पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

Posted On: 08 APR 2025 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

 

लाभार्थी : सर मी आज माझी यशोगाथा सांगू इच्छितो.पाळीव प्राण्याबद्दलच्या माझ्या छंदातून मी उद्योजक कसा झालो हे सांगू इच्छितो. माझ्या व्यवसाय उपक्रमाचे नाव आहे K9 वर्ल्ड.यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे पाळीव प्राणी आणि त्यांना लागणारी औषधे पुरवतो सर. मुद्रा योजनेतून कर्ज मिळाल्यानंतर आम्ही अनेक सुविधा सुरु केल्या, सर.पाळीव प्राण्यांच्या  निवाऱ्यासाठीची सुविधा आम्ही सुरु केली, ज्यांनी हे पाळीव प्राणी आपल्या घरात ठेवले आहेत त्यांना बाहेर जायचे असेल तर ते आमच्याकडे त्या प्राण्यांना ठेवून जाऊ शकतात आणि आमच्या इथे त्या प्राण्यांना तिथल्या घराप्रमाणेच वातावरण मिळते. प्राण्यांप्रती मला आगळी माया आहे,सर,मी स्वतः जेवलो किंवा नाही त्याने मला फरक पडत नाही पण मी या प्राण्यांना खाऊ घालतो सर.

पंतप्रधान : घरातल्या सर्वाना हे आवडत नसेल ?

लाभार्थी : सर, यासाठी मी सर्व श्वानांसह वेगळा असल्याप्रमाणे  राहतो,वेगळा निवारा आहे आणि यासाठी मी आपले आभार मानतो सर.कारण अनेक पशुप्रेमी आहेत, स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते  आहेत ते आता  आपल्यामुळे मोकळेपणाने काम करू शकतात, सर.कोणाचीही हरकत न येता, ते आपले काम करू शकतात. माझे जे घर आहे तिथे मी स्पष्ट म्हटले आहे की जी व्यक्ती  पशु प्रेमी नाही त्यांना इथे परवानगी नाही.

पंतप्रधान : इथे आल्यामुळे मोठी प्रसिद्धी होईल ?

लाभार्थी : नक्कीच ,सर.

पंतप्रधान : तुमचा निवारा अपुरा पडेल.

लाभार्थी : पूर्वी मी महिन्याला 20000 कमवू शकत होतो आता मी महिन्याला 40 ते 50 हजार कमवू शकतो.

पंतप्रधान : आता तुम्ही एक काम करा,जे बँकवाले होते,

लाभार्थी : हो सर,

पंतप्रधान : ज्यांच्या काळात आपल्याला हे कर्ज मिळाले होते त्यांना एकदा बोलावून आपल्या कामाच्या या साऱ्या  गोष्टी दाखवा आणि त्या बँकवाल्यांचे आभार माना. त्यांना सांगा, की आपण माझ्यावर विश्वास दाखवला, मला कर्ज दिले, त्यामुळे आता माझे काम पहा. अनेक जण  हे काम करण्याचे धाडस करत नाहीत.

लाभार्थी : नक्कीच सर.

पंतप्रधान : म्हणजे त्यांनाही बरे वाटेल की आपण एक चांगले काम केले.

लाभार्थी : तिथे  जे वातावरण असते, जिथे एकदम शांतता असते की पंतप्रधानांचे काम आहे त्याचे एक वलय असते, हे वातावरण त्यांनी काहीसे सैल केले आणि  ते आमच्यात मिसळले.ही बाब  मला अतिशय आवडली आणि त्याबरोबरच आणखी महत्वाचे म्हणजे  ते सर्व ऐकून घेतात.

लाभार्थी : मी केरळहून गोपीकृष्णन,मुद्रा कर्जावर आधारित उद्योजक.प्रधानमंत्री मुद्रा योजनेने मला यशस्वी उद्योजक केले आहे.घरे आणि कार्यालयांना नविकरणीय उर्जा साहित्य पुरविण्याचा माझा व्यवसाय असून त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.

पंतप्रधान :  आपण दुबईहून परतलात तेव्हा काय योजना होत्या ?

लाभार्थी : मी परत आल्यानंतर मला मुद्रा कर्जाबाबत माहिती मिळाली म्हणून मी तिथल्या  कंपनीचा राजीनामा दिला.

पंतप्रधान : म्हणजे तुम्हाला तिकडेच याबद्दल कळले होते ?  

लाभार्थी : हो,राजीनामा देऊन इथे आल्यानंतर मुद्रा कर्जासाठी अर्ज दिल्यानंतर  हे काम सुरु केले आहे.

पंतप्रधान : एका घरासाठी सूर्यघराचे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात ?  

लाभार्थी :आता जास्तीत जास्त दोन दिवस.

पंतप्रधान : दोन दिवसात काम करता.

लाभार्थी : हो सर, काम करतो.

पंतप्रधान : हे पैसे मी देऊ शकलो नाही तर काय होईल अशी भीती वाटली होती का ?  आई-वडीलही रागावले असतील,हा दुबईहून परत आला आता कसे होईल ?

लाभार्थी : आईला थोडी चिंता होती मात्र देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले.

पंतप्रधान : ज्यांना पीएम सूर्य घर योजनेतून आता मोफत वीज मिळत आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे ? कारण केरळ मधली घरे उंचावर नसतात, झाडे मोठ-मोठी असतात, सूर्य दर्शन जास्त वेळ होत नाही आणि पाऊसही असतो तर हे लाभार्थीं काय म्हणतात ?

