WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

60 हून अधिक देशांमधून सुमारे 1 लाख नोंदणींसह ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ बनली जागतिक चळवळ

 प्रविष्टि तिथि: 18 APR 2025 5:53PM |   Location: PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 18 एप्रिल 2025

 

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेला क्रिएट इन इंडिया चॅलेंजची पहिली आवृत्ती  1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे एका शानदार अंतिम फेरीसाठी सज्ज होत आहे. यातील सर्वच 32 चॅलेंजसाठी नोंदणी आता अधिकृतपणे बंद झाली आहे. क्रिएट इन इंडिया चॅलेंजने सहभागाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या स्पर्धेत सुमारे 1 लाख जणांनी आपली नावे नोंदवली असून यात 1,100 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. या चॅलेंजसाठी 60 हून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत. या सहभागातून या अग्रगण्य उपक्रमाबाबत जागतिक स्तरावर असलेले आकर्षण आणि पोहोच दिसून येते. या अनन्यसाधारण प्रतिभेच्या समूहातून निवडण्यात आलेल्या 750 अंतिम स्पर्धकांना वेव्हज 2025 चा भाग असलेल्या क्रिएटोस्फेअर या विशेष रूपाने तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर अ‍ॅनिमेशन, कॉमिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), XR, गेमिंग, संगीत आणि इतर क्षेत्रातील नवोन्मेष तसेच त्यांचे सर्जनशील कौशल्य आणि प्रभाव प्रदर्शित करण्याची संधी दिली जाईल. या चॅलेंजच्या विजेत्यांना कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एका भव्य रेड कार्पेट समारंभात प्रतिष्ठित 'वेव्हज क्रिएटर अवॉर्ड्स' प्रदान केले जातील.

वेव्हजमधील क्रिएटोस्फीअर व्यासपीठावर उल्लेखनीय जागतिक सहभाग दिसून येईल. या व्यासपीठावर 43 आंतरराष्ट्रीय अंतिम स्पर्धक त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवतील. या प्रदर्शनामुळे सर्जनशीलतेच्या या उत्सवाला खरोखरच आंतरराष्ट्रीय आयामाची जोड मिळेल. हे अंतिम फेरीतील स्पर्धक अर्जेंटिना, नेपाळ, जर्मनी, बर्म्युडा, अमेरिका, ग्रीस, इंडोनेशिया, ब्रिटन, कॅनडा, इटली, लाओस, थायलंड, ताजिकिस्तान, इजिप्त, श्रीलंका, रशिया, मालदीव, मलेशिया आणि जपानसह 20 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करतील. उल्लेखनीय बाब म्हणजे, अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या यादीत श्रीलंका, नेपाळ आणि ताजिकिस्तानच्या प्रत्येकी 6 स्पर्धकांचा समावेश आहे. त्याखालोखाल  इंडोनेशिया आणि मालदीवमधून प्रत्येकी 5 आणि मॉरिशसमधून 4 जणांचा या यादीत समावेश आहे. अंतिम फेरीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व 2 स्पर्धक करत आहेत, तर रशिया, कॅनडा, अर्जेंटिना, लाओस, मलेशिया, बर्म्युडा, इजिप्त, थायलंड आणि ब्रिटन  या देशाचा प्रत्येकी 1 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभाग क्रिएट इन इंडिया चॅलेंजचे जागतिक आकर्षण आणि वाढती पोहोच अधोरेखित करतो.

भारतात, या स्पर्धांमध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून उत्साही सहभाग दिसून आला, ज्यातून  या उपक्रमाचा खरा राष्ट्रीय आवाका अधोरेखित होतो. अंतिम फेरीतील स्पर्धकांची यादी प्रादेशिक प्रतिनिधित्वाचे उत्तम उदाहरण आहे – पूर्वेकडील आसाम आणि मेघालयपासून ते पश्चिमेकडील गुजरातपर्यंत, उत्तरेतील हिमाचल प्रदेशपासून दक्षिणेकडील केरळपर्यंत संपूर्ण देशातून स्पर्धक यात सहभागी झाले होते.

तरुणाईच्या उत्साहाचा उत्सव साजरा करताना, 'क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस' मध्ये मुख्यतः विशीतील तरुण सर्जकांचा सहभाग आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील व्यावसायिक, आणि किशोरवयातील नवोन्मेषक यांचा समावेश आहे. सर्वात तरुण अंतिम स्पर्धक फक्त 12 वर्षांचा असून सर्वात ज्येष्ठ स्पर्धक 66 वर्षांचे आहेत. त्यामुळे हा उपक्रम वयाच्या सीमा ओलांडणारे एक सर्वसमावेशक सर्जनशील व्यासपीठ म्हणून समोर आले आहे.

‘क्रिएट इन इंडिया’ हा उपक्रम  सहभाग व हेतू संबंधीच्या विविधतेचा गौरव साजरा करतानाच स्थानिक पातळीवरील नवोन्मेषाला प्रोत्साहन देतो . ‘इनोव्हेट टू एज्युकेट चॅलेंज’द्वारे शिक्षण अधिक सुलभ बनवण्यापासून ते ‘मेक द वर्ल्ड वेअर खादी’द्वारे भारताच्या वस्त्र परंपरेला पुनर्जीवित करण्यापर्यंत, या स्पर्धा परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम दर्शवतात. ‘इंडिया: अ बर्ड्स आय व्ह्यू’ या माध्यमातून चित्रपट निर्माते आणि ड्रोन दीदीद्वारे भारताच्या आत्म्याचे दर्शन हवाई दृश्यांतून घडवले जाते, ज्यात अनुक्रमे कथा सांगण्यासाठी आणि समुदाय सशक्तीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरले आहे.

‘वेव्ह्स 2025’साठीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना, ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ भारताच्या सर्जनशील महत्त्वाकांक्षेचे प्रभावी प्रतीक ठरले आहे. हा उपक्रम प्रतिभेची नवीन दारे उघडत आहे आणि जागतिक माध्यम  व मनोरंजन क्षेत्रात भारताच्या उदयोन्मुख  नेतृत्वाला दुजोरा देत आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागाच्या चैतन्यमय  मिश्रणासह, हे व्यासपीठ एक गतिशील जागतिक मंच बनले आहे – जे प्रादेशिक आणि विविध पिढ्यांच्या सीमांपलीकडे जाऊन प्रतिभेला बळ देते आणि  पंतप्रधानांनी मांडलेले स्वप्न, “वेव्ह्स प्रत्येक घरात आणि प्रत्येक हृदयात पोहोचले पाहिजे,” याचे खरे प्रतिबिंब ठरते.

 

* * *

S.Kane/Shraddha/Gajendra/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


रिलीज़ आईडी: 2122717   |   Visitor Counter: 78

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Punjabi , Telugu , Malayalam , Assamese , Bengali , English , Urdu , हिन्दी , Nepali , Gujarati , Tamil , Kannada