पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन


वेव्हज, जागतिक मंचावर भारताचे सृजनशील सामर्थ्य अधोरेखित करते: पंतप्रधान

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, वेव्हज, ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे, तर ती संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे: पंतप्रधान

अब्जावधी लोकसंख्येचा भारत, अब्जावधी कथांचीही भूमी : पंतप्रधान

क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड साठी ही उचित वेळ: पंतप्रधान

आज जग कथाकथनाच्या नवीन मार्गांचा धांडोळा घेत असताना, भारताकडे हजारो वर्षांपूर्वीच्या त्याच्या कथांचा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने वैश्विक खजिना आहे: पंतप्रधान

आशय, सृजनशीलता आणि संस्कृती हे तीन स्तंभ असणाऱ्या ऑरेंज इकॉनॉमी च्या उदयाचा हा काळ-: पंतप्रधान

स्क्रीनचा आकार लहान होत चालला असला तरी व्याप्ती होत आहे अमर्याद, स्क्रीन सूक्ष्म होत चालली असली तरी संदेश मात्र होत आहे भव्य: पंतप्रधान

आज, भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाइव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे: पंतप्रधान

सर्जकांनो, मोठी स्वप्ने पहा आणि तुमच्या कथेची मांडणी करा; गुंतवणूकदारांनो, केवळ कार्यक्रमासाठी नव्हे तर लोकांमध्ये गुंतवणूक करा; भारतीय तरुणांनो, तुमच्या अब्जावधी अनभिज्ञ कहाण्या जगासमोर आणा : पंतप्रधान

Posted On: 01 MAY 2025 4:15PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. "वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे", असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.

वेव्हज (WAVES) या शिखर परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास विशद करताना मोदी यांनी चित्रपट सृष्टीतील अध्वर्यू दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र', हा पहिला भारतीय चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता, याचा उल्लेख केला. दादासाहेब फाळके यांची जयंती आदल्याच दिवशी साजरी झाली, असल्याची त्यांनी आठवण करून दिली. भारतीय चित्रपटांनी देशाचे सांस्कृतिक मर्म यशस्वीरीत्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले असल्याचे सांगत त्यांनी गेल्या शतकभराहून अधिक काळात भारतीय चित्रपटांनी आपला प्रभाव निर्माण केला असल्याचे स्पष्ट केले. भारतीय चित्रपटनिर्माते जागतिक कथनाला कसा आकार देत आहेत, हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी राज कपूर यांची रशियातील लोकप्रियता, कान येथे सत्यजित रे यांची जागतिक स्तरावरून झालेली प्रशंसा, आणि 'आरआरआर' चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासह मिळालेले यश, या गोष्टी अधोरेखित केल्या. गुरुदत्त यांच्या चित्रपटांमधील काव्य, ऋत्विक घटक यांच्या चित्रपटात उमटणारे सामाजिक चित्र, ए. आर. रहमान यांची सांगितिक प्रतिभा, आणि एस. एस. राजामौली यांची कथा मांडण्याची विलक्षण धाटणी, यांचा उल्लेख करत या कलाकारांनी भारतीय संस्कृती जगभरातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यात नेल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे प्रकाशित करून त्याद्वारे चित्रपट उद्योगातील त्यांच्या योगदानाला मानवंदना दिली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले.  

भारताच्या सृजनशील क्षमता आणि जागतिक सहकार्याचे महत्त्वावर स्पष्ट करताना, गेल्या काही वर्षांमध्ये आपण गेमिंग, संगीत, चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या क्षेत्रांशी संबंधित कल्पना आणि अंतर्दृष्टीबद्दल चर्चा केल्याने सृजनशील उद्योगांबद्दल आणखी खोलवर माहिती झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला होता, याचा विशेष उल्लेख केला. या उपक्रमात 150 देशांमधील गायक, ‘वैष्णव जन तो’ हे नरसी मेहता यांनी जवळपास 500-600 वर्षांपूर्वी रचलेले भजन गाण्यासाठी एकत्र आले होते. जागतिक कलाकारांच्या या प्रयत्नाने लक्षणीय प्रभाव निर्माण केला आणि जगाला एकदिलाने एकत्र आणले गेले. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक व्यक्तींनी गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे छोटे व्हिडिओ संदेश तयार करून 'गांधी वन-फिफ्टी' उपक्रमात योगदान दिले होते, असेही त्यांनी पुढे नमूद केले. भारताच्या सृजनशील विश्वाच्या सामूहिक शक्तीने, आंतरराष्ट्रीय सहकार्यासह, त्याची क्षमता अगोदरच दाखवून दिली असून ती दृष्टी आता वेव्हजच्या रूपात प्रत्यक्षात साकार झाली आहे, असेही ते म्हणाले.

