माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत सरकार सर्जक-प्रथम परिसंस्थेच्या निर्मितीसाठी कटिबद्ध: राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
मोशन पिक्चर असोसिएशनने वेव्हज् 2025 मध्ये भारताच्या मनोरंजन अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण अहवाल केला सादर
Posted On:
03 MAY 2025 9:59PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या अर्थात वेव्हज् 2025 च्या तिसऱ्या दिवशी, मोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीए) भारताच्या चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल सादर केला. या अहवालाच्या प्रकाशन समारंभाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि एमपीएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. मुरुगन यांनी एमपीए च्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर वाढता प्रभाव मान्य केला. “भारतीय कथा भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रभाव पाडू शकतात हे आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांनी सिद्ध केले आहे,” असे डॉ. मुरुगन म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. मुरूगन यांनी धोरणे, निर्मिती प्रोत्साहन आणि मजबूत बौद्धिक संपदा संरक्षणाद्वारे सर्जक-प्रथम परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिला. अलीकडील पायरसीविरोधी सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल युगात कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.
“चित्रपटसृष्टी केवळ आर्थिक चालकच नाही, तर एक महत्त्वाचा राजकीय आणि सांस्कृतिक पूल आहे. भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत भागीदारी वाढवून जागतिक स्तरावर आदरणीय आणि सुरक्षित सर्जनशील उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक आहे,” असे ते पुढे म्हणाले.

चार्ल्स रिव्हकिन यांनी भारताच्या मनोरंजन उद्योगासाठी “महत्त्वपूर्ण क्षण” असलेल्या या काळात एमपीएच्या भारतासोबतच्या सातत्यपूर्ण भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. “भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे आणि या प्रवासाला पाठिंबा देणे एमपीएसाठी अभिमानास्पद आहे,” असे रिव्हकिन म्हणाले.
अहवालातील प्रमुख निष्कर्ष सामायिक करताना रिव्हकिन यांनी सांगितले की, भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी उद्योगांनी 26 लाख रोजगारांना आधार दिला आणि वार्षिक आर्थिक उत्पादनात 60 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवले. एमपीएचे सदस्य स्टुडिओमधील गुंतवणूक, भागीदारी आणि दूरदृष्टीच्या धोरणांसाठी पाठिंबा देऊन भारताच्या मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
रिव्हकिन यांनी एमपीएच्या उद्दिष्टे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन यातील सुसंगती अधोरेखित केली, त्यात भारताची कथाकथन, दृश्य-परिणाम आणि जागतिक आशय-सामग्री निर्यातीतील ताकद दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
या सत्राची सांगता एमपीए अहवालातील प्रमुख ठळक मुद्द्यांच्या व्हिडिओ सादरीकरणाने झाली, त्यात धोरणकर्ते आणि जागतिक माध्यम नेत्यांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि समावेशक वाढीने प्रेरित भविष्यासाठी सामायिक दृष्टिकोन दिसून आला.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/N.Chitre/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126631)
| Visitor Counter:
23