पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
गेल्या दहा वर्षांत बनारसच्या विकासाला नवी गती मिळाली : पंतप्रधान
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर महिलांचे सक्षमीकरण, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाच्या कल्याणासाठी काम केले : पंतप्रधान
बनास दुग्धालयाने काशीमधील हजारो कुटुंबांची प्रतिमा आणि नशीब दोन्ही बदलले : पंतप्रधान
काशी आता उत्तम आरोग्याची राजधानी बनत आहे : पंतप्रधान
आज जे कोणी काशीला भेट देतात ते तिथल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांचे कौतुक करतात : पंतप्रधान
भारत आज विकास आणि वारसा दोन्ही एकत्र घेऊन वाटचाल करत आहे, आपली काशी याबाबतीतले सर्वोत्तम प्रारूप बनत आहे : पंतप्रधान
उत्तर प्रदेश ही आता केवळ शक्यतांची भूमी राहिलेली नाही, तर क्षमता आणि कर्तृत्वाची भूमी झाली आहे : पंतप्रधान
Posted On:
11 APR 2025 12:56PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या 10 वर्षांत बनारसच्या विकासाला नवी गती मिळाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काशीने आधुनिकतेचा अवलंब केला आहे, आपली संस्कृती जपली आहे आणि एक उज्ज्वल भविष्याचा अंगिकार केला आहे, असे त्यांनी नमूद केले. काशी आता केवळ प्राचीन शहर राहिलेले नाही, तर ते पुर्वांचलच्या अर्थात भारताच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या आर्थिक नकाशाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे, असेही ते म्हणाले. भगवान महादेवाच्या मार्गदर्शनाखाली काशी आता पुर्वांचलच्या विकासाचा रथ चालवत आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात काशी आणि पुर्वांचलच्या विविध भागांना जोडणाऱ्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे कनेक्टिव्हिटी (Connectivity) म्हणजेच दळणवळणीय जोडणी व्यवस्था अधिक मजबूत केली जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मोहिमेसोबतच शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा सुविधांचाही विस्तार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रदेश, कुटुंब आणि युवा वर्गाल उत्तम सुविधा देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, ही बाब त्यांनी नमूद केली. या योजना पुर्वांचलला विकसित प्रदेश बनवण्यात मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनांमुळे काशीतील प्रत्येक नागरिकाला मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. या निमित्ताने त्यांनी बनारस आणि पुर्वांचलच्या लोकांचे या विकास प्रकल्पासाठी अभिनंदनही केले.
यावेळी पंतप्रधानांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजलीही अर्पण केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित केले. त्यांचा हाच दृष्टीकोन आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या वचनबद्धतेचा वारसा पुढे नेण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. आपले सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्रानुसार काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. पुर्वांचलमधील पशुपालन करणाऱ्या कुटुंबांचे, विशेषत: यासाठी मेहनतीने काम करत असलेल्या महिलांचे त्यांनी अभिनंदन केले. या महिलांनी या प्रदेशासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे, असे ते म्हणाले. या महिलांवर विश्वास ठेवल्यामुळेच आज इतिहास घडला आहे, असेही त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशातील बनास दुग्धालय प्रकल्पाशी (Banas Dairy Plant) संबंधित पशुपालन करणाऱ्या कुटुंबांना बोनसचे वितरण करण्यात आले असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. हा बोनस 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही काही भेट नाही, तर त्यांच्या कष्टाचे आणि समर्पणाचे फळ आहे, त्यांच्या श्रमाचा आणि चिकाटीचा हा आदर आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
बनास दुग्धालयाने (Banas Dairy) काशीमध्ये हजारो कुटुंबांचे जीवन बदलले आहे, त्यांच्या नशिबाला नवी दिशा दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. या दुग्धालयाने कायमच श्रमाला महत्त्व दिले आहे आणि लोकांच्या आकांक्षांना नवे पंख दिले आहेत असे ते म्हणाले. पुर्वांचलमधील अनेक महिला आता ‘लखपती दिदी’ बनल्या आहेत, त्या आता उपजीविकेची चिंता सोडून समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा बदल केवळ बनारस आणि उत्तर प्रदेशातच नाही, तर संपूर्ण देशात दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे, गेल्या दशकभरात दुग्ध उत्पादनात जवळपास 65% वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. हे यश कोट्यवधी शेतकरी