पहिल्याच वेव्हज् शिखर परिषदेला मिळालेल्या घवघवीत यशाचे स्वागत करताना मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाने पहिल्या क्षणापासूनच जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि त्याचा उद्देश गर्जत होता. सृजनशील उद्योगक्षेत्रात WAVES ही महत्त्वाची घटना बनवण्यात वरिष्ठ सल्लागार मंडळाने बजावलेली भूमिका अधोरेखित करत त्यांनी समर्पितपणे केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. मोठ्या प्रमाणातील घेण्यात आलेली क्रिएटर्स चॅलेंज स्पर्धा तसेच क्रिएटोस्फीअर उपक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला, त्यामध्ये 60 देशांमधील सुमारे 100,000 सृजनशील व्यावसायिकांचा सहभाग होता. या स्पर्धेच्या 32 आव्हानात्मक फेऱ्यांमधून, 800 अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली हे सांगताना त्यांनी त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले तसेच त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आता त्यांना जागतिक सृजनशील मंचावर आपला ठसा उमटवण्याची संधी असल्याचे म्हणत अंतिम फेरीतील स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहन दिले.

वेव्हज शिखर परिषदेदरम्यान भारत पॅव्हीलियन येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या सृजनशील घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्सुकता व्यक्त केली. आता लक्षणीय प्रमाणात अभिनव संशोधन साध्य झाले असून या कलाकृती अनुभवण्याच्या बाबतीत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. वेव्हज बाजार या  उपक्रमाला अधोरेखित करताना ते म्हणाले की  नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी जोडून घेण्याच्या संदर्भात वेव्हज बाजारची  क्षमता अधिक असल्याचे ते म्हणाले . कला उद्योगातील खरेदीदार आणि विक्रेते यांना परस्परांशी जोडण्याच्या कल्पनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की असे उपक्रम सृजनशील अर्थव्यवस्थेला मजबूत करतात आणि कलाकारांना नव्या संधी उपलब्ध करून देतात.

सृजनशीलता आणि मानवी अनुभव यांच्यातील खोलवर रुजलेल्या संबंधांबाबत विचार व्यक्त करताना, मुलाच्या जीवनप्रवासाची सुरुवात आईच्या ज्या अंगाईने होते तो ध्वनी आणि संगीताशी झालेला त्यांचा  पहिला परिचय असतो असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की ज्याप्रमाणे आई मुलांसाठी स्वप्नांचे धागे विणते तशाच पद्धतीने सृजनशील व्यावसायिक एका नव्या युगाच्या स्वप्नांना आकार देतात. स्वतःच्या कलेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित आणि प्रभावित करणाऱ्या अशाचा दूरदर्शी व्यक्तींना एकत्र आणणे यातच वेव्हज कार्यक्रमाची अर्थपूर्णता आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.   

सामुहिक प्रयत्नांवर असलेल्या विश्वासाला दुजोरा देत कलाकार, सर्जक तसेच या उद्योगातील प्रमुख नेते यांची समर्पितता येत्या काही वर्षांत वेव्हज कार्यक्रमाला नव्या उंचीवर घेऊन जाईल  असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या शिखर परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी ज्या पातळीचा पाठींबा आणि हातभार देऊ केला तसाच ते यापुढे देखील देत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रात अशा आणखी उपक्रमांचा रोमांचक लाटा येऊ घातल्या आहेत अशी टिप्पणी करून आगामी काळात सुरु करण्यात येणारी वेव्हज पारितोषिके कला आणि सृजनशीलतेच्या विश्वात सर्वात प्रतिष्ठीत सन्मान म्हणून स्वतःला स्थापित करतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. सृजनशीलतेच्या माध्यमातून  संपूर्ण जगभरातील लोकांची मने जिंकणे आणि आगामी पिढ्यांना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून त्यासाठी निरंतर बांधिलकी जपण्याची गरज आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी अधिक भर दिला.

