधन म्हणून काम करते. त्यात क्षेत्रीय कल, प्रेक्षकांचे वर्तन, महसूल वाढीचे नमुने आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय मार्ग यांचे संकलन आहे. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या हस्तपुस्तिकेची संरचना करण्यात आली आहे, जेणेकरून ते अनुभवजन्य पुराव्यावर आणि व्यावहारिक वास्तवांवर आधारित राहण्याची खातरजमा होईल.
हस्तपुस्तिकेतील ठळक मुद्दे:
- पीआरजीआय मध्ये नोंदणीकृत प्रकाशने: 1957 मधील 5,932 वरून 2024-25 मध्ये 154,523 पर्यंत वाढली, ज्याचा चक्रवाढ वार्षिक विकास दर (सीएजीआर) 4.99% होता.
- प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेली पुस्तके: 2024-25 मध्ये बालसाहित्य, इतिहास, स्वातंत्र्यलढा, विज्ञान, पर्यावरण आणि चरित्र यासारख्या विषयांवर 130 पुस्तके प्रकाशित झाली.
- दूरदर्शन फ्री डिश: 2004 मध्ये 33 वाहिन्या होत्या ज्या 2025 मध्ये 381 पर्यंत वाढल्या.
- डीटीएच सेवा: मार्च 2025 पर्यंत 100% भौगोलिक व्याप्ती गाठली.
- आकाशवाणी (एआयआर):
- आता भारताच्या 98% लोकसंख्येपर्यंत व्याप्ती (मार्च 2025 पर्यंत).
- 2000 मध्ये आकाशवाणी केंद्रांची संख्या 198 होती जी वाढून 2025 मध्ये 591 झाली.
- खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या: 2004-05 मधील 130 वरून वाढून 2024-25 मध्ये 908 झाल्या.
- खाजगी एफएम केंद्र 2001 मधील 4 वरून 2024 पर्यंत 388 पर्यंत वाढली; अहवाल 31 मार्च 2025 पर्यंत राज्यनिहाय विवरण दर्शवतो.
- सामुदायिक रेडिओ केंद्र (सीआरएस): 2005 मध्ये 15 होती ती 2025 मध्ये 531 पर्यंत वाढली, ज्यामध्ये राज्य/जिल्हा/स्थाननिहाय तपशील समाविष्ट आहेत.
- चित्रपट प्रमाणन: प्रमाणित भारतीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची संख्या 1983 मधील 741 वरून 2024-25 मध्ये 3,455 पर्यंत वाढली, 2024-25 पर्यंत एकूण 69,113 चित्रपटांना प्रमाणित केले गेले.
- चित्रपट क्षेत्रातील विकास: पुरस्कार, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि एनएफडीसीने तयार केलेल्या माहितीपटांचा डेटा समाविष्ट आहे.
- डिजिटल माध्यम आणि सर्जक अर्थव्यवस्था: वेव्हज ओटीटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) ची स्थापना आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) अंतर्गत कामगिरीचा समावेश आहे.
- ऐतिहासिक कालक्रम: पीआरजीआय, आकाशवाणी, दूरदर्शन, इन्सँट-आधारित टीव्ही सेवा आणि खाजगी एफएम रेडिओची स्थापना यासह माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पे दर्शवतो.
- कौशल्यवर्धन उपक्रम: मंत्रालया अंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती कार्यक्रमांची माहिती.
- व्यवसाय सुलभता: माध्यम आणि सर्जकांसाठी सरलीकृत आणि पारदर्शक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत.
- ‘आशयापासून व्यापारापर्यंतः भारताच्या सृजनशील निर्मितीविषयक अर्थव्यवस्थेचा आढावा’- बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा(बीसीजी) अहवाल
'फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स : मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी' हा बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) चा अहवाल
या अहवालात भारताच्या डिजिटल युगातील सृजनशील निर्मितीविषयक अर्थव्यवस्थेचे अभूतपूर्व आकारमान आणि प्रभाव अधोरेखित केला आहे. भारतात कार्यरत असलेल्या 20 ते 25 लाख डिजिटल सृजनशील निर्मात्यांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सृजनशील निर्मिती परिसंस्थांपैकी एक आहे. या निर्मात्यांनी यापूर्वीच 350 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वार्षिक ग्राहक खर्चावर प्रभाव निर्माण केला असून—हा आकडा 2030 पर्यंत तिप्पट होऊन 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे.
केवळ आकडेवारीवर आधारित गणनेचा विचार न करता त्यापलीकडे जात कथाकथनकार म्हणून, संस्कृतीला आकार देणारे आणि आर्थिक कारक म्हणून सृजनशील निर्मात्यांच्या भूमिकेत होत जाणाऱ्या बदलाची दखल घेण्याचे आवाहन या अहवालाने केले आहे. व्यवसायांसाठी या बदलाचा अर्थ हा आहे की आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकणाऱ्या घडामोडींपेक्षा अस्सलपणा, विश्वास आणि सृजनशील तत्पर वृत्ती यामध्ये रुजलेल्या दीर्घ-कालीन भागीदाऱ्यांची उभारणी करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे.