लाभार्थी : ही यंत्रणा लावल्यानंतर त्यांचे वीज बिल 240 -250 रुपयांपर्यंत येते. ज्यांचे बिल 3000 येत होते त्यांचेही बिल आता 250 पेक्षा कमी येते.

पंतप्रधान : आता आपण दर महिन्याला किती कमावता ?खाती किती आहेत ?

लाभार्थी : ही रक्कम मला ...

पंतप्रधान : घाबरू नका, आयकरवाले नाही येणार, घाबरू नका.

लाभार्थी : अडीच लाख मिळतात.

पंतप्रधान : माझ्या शेजारी वित्त मंत्री बसले आहेत, त्यांना सांगतो, आपल्याकडे आयकरवाले येणार नाहीत.

लाभार्थी :  अडीच लाखापेक्षा जास्त मिळतात.

लाभार्थी : निद्रित अवस्थेत पाहतो  ती स्वप्ने नसतात  तर स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोप लागू देत नाहीत.संकटे येतील,अडचणीही  येतील, त्यांच्याशी जो लढा देईल तोच यशस्वी ठरेल.

लाभार्थी : हाऊस ऑफ पुचका याचा मी मालक आहे. घरी स्वैपाक केल्यानंतर तो चविष्ट असे तेव्हा सर्वांनी सुचवले की मी या क्षेत्रात जावे.त्यानंतर थोडा अभ्यास केला तेव्हा नफा वगैरे चांगला आहे, खाद्य पदार्थांची किंमत वगैरे बाबींकडे लक्ष पुरवले तर व्यवसाय यशस्वीरित्या चालवता येईल हे लक्षात आले.

पंतप्रधान : एक युवा, एक पिढी आहे , ज्यांना थोडे शिक्षण घेतल्यानंतर वाटते की आपण कुठेही नोकरी करून स्थिरावू, धोका पत्करायला नको.आपल्यात जोखीम घेण्याची क्षमता आहे.

लाभार्थी : हो

पंतप्रधान :मग आपले रायपुरमधले स्नेही  असतील,खाजगी कंपन्यामधलेही स्नेही असतील  आणि विद्यार्थी मित्रही असतील. त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे ?ते कोणते प्रश्न विचारतात ? त्यांना काय वाटते ? असे करू शकता येते का ? केले पाहिजे,त्यांनाही यात पुढे यायची इच्छा आहे का ?  

लाभार्थी :   सर, आता माझे वय 23 वर्षे आहे तर माझ्याकडे जोखीम घेण्याची क्षमता आहे,वेळही आहे तर हीच वेळ आहे. युवकांना वाटते आपल्याकडे पैसा नाही,मात्र त्यांना सरकारी योजनांची माहिती नाही. मी त्यांना सुचवू इच्छिते की आपण थोडी माहिती घ्या, मुद्रा कर्ज आहे, त्याचप्रमाणे पीएम ईजीपी अर्थात  पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज (Prime Minister’s Employment Generation Programme Loan - PMEGP Loan)  कर्ज आहे, काही कर्ज आपल्याला विना तारण मिळतात,तर आपल्यामध्ये क्षमता असेल तर आपण नोकरी सोडू शकता कारण आपल्यासमोर मोकळे अवकाश आहे, आपण व्यवसाय करू शकतो, तो पाहिजे तितका वाढवू शकतो.

लाभार्थी : ज्यांना शिखरापर्यंत जायचे आहे त्यांच्यासाठी पायऱ्या आहेत, आकाशा इतके उत्तुंग  आपले ध्येय्य आहे, आपला मार्ग आपण स्वतः आखायचा आहे. मी काश्मीरमधल्या बारामुल्ला इथल्या बेक माय केकचा मालक मुदासीर नक्शबंदी आहे. यशस्वी व्यवसायाद्वारे  मी नोकरीसाठी इच्छुक ते  नोकरी देणारा हा प्रवास केला आहे. बारामुल्लातील  दुर्गम भागातल्या 42 जणांना आम्ही स्थिर रोजगार पुरवला आहे.

पंतप्रधान : आपण इतक्या झपाट्याने प्रगती करत आहात,ज्या बँकेने आपल्याला कर्ज दिले, ते मिळण्यापूर्वी आपली काय परिस्थिती होती ?  

लाभार्थी : सर, साधारणपणे 2021 पूर्वी माझा व्यवसाय केवळ हजारामध्ये होता, लाखो-करोडोमध्ये नव्हता.

पंतप्रधान : इथे युपीआयचा वापर होतो का ?

लाभार्थी : सर, संध्याकाळी रोकड पाहतो तेव्हा माझी मोठी निराशा होते कारण 90 % व्यवहार युपीआयचे असतात आणि आमच्या हातात केवळ 10 % रोकड असते.

लाभार्थी : मला ते खूपच नम्र वाटले, आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी नव्हे तर आपल्या बरोबरीची एखादी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे असे वाटले, इतकी नम्रता मला जाणवली.

पंतप्रधान : सुरेश, आपल्याला ही माहिती कोठून मिळाली ?आधी काय काम करत होतात ? कुटुंबात पूर्वीपासून काय व्यवसाय आहे ?     

लाभार्थी – सर पूर्वी मी नोकरी करत होतो.

पंतप्रधान – कुठे?

लाभार्थी – वापी मध्ये, आणि 2022 मध्ये माझ्या मनात विचार आला की नोकरीतून काही होणार नाही आहे, त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे.