भारताची वेगवान आर्थिक प्रगती अधोरेखित करून आणि आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थ्यव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारत सध्या जागतिक अर्थविषयक तंत्रज्ञान स्वीकाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे आणि जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था असणारा देश आहे. विकसित देश बनण्याच्या दिशेने भारताचा प्रवास नुकताच सुरु झाला असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. “भारत हा केवळ अब्जाहून अधिक लोकसंख्येचा देश नव्हे तर तो अब्जाहून अधिक कहाण्यांचा देखील देश आहे,”ते पुढे म्हणाले. देशाच्या समृद्ध कलात्मक इतिहासाचा संदर्भ देऊन, दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींच्या नाट्य शास्त्रात भावना तसेच मानवी अनुभव यांच्या जडणघडणीत कलेच्या सामर्थ्यावर अधिक भर देण्यात आला आहे याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. कित्येक शतकांपूर्वी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या कलाकृतीने अभिजात नाट्यप्रकाराला नवी दिशा दिली असे ते म्हणाले. भारताच्या प्रत्येक मार्गाशी संबंधित कहाणी आहे, प्रत्येक पर्वताचे एक गीत आहे आणि प्रत्येक नदी एक धून गुणगुणते आहे असे सांगून मोदी यांनी भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांना अधोरेखित केले.भारतातील सहा लाख गावांपैकी प्रत्येकाची स्वतःची अशी लोक परंपरा आणि अनोखी कथाकथन शैली आहे आणि येथील समुदाय लोककथांच्या माध्यमातून त्यांच्या इतिहासाची जपणूक करत आहेत असे त्यांनी सांगितले.

त्यांनी भारतीय संगीताचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. ते भजन असो, गझल असो, शास्त्रीय रचना असो किंवा समकालीन सूर असो, प्रत्येक गीतामध्ये एक कथा असते आणि प्रत्येक लयीत एक आत्मा असतो, असे त्यांनी नमूद केले.

वेव्हज शिखर परिषदेमध्ये मोदी यांनी नाद ब्रह्म या दैवी ध्वनीची संकल्पना अधोरेखित करत भारताच्या खोलवर रुजलेल्या कलात्मक आणि आध्यात्मिक वारशावर भर दिला. त्यांनी असे सांगितले की भारतीय पौराणिक कथा नेहमीच संगीत आणि नृत्याद्वारे दैवी भाव व्यक्त करतात, भगवान शिवाचे डमरू हा पहिला वैश्विक ध्वनी, देवी सरस्वतीची वीणा ही ज्ञानाची लय, भगवान कृष्णाची बासरी ही प्रेमाचा शाश्वत संदेश तर भगवान विष्णूचा शंख हे सकारात्मक उर्जेचे आवाहन आहे. त्यांनी यावर भर दिला की शिखर परिषदेतील मंत्रमुग्ध करणारे सांस्कृतिक सादरीकरण देखील या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब आहे. "ही योग्य वेळ आहे" असे घोषित करून मोदी यांनी "भारतात निर्माण करा, जगासाठी निर्माण करा" या भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि देशाची कथाकथनाची परंपरा हजारो वर्षांचा अमूल्य खजिना देते असे प्रतिपादन केले. त्यांनी अधोरेखित केले की भारताच्या कथा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने जागतिक आहेत, ज्यांच्यामध्ये केवळ सांस्कृतिक विषयच नाहीत तर विज्ञान, क्रीडा, धैर्य आणि शौर्य यांचाही समावेश आहे. त्यांनी असे नमूद केले की भारताच्या कथाकथन क्षेत्रात विज्ञान आणि काल्पनिक कथा तसेच शौर्य यांचा समावेश आहे, ज्यामुळे एक विशाल आणि वैविध्यपूर्ण सृजनशील परिसंस्था तयार होते. त्यांनी भारताच्या असाधारण कथा जगासोबत सामायिक करण्याची, नवीन तसेच आकर्षक रूपामध्ये भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन वेव्हज मंचाचा केले.

जनतेचे पद्म पुरस्कार आणि वेव्हज परिषदेमागील दृष्टिकोन यांच्यातील समांतर नाते दर्शवत, दोन्ही उपक्रमांचे उद्दिष्ट भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभेला ओळखणे आणि त्यांना उन्नत करणे असे असल्याचे सांगून पंतप्रधानांनी टिप्पणी केली की पद्म पुरस्कार स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी सुरू झाले, परंतु जेव्हा भारताने जनतेच्या पद्म पुरस्कारांचा स्वीकार केला, देशाची सेवा करणाऱ्या दुर्गम भागातील व्यक्तींना मान्यता दिली तेव्हा त्यांच्यात‌ खरोखरच परिवर्तन घडून आले. या बदलामुळे पुरस्कार एका समारंभातून राष्ट्रीय उत्सवात परिवर्तित झाले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी सांगितले की वेव्हज हे चित्रपट, संगीत, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग या क्षेत्रातील भारताच्या प्रचंड सृजनशील प्रतिभेसाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करेल, ज्यामुळे देशाच्या प्रत्येक भागातील कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळेल.

संस्कृत वाक्यांशांचा संदर्भ देत, विविध विचार आणि संस्कृती स्वीकारण्याच्या भारताच्या परंपरेला अधोरेखित करताना मोदी यांनी यावर भर दिला की भारताच्या सभ्यतेच्या खुलेपणाने पारशी आणि ज्यू सारख्या समुदायांचे स्वागत केले आहे, जे देशात भरभराटीला आले आहेत तसेच देशाच्या सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे यश आणि योगदान आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता व्यक्त करत त्यांनी विविध देशांतील मंत्री आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी असे सांगितले की जागतिक कलापूर्ण कामगिरीचा आदर करणे तसेच त्यांचा उत्सव साजरा करणे, सृजनशील सहकार्यासाठी देशाची वचनबद्धता बळकट करणे यात भारताची ताकद दिसून येते. त्यांनी यावर भर दिला की विविध संस्कृती आणि राष्ट्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणारी सामग्री तयार करून, जागतिक संवाद आणि कलात्मक देवाणघेवाणीचे स्वप्न वेव्हज बळकट करू शकते.

पंतप्रधानांनी जागतिक सृजनशील समुदायाला निमंत्रण दिले आणि त्यांना आश्वस्त केले की भारताच्या कथांशी जोडले गेल्याने त्यांना अशा कथा मिळतील ज्या त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीशी खोलवर जुळतील.  भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेत अशा कल्पना आणि भावना आहेत ज्या सीमा ओलांडतात, ज्यामुळे एक नैसर्गिक आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण होतो यावर त्यांनी भर दिला.  जे आंतरराष्ट्रीय कलाकार आणि निर्माते भारताच्या कथांचा शोध घेतील, त्यांना देशाच्या वारशासोबत एक नैसर्गिक बंध अनुभवता येईल, असे त्यांनी सांगितले. या सांस्कृतिक समन्वयामुळे 'क्रिएट इन इंडिया'चा भारताचा दृष्टीकोन जगासाठी अधिक आकर्षक आणि सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

भारतातील केशरी अर्थव्यवस्थेची  पहाट होत आहे. आशय, सृजनशीलता आणि संस्कृती – हे केशरी अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत", असे  मोदी यांनी सांगितले. भारतीय चित्रपट आता 100 हून अधिक देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत, जागतिक प्रेक्षक केवळ वरवरचे कौतुक करण्यापेक्षा भारतीय सिनेमा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.  मोदी यांनी उपशीर्षकांसह भारतीय आशय पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा वाढता कल अधोरेखित केला, जो भारताच्या कथांशी अधिक सखोल संबंध दर्शवतो. मोदी यांनी असेही नमूद केले की भारतातील ओटीटी उद्योगात अलीकडच्या वर्षांत दहापट वाढ झाली आहे, स्क्रीनचा आकार कमी होत असला तरी, आशय सामग्रीची व्याप्ती अनंत आहे, सूक्ष्म स्क्रीनद्वारे मोठे संदेश दिले जात आहेत. भारतीय खाद्यपदार्थ जागतिक पसंतीचे होत आहेत आणि भारतीय संगीत ही लवकरच जगभरात अशीच ओळख मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेच्या प्रचंड क्षमतेवर भर देत, येत्या काही वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात तिचा वाटा लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे सांगून, पंतप्रधान म्हणाले, "भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन आणि संगीत यासाठी एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे".  त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट उद्योगातील आशादायक वाढीच्या संधी आणि जागतिक ऍनिमेशन बाजारपेठेतील प्रचंड शक्यतांचा उल्लेख केला, ज्याची उलाढाल  सध्या 430 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे आणि पुढील दशकात दुप्पट होण्याची शक्यता आहे.  भारताच्या ऍनिमेशन आणि ग्राफिक्स उद्योगासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे, असे त्यांनी सांगितले आणि हितधारकांना अधिक आंतरराष्ट्रीय पोहोच निर्माण करण्यासाठी या विस्ताराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  

भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेला  पुढे नेण्यासाठी भारतातील तरुण निर्मात्यांना आवाहन करताना, त्यांची आवड आणि कठोर परिश्रम सृजनशीलतेची एक नवीन लाट घडवत आहेत, याची दखल पंतप्रधानांनी घेतली. गुवाहाटीतील संगीतकार असोत, कोचीमधील पॉडकास्टर असोत, बंगळूरुमधील गेम डिझायनर असोत किंवा पंजाबमधील चित्रपट निर्माते असोत, त्यांचे योगदान भारताच्या वाढत्या सृजनशील क्षेत्राला चालना देत आहे, यावर त्यांनी भर दिला. सरकार सृजनशील व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, स्किल इंडिया, स्टार्टअप सपोर्ट, एव्हीजीसी उद्योगासाठी धोरणे आणि वेव्हज सारख्या जागतिक व्यासपीठांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांना पाठिंबा देत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी असे नमूद केले की असे वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जात आहे जिथे नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीला महत्त्व दिले जाते, नवीन स्वप्नांची जोपासना केली जाते आणि व्यक्तींना ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम केले जाते. जिथे सृजनशीलतेची कोडिंगसोबत  भेट होते, सॉफ्टवेअर कथाकथनात मिसळून जाते आणि कला आगउमेमेंटेड रिअॅलिटीमध्ये विलीन होते अशा प्रकारचा एक प्रमुख मंच म्हणून वेव्हज काम करेल, असे त्यांनी अधोरेखित केले.  त्यांनी तरुण निर्मात्यांना या संधीचा पुरेपूर उपयोग करण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांची दृष्टी साकार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न समर्पित करण्याचे आवाहन केले.

भारताच्या आशय सामुग्री निर्मात्यांवर  आपला पूर्ण  विश्वास असून, त्यांची मुक्त-प्रवाही सृजनशीलता जागतिक सृजनशीलतेच्या परिप्रेक्ष्याला नवा अर्थ मिळवून देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील निर्मात्यांच्या चैतन्यमय प्रेरणेला कोणतेही अडथळे, सीमा अथवा संकोच माहीत नसल्यामुळे नवोन्मेषाला बहर येण्यासाठी मोकळे अवकाश मिळते,  यावर त्यांनी भर दिला. तरुण निर्माते, गेमर्स आणि डिजिटल कलाकारांशी वैयक्तिक संवाद साधल्यावर आपल्याला भारताच्या सृजनशील परिसंस्थेतून आकाराला येणारी ऊर्जा आणि प्रतिभा प्रत्यक्ष अनुभवता आली,       असे पंतप्रधान म्हणाले.  रिल्स, पॉडकास्ट आणि गेम्सपासून ते अॅनिमेशन, स्टँड-अप आणि  एआर-व्हीआर प्रकारापर्यंत भारताची मोठी युवा लोकसंख्या नवीन सृजनशीलतेला नवे आयाम देत असल्याचे त्यांनी नमूद केले. वेव्ह्स हे या युवा पिढीसाठी खास डिझाइन केलेले व्यासपीठ आहे, जे तरुण  मनांना त्यांची ऊर्जा आणि कार्यक्षमतेच्या मदतीने  सृजनशील क्रांतीची पुर्नकल्पना करण्यासाठी आणि त्याचा नवा अर्थ शोधण्यासाठी सक्षम करते, असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानाधारित एकविसाव्या शतकामध्‍ये  जबाबदार सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करताना, तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर अधिकाधिक प्रभाव पडत असल्यामुळे भावनिक संवेदनशीलता आणि सांस्कृतिक समृद्धी जपण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सृजनशील जगात मानवी सहवेदना जपण्याची आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्याची शक्ती आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रोबो तयार करणे हे आपले उद्दिष्ट नसून, अधिक संवेदनशीलता, भावनिक खोली 

आणि बौद्धिक समृद्धी   असलेल्या मानवाचे संगोपन करणे, हे आहे, जे गुण केवळ माहितीचा भडिमार अथवा तंत्रज्ञानाच्या वेगामधून जन्माला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कला, संगीत, नृत्य आणि कथाकथन, या अभिव्यक्तीच्या प्रकारांनी हजारो वर्षांपासून मानवी संवेदना जिवंत ठेवल्या आहेत, त्यामुळे त्या महत्वाच्या असल्याचे मोदी यांनी सांगितले. सृजनशील व्यक्तींनी या परंपरेला बळकटी द्यावी आणि अधिक संवेदनशील भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले.  सांस्कृतिक अखंडता अबाधित राखण्यासाठी आणि सकारात्मक मूल्ये  रुजवण्यासाठी वेव्ह्स एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल, असे सांगून त्यांनी युवा पिढीला    विभाजनकारी 