आणि पशुपालकांमुळे शक्य झाले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. गेल्या दहा वर्षांतील सततच्या प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले आहे, असे ते म्हणाले. दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड सुविधेसोबत जोडणे, कर्जाची मर्यादा वाढवणे आणि अनुदान योजना सुरू करणे यांसारखे विविध उपक्रम युद्ध पातळीवर राबवले जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. जनावरांना होणार्या लाळ्या खुरखत अर्थात तोंड आणि पायाशी संबंधित आजारैंवर मोफत लसीकरण कार्यक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटित स्वरुपात दुधाचे संकलन करण्यासाठी 20,000 पेक्षा जास्त सहकारी संस्था पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याअंतर्गत आणखी लाखो नवीन सदस्य जोडले जातील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय गोकुळ अभियाना (Rashtriya Gokul Mission) अंतर्गत देशी गायींच्या जाती विकसित करण्यावर आणि वैज्ञानिक पद्धतीने त्यांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पशुपालकांना विकासाचे नवीन मार्ग, चांगली बाजारपेठ आणि संधींशी जोडणे हाच या उपक्रमांचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. बनास दुग्धालय संकुलही पूर्वांचल मध्ये याच दृष्टीने काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले. बनास दुग्धालयाच्या वतीने या प्रदेशात गीर गायींचे वितरण केले आहे, त्यामुळे त्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे आणि बनारसमध्ये जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही सुरू केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बनास दुग्धालय हे पुर्वांचलमधील जवळपास एक लाख शेतकऱ्यांकडून दूध संकलित करते, यामुळे या शेतकऱ्यांचेही सक्षमीकरण होत असून, त्यांच्या उपजीविकेलाही बळ मिळाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या दुग्धालयाच्या कामगिरीची प्रशंसा ही केली.
पंतप्रधानांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना कार्ड वाटप करण्याच्या लाभाचा उल्लेख केला. त्यांनी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना अधोरेखित करून हेच योजनेच्या यशाचे प्रमाण असल्याचे म्हटले. त्यांनी कुटुंबांच्या त्यांच्या घरातील वृद्धांच्या आरोग्यसेवेबद्दल असलेल्या चिंता समजून घेत 10-11 वर्षांपूर्वी पूर्वांचलमध्ये वैद्यकीय उपचारांबाबत आलेल्या अडचणीं बद्दलची आठवण सांगितली. या प्रदेशात झालेल्या मोठ्या सुधारणांची नोंद घेत त्यांनी सांगितले की, "काशी आता आरोग्य राजधानी बनत आहे". एकेकाळी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांपुरती मर्यादित असलेली प्रगत रुग्णालये आता लोकांच्या घराजवळ उपलब्ध आहेत, असे त्यांनी नमूद केले. विविध सुविधा लोकांच्या अधिक जवळ आणणे हेच विकासाचे सार असल्याचे ते म्हणाले.
गेल्या दशकात आरोग्यसेवेत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर भर देत मोदी म्हणाले की रुग्णालयांच्या संख्यावाढी बरोबरच रुग्णांचा सन्मान देखील वाढला आहे. आयुष्मान भारत योजना गरिबांसाठी एक वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना केवळ उपचारच नाही तर आत्मविश्वास देखील निर्माण करते असे ते म्हणाले. त्यांनी नमूद केले की वाराणसीतील हजारो आणि उत्तर प्रदेशातील लाखो लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे, प्रत्येक उपचार, शस्त्रक्रिया आणि मदत ही त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात ठरली आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की आयुष्मान भारत योजनेमुळे उत्तर प्रदेशातील लाखो कुटुंबांचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत, कारण सरकारने त्यांच्या आरोग्यसेवेची जबाबदारी घेतली आहे. आयुष्मान वय वंदना योजनेचा शुभारंभ करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचार देण्याच्या आपल्या आश्वासनाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की या उपक्रमामुळे 70 वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मोफत उपचार मिळतील.त्यांचे उत्पन्न कितीही असले तरीही उपचार मोफत केले जातील. वाराणसीमध्ये सर्वाधिक वय वंदना कार्ड जारी केले आहेत. जवळजवळ 50,000 कार्ड वितरित केले आहेत असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावर भर दिला की ही केवळ एक आकडेवारी नाही तर सेवेची वचनबद्धता आहे, ज्यामुळे कुटुंबांना जमीन विकण्याची, कर्ज घेण्याची किंवा वैद्यकीय उपचारांसाठी असहाय्यतेचा सामना करण्याची गरज नाहीशी होते. आयुष्मान कार्डमुळे आता सरकार त्यांच्या आरोग्यसेवेची आर्थिक जबाबदारी उचलेल असे आश्वासन त्यांनी दिले.
