ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मुंबईत गुंतवणुकदारांशी साधला संवाद; ईशान्येकडील राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी अंबानी, बिर्ला, टाटा या उद्योजकांनी दाखवले औत्सुक्य

Posted On: 01 MAY 2025 11:35AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2025

 

  • ईशान्येकडील सर्व आठ राज्यांचा समावेश भारताच्या विकास क्षेत्रात करुन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सांगितले.
  • ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्योगजगतातील अग्रणींनी उत्साहाने  स्वारस्य दाखवले.
  • नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे  23 ते 24 मे दरम्यान उदयोन्मुख ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषेदेचे आयोजन.

ईशान्येकडील राज्यांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्येकडील प्रदेशांचे विकासमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगजगतातील अग्रणींबरोबर  बैठक आयोजित करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईत बुधवारी (30 एप्रिल 2025) आघाडीच्या उद्योजकांशी घेतलेल्या अनेक बैठकांच्या मालिकेमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज), कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूह) आणि एन चंद्रशेखर (टाटा सन्स) यांच्याशी संवाद साधला.  नवी दिल्लीत येत्या 23 ते 24 मे दरम्यान होणाऱ्या उदयोन्मुख ईशान्य परिषद या गुंतवणूक शिखर परिषदेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली.

ईशान्य प्रदेशाला देशाच्या विकासाचे नवीन इंजिन म्हणून प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनावर ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या बैठकीत भर दिला. "भारताच्या विकासाचे इंजिन म्हणून आठ राज्यांना  एकत्रित विकास प्रवाहात सामावून घेणे हे सरकारचे ध्येय आहे," असे ते म्हणाले. या प्रदेशात शाश्वत विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली.

याशिवाय ईशान्येकडील आठही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह उच्चस्तरीय कार्यदल स्थापन करणे, प्रत्येक राज्यात गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी (आयपीए) ची स्थापना करणे, अशा ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध प्रमुख उपक्रमांची माहिती मंत्री  सिंदिया यांनी उद्योजकांना दिली.

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे सांख्यिकी सल्लागार धर्मवीर झा यांनी ईशान्येकडील आठही राज्यांमध्‍ये कोणत्या क्षेत्रांमध्‍ये प्रामुख्याने  गुंतवणुकीच्या  संधी आहेत, याचे  सादरीकरण केले.

    

कृषी-आधारित उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यटन यासह प्रदेशानुरूप असलेल्या विशिष्ट विकास क्षेत्रांवर देखील या बैठकीत संवाद साधण्यात आला.

उदयोन्मुख  ईशान्य शिखर परिषद 2025 मध्ये विकासाची ही गती कायम राखली जाईल आणि या प्रदेशाची आर्थिक क्षमता उलगडण्यासाठी प्रमुख भागधारक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. प्रस्तुत शिखर परिषद 23 ते 24 मे 2025 रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे.

 

* * *

S.Bedekar/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125684) Visitor Counter : 19