पंतप्रधान कार्यालय
राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान तामिळनाडूला भेट देणार, रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार
पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण होणार
रामेश्वरम-तांबाराम (चेन्नई) या नवीन रेल्वे सेवेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार
Posted On:
04 APR 2025 2:35PM by PIB Mumbai
राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी तामिळनाडूला भेट देणार आहेत. ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास नव्या पंबन रेल्वे पूल - भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील.
त्यानंतर दुपारी 12:45 च्या सुमारास ते रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. दुपारी दिडच्या सुमारास ते रामेश्वरममध्ये 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच राष्ट्रार्पण करतील. या प्रसंगी ते एका मेळाव्यासही संबोधित करणार आहेत.ॅ
पंतप्रधान नव्या पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील आणि रामेश्वरम-तांबाराम (चेन्नई) नव्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील. रामायणातल्या दाखल्यानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते, त्यामुळे या पुलाला एक सखोल सांस्कृतिक महत्त्व आहे.
रामेश्वरम द्विप ला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकीचा उल्लेखनीय पराक्रम असून 550 कोटी रुपये खर्च या पुलाच्या बांधकामासाठी लागला आहे. या पुलाची लांबी 2 पूर्णांक 8 किलोमीटर आहे, 99 स्पॅन इतका विस्तार असून 72 पूर्णांक 5 मीटर उर्ध्व विस्तार आहे. 17 मीटर उंचीपर्यंत वर उचलण्याची क्षमता असल्याने रेल्वे आणि जहाजांची ये -जा सहज होऊ शकणार आहे. पोलादी बळकटीकरण, उच्च-दर्जाचे संरक्षणात्मक रंग आणि पूर्णपणे जोडणीसह बांधलेला असल्याने पुलाचा टिकाऊपणात अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे देखभाल खर्च कमी लागणार आहे. भविष्यातील गरजा सामावून घेण्यासाठी दुहेरी लोहमार्ग टाकता येतील, या पद्धतीची रचना देखील करण्यात आलेली आहे. सागरी वातावरणाचा विचार करून या पुलाला पॉलीसिलोक्सेन कोटिंग केलेली असून ज्यामुळे त्याचे गंजण्यापासून रक्षण होणार आहे.
पंतप्रधान तामिळनाडूमध्ये 8,300 कोटी रुपये खर्चाचे विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन करून राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमध्ये एनएच -40 च्या 28 किलोमीटर लांबीच्या चौपदरी वालजापेट-रानीपेट महामार्गाचे भूमिपूजन, पोंडेचेरी विभागातल्या एन एच 332 वरच्या विलूप्पूरम - पांडेचेरी या 29 किमी लांबीच्या महामार्गचे लोकार्पण, एनएच -32 वरच्या पुंडियंकूपम- सट्टनाथपुरम विभागातल्या 57 किमी लांबीच्या मार्गाचे, एनएच 36 च्या चोलपुरम - तंजावर या 48 किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण होणार असून हे महामार्ग अनेक तीर्थस्थळे आणि पर्यटन स्थळांना जोडतील तसेच शहरांमधील अंतर कमी करतील आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास मदत करतील, स्थानिक शेतकर्यांच्या शेती उत्पादनांना जवळच्या बाजारपेठेत वाहतूक करण्यास आणि स्थानिक चामड्याच्या आणि लघु उद्योगांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देण्यास सक्षम करतील.
***
JPS/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118888)
Visitor Counter : 48
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam