राष्ट्रपती कार्यालय
‘सन्मानाने वृद्धत्वाकडे’ या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या उपक्रमाला राष्ट्रपतींची उपस्थिती
वृद्ध व्यक्ती भूतकाळाशी जोडणारा दुवा असून भविष्याचे मार्गदर्शकही आहेत, त्यांचे मार्गदर्शन आपण महत्त्वाचे मानले पाहिजे आणि त्यांच्या मौल्यवान सहवासाचा आनंद घेतला पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
02 MAY 2025 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 2 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘सन्मानाने वृद्धत्वाकडे - ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपक्रम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलचे उद्घाटन, ज्येष्ठ नागरिक गृहांचे आभासी उद्घाटन, सहाय्यक उपकरणांचे वितरण आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि ब्रह्मकुमारी संस्था यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी यांचा समावेश होता.

या प्रसंगी बोलताना, राष्ट्रपती म्हणाल्या की, पालक आणि वृद्धांचा आदर करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. सामान्यतः कुटुंबांमध्ये असे दिसते की मुले त्यांच्या आजी-आजोबांसोबत खूप आनंदी असतात. वृद्ध व्यक्ती कुटुंबासाठी भावनिक आधारस्तंभ असतात. आपले कुटुंब समृद्ध होताना पाहून वृद्ध व्यक्ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी राहतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात, ज्येष्ठ नागरिकांचे समर्थन, प्रेरणा आणि मार्गदर्शन तरुण पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला अनुभव आणि ज्ञानाचा खजिना तरुणांना जटिल आव्हानांचा सामना करण्यास मदत करू शकतो. त्या म्हणाल्या की, वृद्धावस्था हा आयुष्यातला स्वतःला आध्यात्मिकरित्या सशक्त करण्याचा, आपल्या जीवन आणि कृतींचे विश्लेषण करण्याचा आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा टप्पा आहे. आध्यात्मिकरित्या सशक्त ज्येष्ठ नागरिक देश आणि समाजाला अधिक समृद्धी आणि प्रगतीकडे नेऊ शकतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की, वृद्ध व्यक्ती भूतकाळाशी जोडणारा दुवा असून भविष्याचे मार्गदर्शकही आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपले वृद्धत्व सन्मान आणि सक्रियतेने जगावे, ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. सरकार विविध उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सशक्त करत असल्याबद्दल आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले, या उपक्रमांमुळे ते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतील असेही त्या म्हणाल्या. त्यांनी सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांच्या सुख आणि कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याचे, त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व देण्याचे आणि त्यांच्या मौल्यवान सहवासाचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
Please click here to see the President's Speech
* * *
N.Chitale/N.Chitre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2126188)
Visitor Counter : 24