आणि हानिकारक विचारधारेपासून दूर ठेवण्याची गरज अधोरेखित केली. ही  जबाबदारी टाळली, तर  भावी पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. सृजनशील जगावरील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी प्रभावावर भर देताना, पंतप्रधानांनी  पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी जागतिक समन्वय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वेव्ह्स हा भारतीय निर्मात्यांना जागतिक कथाकारांशी आणि अॅनिमेटर्सना जागतिक दूरदर्शी व्यक्तींशी  जोडणारा सेतू ठरेल आणि गेमर्सना ग्लोबल चॅम्पियनमध्ये परिवर्तित करेल असे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि निर्मात्यांनी भारताला आपले आशय निर्मितीचे केंद्र म्हणून स्वीकारावे आणि देशाच्या विशाल सृजनशील परिसंस्थेचा वेध घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

जागतिक आशयकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी त्यांना मोठी स्वप्ने बघण्याचे आणि कथा सांगण्याचे आवाहन केले. गुंतवणुकदारांनी केवळ मंच, व्यासपीठ  किंवा माध्यमांमध्ये गुंतवणूक न करता लोकांमध्ये गुंतवणूक करावी, तसेच भारतीय युवकांनी त्यांच्याकडे असलेल्या एक दशलक्ष कथा जगासमोर आणाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. वेव्हज शिखर परिषदेच्या उदघाटन समारंभात सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव,  डॉ. एल. मुरुगन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

"कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज" या घोषवाक्यासह चार दिवस चालणारी ही शिखर परिषद,  जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणून भारताला माध्‍यम , मनोरंजन आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी सज्ज आहे. 

उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सृजनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचा वापर करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, वेव्हज मध्ये  चित्रपट,  ओटीटी,  गेमिंग,  कॉमिक्स,  डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) - विस्तारित वास्तव (एक्सआर), ब्रॉडकास्टिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान एका मंचावर आणण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून भारताच्या मीडिया आणि मनोरंजन कौशल्याचे व्यापक प्रदर्शन होऊ शकेल. वर्ष 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ गाठण्याचे वेव्हजचे उद्दिष्ट आहे,  ज्यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढेल.

वेव्हज 2025 मध्ये, भारत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (जीएमडी) म्हणजेच जागतिक माध्‍यम संवादाचे आयोजन करत आहे,  ज्यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होत असून,  हा परिसंवाद  जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात देशाच्या सहभागात एक मैलाचा दगड ठरेल. या शिखर परिषदेत वेव्हज बाजार देखील आहे. त्यामध्‍ये 6,100 हून अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प असणार आहेत. ही एक जागतिक ‘ई-मार्केट प्लेस’ आहे. याचा उद्देश स्थानिक आणि जागतिक स्तरावर खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात एक दुवा निर्माण करणे असा आहे, ज्यामुळे नेटवर्किंग आणि व्यवसायाच्या व्यापक संधी निर्माण होतील.

पंतप्रधानांनी  ‘क्रिएटोस्फीअर’ ला भेट दिली आणि जवळजवळ एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या 32 ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधून निवडलेल्या निर्मात्यांशी/ क्रियेटर्स बरोबर संवाद साधला. या चॅलेंजला एक लाखाहून अधिक नोंदणी प्राप्त झाली होती. पंतप्रधानांनी भारत पॅव्हेलियनला देखील भेट दिली.

वेव्हज 2025 मध्ये 90 हून अधिक देशांचे लोक सहभागी होत असून त्यात 10,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 निर्माते, 300 पेक्षा अधिक  कंपन्या आणि 350 पेक्षा अधिक स्टार्टअप्स यांचा समावेश आहे. या शिखर परिषदेत 42 पूर्ण सत्रे,  39 ब्रेकआउट सत्रे आणि 32 मास्टर क्लासेस असतील.  यात  प्रसारण,  इन्फोटेनमेंट, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल मीडिया यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

***

Chitale/Shilpa/JPS/NM/Bedekar/Vasanti/Manjiri/Sanjana/Nandini/Shailesh/Bhakti/Rajshree/CY

 


(Release ID: 2125753) Visitor Counter : 49