‘अ स्टुडियो कॉल्ड इंडिया’ बाय अर्न्स्ट अँड यंग- भारताकडे जागतिक आशयकेंद्र म्हणून पाहतो
हा अहवाल भारताला केवळ आशयाचा वापर करणारा एक देश म्हणून नव्हे तर जगाचा एक स्टुडियो म्हणून समोर आणतो. भाषिक विविधता, सांस्कृतिक समृद्धी आणि तंत्रज्ञानात कुशल मनुष्यबळ – जे देशाला सीमा ओलांडणारे कथन तयार करण्यासाठी सज्ज करते अशा प्रकारच्या भारताच्या क्षमतांना तो अधोरेखित करतो. अतिशय मोठ्या आणि कुशल मनुष्यबळाच्या पाठबळावर भारतामध्ये ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांसाठी होणारा खर्च हा 40% ते 60% नी फायदेशीर आहे. त्याबरोबरच भारतीय कथाकथनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत जाणाऱ्या मागणीची देखील या अहवालात दखल घेण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय ओटीटी आशयाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांमध्ये परदेशातील प्रेक्षकांचे प्रमाण 25 % आहे. ही केवळ एक व्यावसायिक घडामोड नाही तर सांस्कृतिक मुत्सद्दीपणाचे प्रतिनिधित्व करते, जिथे भारतीय कथानके देशांच्या नव्हे तर खंडांच्या सीमा ओलांडून परदेशी प्रेक्षकांसोबत भावनिक आणि सांस्कृतिक बंध निर्माण करू लागली आहेत.
लीगल करंट्स: खेतान आणि कंपनीची भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 2025 विषयक एक नियामक पुस्तिका
सृजनशील निर्मितीला नियामक स्पष्टतेचे पाठबळ आवश्यक असल्याचे विचारात घेऊन खेतान आणि कंपनीने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक सविस्तर कायदेशीर आणि नियामक पुस्तिका तयार केली आहे. निर्माते, स्टुडिओज, प्रभावकर्ते आणि मंच यांच्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक म्हणून रचना केलेली ही पुस्तिका खालील प्रकारच्या प्रमुख कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन करतेः
- देशांतर्गत आणि परदेशी या दोन्ही संस्थांसाठी अनुपालन नियम
- आंतरराष्ट्रीय निर्मितीसाठी प्रोत्साहनलाभ योजना
- इन्फ्लुएंसर मार्केटिंग आणि डिजिटल कंटेंट संबंधित कायदेशीर चौकट
- गेमिंग क्षेत्रातील व्याख्या आणि जीएसटीसह कर आकारणीचे परिणाम
- सेलिब्रिटींच्या हक्कांचे संरक्षण
- एआय-द्वारे तयार आशयासंदर्भात (AI-generated content) नैतिक विचार आणि नियामक कारवाई
हितधारकांना सृजनशील अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने, नियमांनुसार आणि जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आवश्यक साधनांनी सुसज्ज ठेवण्याचा या पुस्तिकेचा उद्देश आहे.
भारताच्या लाईव्ह कार्यक्रम उद्योगावरील श्वेतपत्रिका
भारताच्या लाईव्ह कार्यक्रम उद्योगावरील श्वेतपत्रिकेत या क्षेत्रातील भक्कम वाढ आणि बदलत्या ग्राहक गतिशीलतेवर भर देण्यात आला आहे. 15% वार्षिक वाढीच्या दराने, या उद्योगाने एकट्या 2024 मध्ये ₹13 अब्ज इतक्या महसुलाची भर घातली आहे.
या अहवालात नमूद केले आहे की आता जवळपास 5 लाख चाहते केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी शहरांदरम्यान प्रवास करत आहेत, ज्यामुळे भारतात इव्हेंट-आधारित पर्यटनाचा उदय होत आहे. प्रीमियम म्हणजे अतिशय उच्च दर्जाच्या आणि महागड्या आणि क्युरेटेड म्हणजेच योग्य प्रकारे आखणी करून तयार केलेल्या कार्यक्रमांची मागणी वाढत आहे आणि शिलाँग, वडोदरा आणि जमशेदपूर यांसारखी द्वितीय श्रेणीची शहरे सांस्कृतिक केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.
मिळालेल्या या गतीला पाठबळ देण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी या श्वेतपत्रिकेत खालील बाबी अधोरेखित केल्या आहेत:
- अद्ययावत कार्यक्रम पायाभूत सुविधा
- सुव्यवस्थित आणि सोपी परवाना प्रक्रिया
- मजबूत आणि अधिक पारदर्शक संगीत अधिकार चौकट
- न्यता.एमएसएमई (MSME) आणि सृजनशील निर्मितीविषयक अर्थव्यवस्था धोरणांतर्गत लाईव्ह कार्यक्रम क्षेत्राला औपचारिक मा
अहवाल भारताची जागतिक सांस्कृतिक क्षेत्रात केवळ एक प्रेक्षक म्हणून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून धोरणात्मकदृष्ट्या पुन्हा परिकल्पना करण्याचे आवाहन करतो.
या प्रकाशन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव श्री संजय जाजू; एमआयबीचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार श्री आर.के. जेना; एमआयबीच्या सहसचिव श्रीमती मीनू बात्रा; आणि एमआयबीचे सहसचिव आणि एनएफडीसीचे एमडी श्री पृथुल कुमार उपस्थित होते. नॉलेज पार्टनर्सचे प्रतिनिधित्व करताना, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि भागीदार श्री विपिन गुप्ता, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या भागीदार पायल मेहता; अर्न्स्ट अँड यंगचे भागीदार श्री आशिष फेरवानी; अर्न्स्ट अँड यंगचे भागीदार श्री अमिया स्वरूप; खेतान अँड कंपनीच्या तंत्रज्ञान आणि मीडियाच्या भागीदार तनु बॅनर्जी; खेतान अँड कंपनीचे भागीदार श्री ईशान जोहरी; इव्हेंट्स एफएक्यू लाईव्हचे संचालक श्री विनोद जनार्दन; इव्हेंट्स एफएक्यूचे एमडी श्री दीपक चौधरी हे देखील मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | NM/Vasanti/Shailesh/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126772)
| Visitor Counter:
18