पंतप्रधानांनी काशीच्या पायाभूत सुविधांमधील उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. या सुविधांना पर्यटकांकडून व्यापक प्रशंसा देखील मिळाली आहे. लाखो लोक दररोज बनारसला भेट देतात, बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतात, प्रार्थना करतात आणि पवित्र गंगेत स्नान करतात. यापैकी अनेकांनी शहरातील महत्त्वपूर्ण बदलांवर भाष्य केले आहे. जर काशीचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ दशकापूर्वीच्या स्थितीत राहिले असते तर येणाऱ्या लोकांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले असते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
छोट्या उत्सवांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीची आठवण करून देत त्यांनी सांगितले की कश्याप्रकारे प्रवाशांना धूळ आणि उष्णतेचा सामना करत संपूर्ण शहरातून प्रवास करावा लागत असे. दरम्यान,फुलवारीया उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे अंतर कमी झाले आहे, वेळ वाचला आहे आणि दैनंदिन जीवनात दिलासा मिळाला आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी रिंग रोडच्या फायद्यांबद्दल देखील भाष्य केले. यामुळे जौनपूर आणि गाजीपूरमधील ग्रामीण भागातील रहिवाशांचा तसेच बलिया, मऊ आणि गाजीपूर जिल्ह्यातील विमानतळावर जाणाऱ्यांचा प्रवास वेळ खूपच कमी झाला आहे, ज्यामुळे तासनतास होणारी वाहतूक कोंडी देखील कमी झाली आहे. या प्रदेशातील सुधारित कनेक्टिव्हिटी अधोरेखित करून, गाझीपूर, जौनपूर, मिर्झापूर आणि आझमगड सारख्या शहरांमध्ये रुंद रस्ते प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करत असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, एकेकाळी वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले भाग आता विकासाचा वेग पाहत आहेत.
गेल्या दशकात वाराणसी आणि आसपासच्या भागात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुमारे ₹45,000 कोटींच्या गुंतवणुकीवर त्यांनी भर दिला. त्यांनी सांगितले की या गुंतवणुकीमुळे केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर विश्वासही वाढला आहे, ज्यामुळे काशी आणि शेजारील जिल्ह्यांना लाभ झाला आहे.
त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या पायाभरणीसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विस्ताराची घोषणा केली. पंतप्रधानांनी लाल बहादूर शास्त्री विमानतळाच्या चालू विस्तारीकरणावर आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विमानतळाजवळ सहा पदरी भूमिगत बोगद्याच्या बांधकामाबद्दल देखील माहिती दिली. यात त्यांनी भदोही, गाजीपूर आणि जौनपूरला जोडणाऱ्या प्रकल्पांच्या सुरुवातीची तसेच भिखारीपूर आणि मांडुआडीह येथे बहुप्रतिक्षित उड्डाणपुलांच्या बांधकामाची दखल घेतली. या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बनारस शहर आणि सारनाथला जोडणारा एक नवीन पूल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली, ज्यामुळे इतर जिल्ह्यातील प्रवाशांना सारनाथला जाताना शहरात प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. येत्या काही महिन्यांत, चालू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, बनारसमध्ये प्रवास करणे अधिक सोयीस्कर होईल, या प्रगतीमुळे या प्रदेशात गती आणि व्यावसायिक क्रियाकलापांना चालना मिळेल असे पंतप्रधानांनी नमूद केले. उपजीविका आणि आरोग्यसेवेसाठी बनारसला येणाऱ्यांसाठी वाढत्या सोयींवर त्यांनी भर दिला. काशीमध्ये सिटी रोपवेच्या चाचणीच्या सुरुवातीचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यामुळे बनारसला अशी सुविधा देणाऱ्या जागतिक स्तरावरील निवडक शहरांमध्ये स्थान मिळणार आहे.