पंतप्रधान – वापीला तुम्ही जे रोज ट्रेन ने जात होता, रोजगार मिळवत होता, ती ट्रेनची मैत्री अतिशय विलक्षण असते, तर मग...

लाभार्थी – सर मी सिल्वासामध्ये राहतो आणि नोकरी मी वापी मध्ये करत होतो, आता माझे सर्व मित्र  सिल्वासामध्येच आहे.

पंतप्रधान – मला माहीत आहे सर्व अप-डाउन वाली गँग आहे ती, पण ते लोक आता विचारत असतील की तुम्ही आता कशी काय कमाई करता, काय करत आहात? त्यापैकी कोणाला असे वाटते का की मुद्रा लोन घेतले पाहिजे, कुठे तरी गेले पाहिजे?

लाभार्थी – हो सर अगदी अलीकडेच जेव्हा मी येथे येत होतो, तेव्हा माझ्या एका मित्राने सुद्धा मला सांगितले की जर शक्य झाले तर मला सुद्धा मुद्रा लोन साठी जरा मार्गदर्शन कर.

पंतप्रधान – सर्वप्रथम माझ्या घरी आल्याबद्दल मी तुम्ही सर्वांचे आभार मानतो. आपल्याकडे शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा पाहुणे घरी येतात, त्यांची पायधूळ पडते तेव्हा घर पवित्र होते. तर मी तुमचे खूप खूप स्वागत करतो. तुम्हा सर्वांचे देखील काही अनुभव असतील, कोणाचे काही भावनिक असे अनुभव असतील, आपले काम करत असताना. जर कोणाला असे काही सांगावेसे वाटत असेल तर ऐकायची माझी इच्छा आहे.

लाभार्थी – सर  सर्वात आधी मी तुम्हाला केवळ इतकेच सांगेन, कारण तुम्ही  मन की बात सांगता आणि ऐकता देखील, तर तुमच्या समोर एका अतिशय लहान अशा रायबरेली या शहरातील एक महिला व्यापारी उभी आहे, जो  या गोष्टीचा दाखला आहे की तुमचे सहकार्य आणि पाठबळ यामुळे जितका फायदा MSMEs ना होत आहे, म्हणजेच माझ्यासाठी येथे येणे हाच खूप भावनोत्कट प्रसंग आहे आणि आम्ही तुम्हाला हे वचन देतो की आम्ही एकत्रितपणे भारताला विकसित भारत बनवू, ज्या प्रकारे तुम्ही सहकार्याने आणि अगदी स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे MSMEs ना वागवत आहात, मग आम्हाला परवाना मिळवण्यासाठी ज्या समस्या येत होत्या त्या असोत, फंडिंगविषयी असोत , सरकारकडून त्या आता होत नाहीत...

पंतप्रधान – तुम्हाला निवडणूक लढवायची आहे का?

लाभार्थी – नाही-नाही सर हे सर्व माझे मनोगत आहे जे मी तुम्हाला सांगितले आहे कारण मला असे वाटले की पूर्वी मला या समस्येला तोंड द्यावे लागत होते, म्हणजे जेव्हा कर्ज वगैरे घ्यायला जात होतो, तेव्हा नाकारले जायचे.

पंतप्रधान – तुम्ही हे सांगा, तुम्ही काय करता?

लाभार्थी – बेकरी-बेकरी

पंतप्रधान - बेकरी

लाभार्थी – हो- हो.

पंतप्रधान -  सध्या तुम्ही किती पैसे कमवत आहात?

लाभार्थी – सर माझी जी महिन्याची उलाढाल आहे ती अडीच ते तीन लाख रुपयांची होत आहे.

पंतप्रधान – बरं, आणखी किती लोकांना काम देत आहात?

लाभार्थी – सर  आमच्याकडे सात ते आठ लोकांचा ग्रुप आहे.

पंतप्रधान – अच्छा.

लाभार्थी – हो.

लाभार्थी – सर माझे नाव लवकुश मेहरा आहे, मी भोपाळचा , मध्य प्रदेशमधील आहे. मी पूर्वी नोकरी करत होतो सर, कोणाकडे तरी नोकरी करत होतो, तर नोकर होतो सर, पण तुम्ही आमची गॅरंटी घेतली आहे सर, , मुद्रा लोनच्या माध्यमातून आणि सर आज आम्ही मालक बनलो आहोत. प्रत्यक्षात मी एमबीए आहे आणि  फार्मास्युटिकल उद्योगाचे मला अजिबात ज्ञान नव्हते. मी 2021 मध्ये माझे काम सुरू केले आणि सर मी सुरुवातीला बँकांशी संपर्क साधला, त्यांनी मला 5 लाख रुपयांचे सीसी लिमिट मुद्रा लोन दिले. पण सर मला अशी भीती वाटत असायची की पहिल्यांदाच इतके मोठे कर्ज घेत आहे, तर फेडता येईल की नाही फेडता येणार. तर मी त्यापैकी तीन-साडेतीन लाख रुपयेच खर्च करत होतो सर. पण सर आजच्या तारखेला माझे मुद्रा लोन पाच लाखांवरून साडेनऊ लाख रुपये झाले आहे.  आणि माझी पहिल्या वर्षाची 12 लाख रुपयांची उलाढाल होती ती आजच्या तारखेला जवळपास more than 50 लाख झाली आहे.

पंतप्रधान – तुमचे इतर काही मित्र असतील त्यांना असे वाटते का, की जीवनाची ही देखील एक पद्धत आहे.

लाभार्थी – येस सर.

पंतप्रधान – शेवटी मुद्रा योजना ही काही मोदी यांची वाहवा करण्यासाठी नाही आहे, मुद्रा योजना माझ्या देशातील युवा वर्गाला आपल्या पायांवर उभे राहण्याची हिंमत देण्यासाठी आहे आणि त्यांचा निर्धार भक्कम होत राहिला पाहिजे, मी उदरनिर्वाहासाठी का म्हणून भटकत राहू. मी 10 लोकांना रोजगार देईन.

लाभार्थी – हो सर

पंतप्रधान – ही वृत्ती निर्माण करायची आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा अनुभव येत असेल ना?

लाभार्थी – येस सर, माझे जे गाव आहे- बाचावानी हे माझे गाव भोपाळपासून सुमारे  100 किलोमीटरवर आहे. तिथे किमान दोन ते तीन लोकांनी ऑनलाईन डिजिटल दुकाने सुरू केली आहेत, कोणी फोटो स्टुडियोसाठी देखील एकेक, दोन-दोन लाखांचे कर्ज घेतले आहे आणि मी त्यांना देखील मदत केली आहे सर. अगदी जे माझे मित्र आहेत सर...

पंतप्रधान – कारण आता तुम्हा लोकांकडून माझ्या अपेक्षा आहेत,  की तुम्ही लोकांना रोजगार तर देत आहात पण तुम्ही लोकांना सांगा की  कोणत्याही तारणाविना पैसे मिळत आहेत, घरी बसून काय करत आहात, जा बाबांनो, माहिती घेण्यासाठी बँक वाल्यांना जाऊन त्रास द्या.

लाभार्थी – केवळ या मुद्रा लोनमुळे मी अलीकडेच सहा महिन्यांपूर्वी 34 लाखांचे माझे स्वतःचे घर घेतले आहे.

पंतप्रधान – अरे वा.

लाभार्थी –  पूर्वी मी 60-70 हजार रुपयांची नोकरी करत होतो, आज मी per month more than 1.5 lakh स्वतः कमवत आहे सर.

पंतप्रधान - चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

लाभार्थी – आणि सर तुमच्यामुळे Thank You So Much Sir.

पंतप्रधान – बाबांनो हे स्वतःचे कष्ट उपयोगाला येतात.

लाभार्थी – मोदी जींचे आम्हाला अजिबात असे वाटले नाही की आम्ही पंतप्रधान महोदयांसोबत बोलत आहोत. असे वाटले की जणू काही आमच्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ सदस्य आमच्यासोबत बोलत आहेत.  ते कशा प्रकारे, म्हणजे खाली त्यांची जी मुद्रा लोनची योजना सुरू आहे त्यामध्ये आम्ही कशा प्रकारे यशस्वी झालो, ती संपूर्ण कहाणी त्यांनी ऐकून घेतली. त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला प्रेरित केले आहे की तुम्ही इतर लोकांना देखील या मुद्रा लोनबाबत इतर लोकांमध्ये जनजागृती करा जेणेकरून आणखी सक्षमीकरण होईल आणि आणखी जास्त लोक आपला व्यापार सुरू करतील.

लाभार्थी – मी भावनगर गुजरात येथून आलो आहे.

पंतप्रधान -  सर्वात लहान वाटता तुम्ही?

लाभार्थी – येस सर.

पंतप्रधान – या सर्व गटामध्ये?

लाभार्थी – मी शेवटच्या वर्षात आहे आणि 4 महिने....

पंतप्रधान – तुम्ही शिकता आणि कमवत आहात?

लाभार्थी – येस.

पंतप्रधान – शाब्बास!

लाभार्थी – मी आदित्य टेक लॅब चा संस्थापक आहे ज्यामध्ये मी 3D प्रिंटिंग, रिवर्स इंजिनियरिंग आणि रॅपिड प्रोटो टाइपिंग आणि त्याबरोबरच थोडे थोडे रोबोटिक्सचे काम देखील करतो. मी mekatronix चा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे तर ऑटोमेशन आणि ते सर्वात जास्त असते. तर जसे मुद्रा लोन ने मला हे, म्हणजे आता माझे वय 21 वर्षे आहे तर त्यामध्ये सुरुवात करताना मी बरेच काही ऐकले होते की प्रक्रिया खूपच किचकट आहे, या वर्षी नाही मिळणार, कोण विश्वास ठेवेल, आता तर एक-दोन वर्षांच्या नोकरीचा अनुभव घ्यावा लागेल, त्यानंतर लोन मिळेल, तर जशी सौराष्ट्र ग्रामीण बैंक आहे आमच्या भावनगरमध्ये तर मी तिथे जाऊन माझी आयडिया, म्हणजे मला काय करायचे आहे, हे सर्व सांगितले, तर ते लोक म्हणाले की ठीक आहे. तुम्हाला मुद्रा लोनची किशोर श्रेणी आहे 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची त्या अंतर्गत कर्ज मिळेल, तर मी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि चार महिन्यांपासून करत आहे, सोमवार ते शुक्रवार मी कॉलेजमध्ये जातो आणि आठवड्याच्या शेवटी भावनगरमध्ये राहून माझे जे पेंडिंग वर्क आहे ते संपवतो आणि आता मी महिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करत आहे.

पंतप्रधान- .अच्छा

लाभार्थी - हो.

पंतप्रधान - किती लोक काम करतात?

लाभार्थी - सध्या मी दूरस्थपणे काम करतो.

पंतप्रधान - तुम्ही दोन दिवस काम करता.

