WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

तुमची विश्वासार्हता जपा, तुमच्या सीमा निश्चित करा, प्रामाणिकपणे संवाद साधा - वेव्हज पॅनेलचा सोशल मीडियामधील इन्फ्लुएन्सर्सना सल्ला


वेव्हज 2025 ने इन्फ्लुएन्सर्ससाठी सोशल मीडिया जाहिरातींसाठी सर्वोत्तम पद्धतींची रूपरेषा दिली आखून

 Posted On: 04 MAY 2025 3:27PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 4 मे 2025

 

आज मुंबईत  जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद  (वेव्हज) 2025 च्या चौथ्या दिवशी इन्फ्लुएन्सर्ससाठी सोशल मीडिया जाहिरातींसाठी सर्वोत्तम पद्धती या विषयावर एक समर्पित ब्रेकआउट सत्र आयोजित करण्यात आले होते.

पॅनेलमध्ये सहेली सिन्हा, संचालिका, एएससीआयआय; शिबानी अख्तर, चित्रपट अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर; मयंक शेखर, मनोरंजन पत्रकार; आणि विनय पिल्लई, मुख्य व्यवसाय अधिकारी, पॉकेट एसेस यांचा समावेश होता. सत्राचे संचालन खेतान अँड कंपनीच्या भागीदार  तनु बॅनर्जी यांनी केले.

डिजिटल अर्थव्यवस्थेत इन्फ्लुएन्सर्सची वाढती भूमिका आणि इन्फ्लुएन्सर जाहिरातींची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी आवश्यक  नैतिक, सर्जनशील आणि कायदेशीर चौकटींवर चर्चा करण्यात आली. शाश्वत इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आशय  जबाबदारी हे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत यावर पॅनेलने भर दिला.

शिबानी अख्तर यांनी ब्रँडेड आशय निर्मिती करताना स्वतःच्या मताशी  प्रामाणिक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभावी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी निर्मात्यांनी आशय आणि ब्रँडिंग प्रक्रियेत सहभागी होणे तसेच जाहिरातीतून  वैयक्तिक विश्वास आणि उद्देश प्रतिबिंबित होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी इन्फ्लुएन्सरना  त्यांचा ब्रँड संघटितपणे तयार करण्याचे आणि सर्व भागीदारीचा पाया म्हणून प्रामाणिकपणा राखण्याचे आवाहन केले.

निर्मात्यांना प्लॅटफॉर्म-विशिष्ट धोरणे स्वीकारण्याचा आणि सर्वांसाठी एकसमान  दृष्टिकोन टाळण्याचा सल्ला देत, विनय पिल्लई यांनी स्पष्ट केले की प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मवर  वेगळ्या प्रकारचे प्रेक्षक सहभागी होत असतात त्यामुळे त्याला अनुकूल कथाकथन तंत्रांची आवश्यकता असते. त्यांनी विचारपूर्वक ब्रँड तयार करण्याचे, विश्वासार्ह राहण्याचे आणि लक्ष्यित प्रेक्षकांना भावणारे माहितीपूर्ण आशय निर्मिती संबंधी  निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मयंक शेखर यांनी डिजिटल प्रभावाच्या उत्क्रांतीवर तसेच सेलिब्रिटी आणि निर्माता  संस्कृतीमधील अस्पष्ट रेषांबाबत विचार मांडले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की सध्याच्या युगात प्रभाव केवळ चित्रपट आणि टेलिव्हिजनपुरता मर्यादित नाही तर आता तो प्लॅटफॉर्म-प्रणित  आणि तंत्रज्ञान आधारित  आहे. त्यांनी निर्मात्यांना त्यांची विश्वासार्हता जपण्याची आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून किंवा इतरांच्या कामाची नक्कल करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.  त्यांनी प्रायोजित आशयातील सचोटी आणि तथ्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.

सहेली सिन्हा म्हणाल्या की इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या भागीदारीबद्दल पारदर्शक असले पाहिजे आणि पोस्ट सशुल्क आहे की प्रचारात्मक आहे हे उघड केले पाहिजे. इन्फ्लुएन्सर्सनी नैतिक, माहितीपूर्ण आणि त्यांच्या प्रेक्षकांचा विश्वास प्रतिबिंबित करणारी सामग्री विकसित करावी असे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की एएससीआयआय  उदयोन्मुख निर्मात्यांना कायदेशीर दायित्वे, जाहिरात मानके आणि आशय  जबाबदारी यावर मार्गदर्शनपर शैक्षणिक कार्यक्रम चालवते.

पॅनेलने एकत्रितपणे शिफारस केली की आशय  निर्मात्यांनी त्यांच्या सीमा परिभाषित कराव्यात, त्यांच्या फॉलोअर्सशी प्रामाणिकपणे संवाद साधावा आणि जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे आणि प्लॅटफॉर्म नियमांचे पालन करावे. प्रेक्षकांशी दीर्घकालीन संबंध स्थापित  करणे हे जाहिरातीच्या हेतूतील विश्वास आणि स्पष्टतेवर प्रामुख्याने अवलंबून असते असे ते म्हणाले.

सत्राचा समारोप करताना इन्फ्लुएन्सर जाहिरातींसाठी औपचारिक सर्वोत्तम पद्धतींना ठोस  मान्यता देऊन आणि डिजिटल जाहिरात परिसंस्थेत पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन  करण्यात आले.

 

* * *

PIB Mumbai |S.Bedekar/S.Kane/D.Rane


Release ID: (Release ID: 2126748)   |   Visitor Counter: 14