वाराणसीतील प्रत्येक विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्वांचलच्या तरुणांना लाभदायक ठरतो हे अधोरेखित करून, काशीच्या तरुणांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सतत संधी उपलब्ध करून देण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. बनारसमध्ये नवीन स्टेडियम बांधणे आणि तरुण खेळाडूंसाठी उत्कृष्ट सुविधांच्या विकासाबद्दल त्यांनी भाष्य केले. वाराणसीतील शेकडो खेळाडू प्रशिक्षण घेत असलेल्या नवीन क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाची त्यांनी नोंद घेतली. खासदार क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना या मैदानांवर त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे असेही त्यांनी नमूद केले.
विकास आणि वारसा यांच्यात संतुलन राखण्याच्या भारताच्या प्रवासावर भर देत काशी हे या प्रकारचे सर्वात आदर्श उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गंगा नदीचा प्रवाह आणि भारताच्या जाणीवेबद्दल बोलताना ते म्हणाले की काशी म्हणजे भारताचा अंतरात्मा आणि वैविध्य यांचे नितांत सुंदर मिश्रण आहे. या ठिकाणी प्रत्येक भागांत वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती वसलेली आहे आणि काशीच्या प्रत्येक गल्लीत भारताच्या विविध रंगांचा अनुभव येतो असे सांगून एकतेचे बंध अधिक गहिरे करणाऱ्या काशी-तमिळ संगमम सारख्या उपक्रमांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या काळात काशी मध्ये सुरु होणाऱ्या एकता मॉल मध्ये एकाच छताखाली भारताच्या विविधतेचे दर्शन घडेल आणि देशभरातील विविध जिह्यांमधील वैविध्यपूर्ण उत्पादने मिळतील, असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश मध्ये क्रांतिकारी परिवर्तन झाले असून या राज्याच्या आर्थिक परिदृश्यासह त्याचा दृष्टिकोनही बदलला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेश ही आता केवळ शक्यतांची भूमी राहिली नसून क्षमता आणि कामगिरीची भूमी बनली आहे, असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर मेड इन इंडियाचा वाढता प्रतिध्वनी निनादत असून भारतात बनवलेली उत्पादने आता जागतिक ब्रँड म्हणून ओळखली जात आहेत. कित्येक उत्पादनांना जी आय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हे टॅग म्हणजे केवळ लेबल नव्हे तर त्या भूमीची ओळख दाखवणारे प्रमाणपत्र आहे. जी आय टॅग हे सूचित करतात की ते उत्पादन त्या मातीची निर्मिती असून जिथे जिथे जीआय टॅग पोहोचतो, तिथे मोठ्या बाजारपेठेतील उत्तम यशाचा मार्ग मोकळा होतो, असे ते म्हणाले.
देशभरात जीआय टॅगिंगमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे हे अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की या राज्यातील कला, हस्तकला आणि कौशल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती मान्यता मिळत आहे. वाराणसी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 30 उत्पादनांना जीआय टॅग प्राप्त झाले असून हे टॅग म्हणजे त्या वस्तूंची ओळख सांगणारा पासपोर्ट आहे, असे ते म्हणाले. वाराणसीतील तबला, शहनाई, भित्तिचित्रे, थंडाई, भरलेली लाल मिरची, लाल पेढा आणि तिरंगा बर्फी यासारख्या मान्यताप्राप्त उत्पादनांचा त्यांनी उल्लेख केला. याशिवाय जौनपूरची इमरती, मथुरेची सांझी कला, बुंदेलखंडचा काथ्या गहू, पिलीभीतची बासरी, प्रयागराजची मूंज कला, बरेलीची जरदोजी, चित्रकूट येथील लाकडावरील कोरीव काम आणि लखीमपूर खीरीची थारू जरदोजी या उत्पादनांना नुकताच जी आय टॅग मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. "उत्तर प्रदेशच्या मातीचा सुगंध आता आपल्या सीमा ओलांडून आपला वारसा दूरवर पसरवत आहे", असे ते म्हणाले.
काशीचे जतन करणे म्हणजे भारताच्या हृदयाला जपण्यासारखे आहे, असे सांगून काशीला निरंतर सक्षम करण्याच्या या कार्यात सर्वानी एकत्रित वचनबद्धता दाखवणे आवश्यक असून या नगरीचे सौंदर्य कायम ठेवून त्यातील प्राचीन वैभव आणि आधुनिक ओळख यांची सांगड घालणे गरजेचे आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. आपल्या वचनबद्धतेनुसार, वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, विशेषतः रस्ते संपर्क वाढवण्यासाठी या प्रदेशातील विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. याशिवाय, त्यांच्या हस्ते वाराणसी रिंग रोड आणि सारनाथ दरम्यानच्या रस्त्याच्या पुलाची, शहरातील भिखारीपूर आणि मंदुआडीह क्रॉसिंगवर उड्डाणपूल तसेच वाराणसी आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी राष्ट्रीय महामार्ग-31 वर 980 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या महामार्ग अंडरपास बोगद्याची पायाभरणी देखील करण्यात आली.
वीज पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी यावेळी वाराणसी विभागातील जौनपूर, चंदौली आणि गाजीपूर जिल्ह्यांमध्ये 1,045 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दोन 400 केव्ही आणि एका 220 केव्ही पारेषण उपस्थानक आणि संबंधित पारेषण रेखांचे उद्घाटन केले. वाराणसीतील चौकघाट येथे 220 केव्ही पारेषण उपस्थानक, गाझीपूरमध्ये 132 केव्ही पारेषण उपस्थानक तसेच 775 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाराणसी शहर वीज वितरण प्रणालीची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते करण्यात आली.
सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी सुविधा सुधारण्याकरता पोलिस लाईन येथे ट्रान्झिट हॉस्टेल आणि पीएसी रामनगर कॅम्पसमधील बॅरेक्सचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. याशिवाय विविध पोलिस स्टेशनमधील नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलिस लाईनमध्ये निवासी वसतिगृहाची पायाभरणी देखील यावेळी झाली.
सर्वांसाठी शिक्षणाची सुनिश्चिती करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंड्रा येथे सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बर्की गावात सरदार वल्लभभाई पटेल सरकारी महाविद्यालय, 356 ग्रामीण ग्रंथालये आणि 100 अंगणवाडी केंद्रे यासह प्रकल्पांचे उद्घाटन झाले. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 77 प्राथमिक शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण आणि वाराणसीतील चोलापूर येथे कस्तुरबा गांधी शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम याचीही पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. तर शहरातील क्रीडा पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी, उदय प्रताप महाविद्यालयात फ्लडलाइट्स आणि प्रेक्षक गॅलरीसह सिंथेटिक हॉकी टर्फ आणि शिवपूर येथे मिनी स्टेडियमची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते उभारण्यात आली.
पंतप्रधानांनी गंगा नदीवरील सामने घाट आणि शास्त्री घाटाचा पुनर्विकास, जल जीवन अभियानांतर्गत 345 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 130 ग्रामीण पेयजल योजना, वाराणसीच्या सहा नगरपालिका वॉर्डांमध्ये सुधारणा आणि वाराणसीच्या विविध ठिकाणी लँडस्केपिंग आणि शिल्पकला प्रतिष्ठापनांचे उद्घाटन देखील केले.
कारागिरांसाठी एमएसएमई युनिटी मॉल, मोहनसराय येथे ट्रान्सपोर्ट नगर योजनेची पायाभूत सुविधा विकास कामे, डब्ल्यूटीपी भेलुपूर येथे 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, 40 ग्रामपंचायतींमध्ये कम्युनिटी हॉल आणि वाराणसीतील विविध उद्यानांचे सुशोभीकरण यांचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
पंतप्रधानांनी तबला, चित्रकला, थंडाई, तिरंगा बर्फी यासह विविध स्थानिक वस्तू आणि उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्रमाणपत्रे प्रदान केली. बनास डेअरीशी संबंधित उत्तर प्रदेशातील दूध पुरवठादारांना 105 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोनस देखील त्यांनी हस्तांतरित केला.
***
JPS/S.Tupe/N.Chitale/T.Pawar/H.Kulkarni/B.Sontakke/P.Kor
(Release ID: 2121012)
Visitor Counter : 55
Read this release in:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada