राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत 2023 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची  घेतली भेट

Posted On: 15 APR 2025 1:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 15 एप्रिल 2025

विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सध्या सहाय्यक सचिवपदावर कार्यरत असलेल्या 2023 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या एका गटाने आज (15 एप्रिल 2025 रोजी) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

या आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की हे अधिकारी  असामान्य निर्धार आणि कठोर मेहनतीच्या माध्यमातून आयएएस अधिकारी बनले आहेत. यातून त्यांच्या वैयक्तिक जीवनात बरेच परिवर्तनकारी बदल घडून आले आहेत आणि आता आधीपेक्षा अधिक दृढ निश्चय आणि समर्पणासह देशातील असंख्य लोकांच्या आयुष्यात परिवर्तनकारी बदल घडवून आणण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या सेवेचा आवाका आणि अधिकार इतका प्रचंड आहे की ते त्यांच्या पहिल्याच नेमणूकीदरम्यान अनेक  नागरिकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकतात असे मत राष्ट्रपतींनी नोंदवले. वंचित वर्गाच्या उत्थानासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 

या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवायला हवी असे मुर्मू यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, लोक सेवकांची कर्तव्ये ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांचे हक्क हे ती कर्तव्ये निभावण्याचे साधन आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की प्रत्येक लोक सेवकाने प्रामाणिक हेतूने कार्य केले पाहिजे. आपणा सर्वांना सध्या पर्यावरणीय प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, त्याचबरोबर अनैतिकतेमुळे झालेले प्रदूषण आणि मूल्यांचा ऱ्हास ही देखील अत्यंत गंभीर आव्हाने आहेत. यावर मात करण्यासाठी समर्पित आणि प्रामाणिक असणे किती गरजेचे आहे हे वेगळे सांगायला नको.प्रामाणिकपणा, सत्य आणि साधेपणा ही जीवनमूल्ये अनुसरणारे लोक अधिक आनंदी असतात. लोकसेवेत प्रामाणिकपणा ही सर्वात आवश्यक असलेली नीती आहे असे त्यांनी सांगितले.

उपस्थित अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांशी जवळीक साधावी आणि स्थानिक प्रयत्नांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी दिला.या अधिकाऱ्यांनी स्थानिक तसेच राज्य पातळीवर केलेली विकास कामे आणि समाजकल्याण कार्ये राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor


(Release ID: 2121841) Visitor Counter : 37