लाभार्थी - मी दूरस्थपणे काम करतो, आई आणि बाबा घरी असतात, ते मला अर्धवेळ मदत करतात. मुद्रा कर्जामुळे आर्थिक मदत तर मिळतेच, पण स्वतःवर जे विश्वास ठेवणे आहे ना, धन्यवाद सर!

लाभार्थी - सध्या आम्ही मनालीमध्ये आमचा व्यवसाय करत आहोत. सुरुवातीला माझे पती भाजी मंडईत  काम करायचे, मग लग्नानंतर, मी त्यांच्यासोबत आले  तेव्हा मी त्यांना सुचवले  की दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा आपण दोघे एक दुकान सुरू करूया.  सर, मग आम्ही भाजीचे दुकान सुरू केले, आम्ही भाजीपाला विकायला लागलो, हळूहळू लोक म्हणू लागले की पीठ आणि तांदूळ ठेवा, मग सर, पंजाब नॅशनल बँकेचे कर्मचारी आमच्याकडे भाजीपाला घेण्यासाठी येत असत, म्हणून मी त्यांना विचारले  की जर आम्हाला पैसे घ्यायचे असतील तर ते मिळतील का, तेव्हा त्यांनी प्रथम नकार दिला, म्हणजे  ही 2012-13 ची गोष्ट आहे, मग मी  म्हटले.....

पंतप्रधान - तुम्ही  2012-13 मधल्या स्थितीविषयी सांगत आहात, जर कोणा  पत्रकाराला हे कळले तर तुम्हाला म्हणतील की तुम्ही मागील सरकारवर टीका करत आहात.

लाभार्थी - तर मग त्यांनी, नाही-नाही, मग त्यांनी विचारले की तुमच्याकडे काही मालमत्ता वगैरे आहे, मी म्हटले नाही, जसे  आम्हाला या मुद्रा कर्जाबद्दल कळले, तेव्हा 2015-16 मध्ये याची सुरुवात झाली, तेव्हा मी त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की योजना सुरू झाली आहे, जर तुम्हाला हवे असेल तर.  सर, मी सांगितले की आम्हाला त्याची गरज आहे, तेव्हा त्यांनी आमच्याकडे कोणताही कागद, पत्र किंवा काहीही मागितले नाही. त्यांनी  आम्हाला पहिल्यांदाच अडीच लाख रुपये दिले. ते अडीच लाख रुपये मी दोन अडीच वर्षातच फेडले,  त्यांनी मला पुन्हा  500000  रुपये दिले, मग मी रेशन दुकान उघडले, मग ती दोन्ही दुकाने मला  लहान पडू  लागली, सर , माझे काम खूप वाढू लागले, म्हणजे, मी वर्षाला दोन अडीच लाख कमवत असे, आज मी वर्षाला 10 ते 15 लाख कमवत आहे.

पंतप्रधान -वा छान !

लाभार्थी - मग, मी 5 लाख रुपयांचीही परतफेड केली, म्हणून त्यांनी मला 10 लाख दिले, सर, मी 10 लाखही फेडले, तेव्हा अडीच वर्षात असेच, म्हणून आता त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये मला15 लाख दिले आहेत. आणि सर, माझे काम खूप वाढत आहे आणि मला बरे वाटते की जर आपले पंतप्रधान असे आहेत आणि ते आपल्याला साथ  देत आहेत, तर आपणही त्यांना तशीच साथ दिली पाहिजे, आम्ही कुठेही असे काहीही चुकीचे घडू देणार नाही ज्यामुळे आमचे  करिअर खराब होईल, हो, त्या लोकांनी पैसे परत केले नाहीत, असे कोणी म्हणता कामा नये.  आता  बँकेचे लोक 20 लाख रुपये घ्या म्हणत होते,  पण मी सांगितले की आता आमची  गरज भागली आहे, तरीही ते म्हणाले की 15 लाख रुपये ठेवा आणि गरज पडल्यास ते काढा, व्याज वाढेल, जर तुम्ही ते काढले नाही तर ते वाढणार नाहीत. पण सर, मला तुमची योजना खूप आवडली.

लाभार्थी - मी आंध्र प्रदेशातली आहे. मला हिंदी येत नाही, पण मी तेलुगूमधून बोलेन.

पंतप्रधान - काही हरकत नाही, तुम्ही तेलुगूमधून बोला.

लाभार्थी- असे आहे सर ! माझे लग्न 2009 मध्ये झाले.  2019 पर्यंत मी गृहिणी होते. कॅनरा बँकेच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रात तेरा दिवस मला ज्यूट बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  मला बँकेमार्फत मुद्रा योजनेअंतर्गत 2 लाखांचे कर्ज मिळाले. मी नोव्हेंबर 2019 मध्ये माझा व्यवसाय सुरू केला. कॅनरा बँकेच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि 2 लाख रुपये मंजूर केले. त्यांनी तारण म्हणून काही मागितले नाही, कर्ज मिळविण्यासाठी कोणत्याही मदतीची आवश्यकता नव्हती. मला कोणत्याही तारणाशिवाय  कर्ज मंजूर झाले. नियमित कर्जफेड केल्यामुळे 2022 मध्ये कॅनरा बँकेने अतिरिक्त 9.5 लाख रुपये मंजूर केले आहेत. आता पंधरा लोक माझ्या हाताखाली काम करत आहेत.

पंतप्रधान - म्हणजे 2 लाखांपासून सुरुवात केलीत आणि साडेनऊ लाखांवर पोहोचलात.

लाभार्थी - होय सर.

