WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

10 वे राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार प्रदान


केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते 12 सामुदायिक रेडिओ केंद्रांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मान

सामुदायिक रेडिओ ही देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे एक साधन; त्याद्वारे महत्वाच्या विकास उपक्रमांविषयी सर्वांचे होते प्रबोधन: डॉ. एल. मुरुगन

मुंबईतील वेव्हज 2025 मध्ये 8 व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ परिषदेचे आयोजन

 Posted On: 03 MAY 2025 5:55PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 3 मे 2025

 

मुंबईत जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) निमित्ताने आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय जनसंपर्क संस्था यांनी 8 व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ अर्थात सामुदायिक रेडिओ परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन यांनी 12 उत्कृष्ट सामुदायिक रेडिओ केंद्रांना 10 व्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कारांनी सन्मानित केले.

यावेळी डॉ. एल. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि नमूद केले की, अभिनवता, समावेशकता आणि प्रभावाद्वारे भारतातील सामुदायिक माध्यम क्षेत्र बळकट करणे हे राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे. सामुदायिक रेडिओ देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे एक साधन आहे याकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. देशभरातील सामुदायिक रेडिओ काही ना काही कल्याणकारी उद्देशांसाठी काम करत आहेत आणि भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासह चांगल्या कारणांना पाठिंबा देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सामुदायिक रेडिओ केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण विकासात्मक उपक्रमांची माहिती देशाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवत आहेत. ही केंद्र प्रामुख्याने महिला आणि आदिवासी जमातींसारख्या विविध समुदाय आणि गटांसाठी कल्याणकारी उपक्रमांना नवीन आयाम देत आहेत.

वेव्हजच्या पहिल्या आवृत्तीबद्दल बोलताना डॉ एल मुरुगन म्हणाले की यातूनच नवकल्पना उदयाला येतील आणि आगामी काळात सर्जनशील अर्थव्यवस्था हे एक उदयोन्मुख क्षेत्र होऊन मोठी भूमिका बजावेल.

  

चार वेगवेगळ्या संकल्पनांच्या अंतर्गत सन्मानित केलेल्या रेडिओ केंद्रांची यादी

याप्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव (प्रसारण) प्रिथुल कुमार आणि एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि आयआयएमसीच्या कुलगुरू डॉ. अनुपमा भटनागर उपस्थित होत्या.

  

या संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील 400 समुदाय रेडिओ केंद्रांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला तसेच त्यांना संवाद आणि सहकार्याची संधी प्राप्त झाली. देशभरात सध्या 531 समुदाय रेडिओ केंद्र कार्यरत आहेत. या परिषदेत सार्वजनिक संवाद आणि जनजागृती निर्माण करण्यात कम्युनिटी रेडिओची महत्त्वाची भूमिका आणि सामाजिक विकासात त्यांची क्षमता यावर भर देण्यात आला.

 

* * *

PIB Mumbai | NM/Vasanti/Bhakti/D.Rane


Release ID: (Release ID: 2126509)   |   Visitor Counter: 28