पंतप्रधान - किती लोक तुमच्यासोबत काम करत आहेत?

लाभार्थी - 15 जण सर.

पंतप्रधान -15.

लाभार्थी - सगळ्या जणी गृहिणी आहेत आणि आरसीटी( ग्रामीण स्वयं-रोजगार केंद्र) प्रशिक्षणार्थी आहेत. मी पूर्वी एक प्रशिक्षणार्थी होते, आता एक अध्यापक आहे. या संधीबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक यू. . धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.

पंतप्रधान - थँक यू, थँक यू, धन्यवाद.

लाभार्थी -सर, माझे नाव पूनम कुमारी आहे. सर, मी खूप गरीब कुटुंबातून आहे, आमचे कुटुंब खूप गरीब होते, खूप गरीब....

पंतप्रधान - तुम्ही प्रथमच  दिल्लीत येत आहात का?

लाभार्थी - हो सर.

पंतप्रधान - वा.

लाभार्थी - आणि मी विमानातही पहिल्यांदाच बसले सर.

पंतप्रधान- अच्छा.

लाभार्थी - माझ्याकडे  इतकी गरिबी होती की जर मी दिवसातून एकदा जेवले तर मला दुसऱ्या वेळेस  विचार करावा लागे, पण सर मी खूप हिमतीने पाऊल उचलले, मी एका शेतकरी कुटुंबातील आहे.

पंतप्रधान - आरामात..शांत व्हा.. तुम्ही ठीक आहात?

लाभार्थी -तर मी सांगत होते मी शेतकरी कुटुंबातली आहे. मला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. मी माझ्या पतीशी चर्चा केली, आपण कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करूया. ते म्हणाले, की तू चांगले सुचवत आहेस. आपण हे करूया. माझ्या पतीने मित्रांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, मुद्रा कर्ज तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, तुम्ही हे करा. मग मी बँकेतल्या लोकांकडे गेले, एसबीआय बँकेत (ठिकाणाचे नाव स्पष्ट नाही) तेव्हा त्यांनी मला सांगितले की हो तुम्ही ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय घेऊ शकता. तर सर, तिथून मला 8 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आणि मी व्यवसाय सुरू केला. मी ते 2024 मध्ये घेतले आहे सर आणि खूप चांगली प्रगती  झाली आहे सर.

पंतप्रधान - तुम्ही काय काम करता?

लाभार्थी - सर, बियाणे... ज्यामध्ये माझे पती खूप मदत करतात, मार्केटचे बहुतांश काम तेच करतात, मी एक कर्मचारी देखील ठेवला आहे, सर.

पंतप्रधान- अच्छा.

लाभार्थी - हो सर. आणि मी खूप पुढे जात आहे सर, मला खात्री आहे की मी हे कर्ज लवकरच फेडेन, मला पूर्ण विश्वास आहे.

पंतप्रधान - तर आता  एका महिन्यात किती कमवू शकता ?

लाभार्थी - सर, 60000 पर्यंत जाते.

पंतप्रधान - अच्छा,60000 रुपये. मग कुटुंबाला आता विश्वास वाटत आहे?

लाभार्थी- नक्कीच सर एकदम वाटत आहे, तुमच्या या  योजनेमुळे आज मी स्वावलंबी आहे.

पंतप्रधान -  तुम्ही खूप छान काम केले आहे.

लाभार्थी -धन्यवाद सर, मला तुमच्याशी बोलायची खूप इच्छा होती सर, माझा विश्वासच बसत नव्हता की मला  मोदीजींना भेटायला मिळणार आहे, मी विश्वासच ठेवू शकत नव्हते, मी जेव्हा दिल्लीला आले, तेव्हाही वाटले, खरेच का, आणि अरे खरंच, हे प्रत्यक्षात येत आहे. धन्यवाद सर, माझ्या पतीचीही इच्छा होती, मला यायला मिळत असल्याचा त्यांना आनंद झाला.  मला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान - माझे ध्येय हेच आहे की माझ्या देशातला प्रत्येक  सामान्य नागरिक विश्वासाने इतका परिपूर्ण असावा, की अडचणी आल्या, प्रत्येकाला येतात, आयुष्यात संकटे येतात, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा अडचणींवर मात करून जीवनात पुढे जायचे असते, आणि मुद्रा योजनेने हेच काम केले आहे.

लाभार्थी -होय सर.

पंतप्रधान- आपल्या देशात खूप कमी लोक आहेत, ज्यांना या गोष्टी समजतात की शांतपणे क्रांती कशी घडत आहे. हे खूप मोठे साइलेंट रेवोल्यूशन आहे.

लाभार्थी -सर, मी इतर लोकांनाही मुद्रा योजनेबाबत सांगण्याचा प्रयत्न करते

प्रधानमंत्री - इतरांनाही सांगितले पाहिजे.

लाभार्थी - नक्की सर.

पंतप्रधान - बघा, आपल्याकडे , आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सांगितले जायचे, शेती उत्तम, व्यापार मध्यम आणि नोकरी दुय्यम, असे ऐकायचो, नोकरीचे स्थान सर्वात शेवटी होते. हळूहळू समाजाची मानसिकता इतकी बदलली की नोकरी पहिली, कुठेतरी सर्वप्रथम नोकरी मिळवायची आणि स्थिरस्थावर व्हायचे. जीवनात सुरक्षा  येते.

व्यापार मध्यमच राहिला आणि लोकांची मानसिकता अशी झाली शेती करणे हा शेवटचा पर्याय वाटू लागला. इतकेच नाही तर शेतकरी देखील काय करतात, एखाद्या शेतकऱ्याला जर तीन मुले असतील तर त्यापैकी एकाला तो सांगतो तू शेती कर आणि दुसऱ्या दोघांना तो सांगतो की तुम्ही कुठेतरी नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवा. तर आजचा जो विषय आहे त्याप्रमाणे व्यापार नेहमी मध्यमच मानला गेला आहे. पण आजचा भारतीय युवक, त्यांच्याकडे जे नवउद्योजकता कौशल्य आहे, या युवकांचा हात धरून जर त्याला कोणी मदत केली तर तो चांगली प्रगती करू शकतो. कोणत्याही सरकारचे डोळे उघडणारी बाब म्हणजे या मुद्रा योजनेत महिलांनी सर्वात जास्त सहभाग घेतला आहे, कर्ज मिळवण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्यात महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, कर्ज प्राप्त करणाऱ्यात देखील महिलांची संख्या सर्वात जास्त आहे आणि याशिवाय कर्जाची परतफेड लवकरात लवकर करणाऱ्यात देखील स्त्रियांची संख्याच सर्वात जास्त आहे. म्हणजेच हे एक नवे क्षेत्र आहे आणि विकसित भारतासाठी ज्या संभाव्य संधी आहेत त्या याच शक्ती मध्येच आहेत, हे दिसून येत आहे. म्हणूनच मला असे वाटते की आपण एक असे वातावरण तयार केले पाहिजे, तुम्ही जे यश संपादित केले आहे, तुम्हाला माहिती आहे की त्यासाठी तुम्हाला कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या चिठ्ठीची गरज पडली नसेल, कोणत्याही आमदाराच्या किंवा खासदाराच्या घरी चकरा माराव्या लागल्या नसतील, तुम्हाला कोणालाही एक रुपया देखील द्यावा लागला नसेल, याचा मला विश्वास आहे. कुठल्याही हमीशिवाय आपल्याला पैसे मिळणे आणि एकदा पैसे मिळाल्यावर त्यांचा सदुपयोग करणे ही आपोआपच आपल्या आयुष्याला एक वळण लावणारी गोष्ट आहे. नाहीतर काही लोकांना वाटेल की चला आता कर्ज घेतले दुसऱ्या शहरात जाऊ, तिथे आपल्याला बँकेतले लोक कुठे शोधत येणार. ही आयुष्याला आकार देण्याची संधी आहे, माझ्या देशातील जास्तीत जास्त युवकांनी या क्षेत्रात यावे अशी माझी इच्छा आहे. 33 लाख कोटी रुपये या देशातील लोकांना कोणत्याही हमीशिवाय देण्यात आले आहेत, हे तुम्ही जाणताच. तुम्ही वृत्तपत्रात वाचतच असाल की हे श्रीमंतांचे सरकार आहे. सगळ्या श्रीमंतांची बेरीज केली तरीही त्यांना 33 लाख कोटी रुपये मिळाले नसतील. माझ्या देशातील सामान्य लोकांना 33 लाख कोटी रुपये हातात दिले आहेत. देशातील तुमच्यासारख्या कर्तुत्ववान युवक युवतींना हे पैसे देण्यात आले आहेत. आणि यापैकी सर्वांनी कोणी एकाला, कोणी दोघांना, कोणी दहा जणांना, तर कोणी 40 - 50 जणांना रोजगार दिला आहे. म्हणजेच रोजगार देण्याची ही मोठी कामगिरी अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. त्यामुळे उत्पादन तर होतेच आहे पण सामान्य माणूस पैसे देखील कमावत असून जो पूर्वी वर्षात एकदाच नवीन शर्ट घेत होता तो आता दोन वेळा खरेदी करू लागेल. आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ते संकोच करायचे पण आता ते म्हणतात की चला मुलांना शिकवू या. याच प्रकारे प्रत्येक गोष्टीचा सामाजिक जीवनात खूप लाभ होत असतो. या योजनेची दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. सामान्यतः सरकारची अशी पद्धत असते की एक निर्णय घ्यायचा, मग एक पत्रकार परिषद घ्यायची, त्या निर्णयाची घोषणा करायची आणि सांगायचे की आम्ही असे करणार आहोत. त्यानंतर काही लोकांना बोलवून दीपप्रज्वलन करायचे, लोक टाळ्या वाजवतात, जर तुम्हाला वर्तमानपत्रांबाबत काळजी वाटत असेल तर त्यातही ठळक बातमी छापून येईल, मग त्यानंतर मात्र त्या निर्णयाची वास्तपुस्त कोणीही घेत नाही. 

मात्र आमचे सरकार असे आहे की जे एका योजनेचा दहा वर्षानंतर देखील हिशेब ठेवत आहे, आणि लोकांकडून माहिती घेत आहे की चला, आम्ही तर म्हणतो ही योजना यशस्वी झाली, पण तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटते. आज मी जसा तुम्हाला या योजनेच्या सफलतेबाबत प्रश्न विचारत आहे त्याप्रमाणेच देशभरात माझे साथीदार तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न विचारणार आहेत आणि या योजनेच्या सफलतेबाबत माहिती गोळा करणार आहेत. या योजनेत काही बदल किंवा सुधारणा करायच्या असतील अशा सूचना मिळाल्या तर त्यानुसार पावले उचलली जाणार आहेत. या योजनेत सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपये कर्जाच्या रकमेत वाढ करून ती 5 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली. आमच्या सरकारचा तुमच्यावर असलेला विश्वास लक्षात घ्या. पूर्वी सरकार देखील असे विचार करत होते की 5 लाख रुपयांच्यावर कर्ज दिले जाऊ नये, कारण ते बुडाले तर नुकसान होईल, मग या सर्वांचे खापर मोदींच्या डोक्यावर फुटले असते. मात्र माझ्या देशातील लोकांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तर तो आणखीनच भक्कम केला. त्यामुळेच माझी हिम्मत वाढली आणि कर्जाची रक्कम 50000 रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. हा निर्णय छोटा नाही. हा निर्णय तेव्हाच घेतला जाऊ शकतो जेव्हा या योजनेची सफलता आणि लोकांवरचा विश्वास स्पष्ट दिसत असतो. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. 

माझी अशी अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पाच - दहा लोकांना रोजगार देत आहात त्याचप्रमाणे पाच - दहा लोकांना मुद्रा योजना कर्ज घेऊन काही व्यवसाय करण्यासाठी तुम्ही प्रेरित करावे, त्यांची हिम्मत वाढवावी. म्हणजे, त्या लोकांनाही विश्वास वाटू लागेल. या योजनेअंतर्गत देशात 52 कोटी लोकांना कर्ज देण्यात आले आहे. कदाचित ते 52 कोटी लोक नसतील, जसे सुरेश यांनी सांगितले की त्यांनी पहिल्यांदा अडीच लाख रुपये कर्ज घेतले आणि मग त्यानंतर 9 लाख रुपये कर्ज घेतले म्हणजेच त्यांनी दोन वेळा कर्ज घेतले. तरीही 52 कोटी लोकांना कर्ज देणे, ही संख्या खूप मोठी आहे. जगातले इतर देश असा विचार देखील करू शकत नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की आपली तरुण पिढी आपण इतकी सक्षम बनवू की तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू कराल आणि तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील.

मला आठवते जेव्हा मी गुजरात मध्ये होतो तेव्हा एक उपक्रम राबवला जात होता तो म्हणजे - गरीब कल्याण मेळा. त्यामध्ये मुले एक पथनाट्य सादर करत होती. त्याचा विषय होता ‘आता मला गरीब राहायचे नाही’. हे पथनाट्य लोकांना प्रेरणा देणारे होते. हे पथनाट्य पाहिल्यावर बरेच वेळा काही लोक मंचावर यायचे आणि आपल्याकडे असलेली शिधापत्रिका सरकारला परत करत म्हणायचे की, आता आम्ही गरीबीतून बाहेर आलो आहोत, आता आम्हाला ही सुविधा नको. हे लोक आपण आपली स्थिती कशी बदलली याबद्दल मंचावरून सर्वांना माहिती द्यायचे. एकदा बहुतेक मी वलसाड जिल्ह्यात होतो. आठ दहा लोकांचा एक गट आला आणि त्या सर्वांनी त्यांना गरीब म्हणून मिळणाऱ्या ज्या काही सुविधा होत्या त्या सरकारला परत केल्या. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव सर्वांना सांगितला. तो काय होता? ते सर्वजण आदिवासी समुदायातील लोक होते आणि ते आदिवासी मध्ये भगत म्हणून काम करत होते. त्यांचे काम म्हणजे भजनी मंडळात गायन वादन करणे, रोज संध्याकाळी गायन वादन करणे हेच काम करत होते. मग त्यांना एक दोन लाख रुपयाचे कर्ज मिळाले. तेव्हा तर मुद्रा योजना देखील नव्हती. माझे सरकार तिथे एक योजना चालवत होते. त्या योजनेतून या लोकांनी काही वाद्ये खरेदी केली आणि ती वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले मग दहा-बारा लोकांचा गट तयार करून त्यांनी बँड वाजवणारी कंपनी तयार केली. हा गट मग लग्न इत्यादी प्रसंगांमध्ये बँड वाजवण्यासाठी जाऊ लागला. त्यांनी स्वतःसाठी खूप चांगला गणवेश देखील बनवला होता. हळूहळू हा बँड वादक गट खूपच प्रसिद्ध झाला आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. प्रत्येक जण दरमहा 50 ते 60 हजार रुपये कमवू लागला. म्हणजे छोटीशी गोष्ट देखील किती मोठे बदल घडवू शकते याचे उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी अनेक वेळा पाहिले आहे. याच उदाहरणांमधून मला प्रेरणा मिळते की अशी बदल घडवणारी शक्ती देशातील एका व्यक्तीत नाही तर अनेकांमध्ये आहे. मग चला असे काहीतरी करू. 

देशातील लोकांच्या सोबतीने देश घडवला जाऊ शकतो. देशातील लोकांच्या आशा, आकांक्षा आणि परिस्थितीचा अभ्यास करून हे रूपांतर घडवले जाऊ शकते. ही मुद्रा योजना याचेच एक रूप आहे. तुम्ही या सफलतेला आणखी नव्या उंचीवर पोहोचवाल याचा मला विश्वास आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोक लाभ घेतील अशी आशा करतो. समाजाने तुम्हाला काही दिले आहे तर तुम्ही देखील समजाला काहीतरी परत केले पाहिजे. केवळ मौज मजा न करता समाजाला काहीतरी परत करण्याचा विचार केला पाहिजे. समाज ऋण फेडले तर मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो. 

चला. खूप खूप धन्यवाद!


* * *

JPS/Tupe/Nilima/Shailesh/Sonali/Shraddha/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120341) Visitor Counter : 33