पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 03 APR 2025 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या अधिकृत दौऱ्यात थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पायतोंगटार्न शिनावात्रा यांची बँकॉकमध्ये भेट घेतली. सरकारी निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान शिनावात्रा यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही त्यांची दुसरी भेट होती. यापूर्वी दोन्ही नेत्यांची ऑक्टोबर 2024 मध्ये व्हिएन्टियान येथे  आसियान संबंधित शिखर परिषदेप्रसंगी भेट झाली होती.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि थायलंडमधील द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. त्यांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी, धोरणात्मक सहभाग, व्यापार आणि गुंतवणूक आणि व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. हे करताना त्यांनी संचारसंपर्क, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्टार्ट-अप, नवोन्मेष, डिजिटल, शिक्षण, संस्कृती आणि पर्यटन सहकार्य वाढविण्याची गरज अधोरेखित केली. मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर घोटाळ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटित गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही त्यांनी चर्चा केली. दोन्ही पंतप्रधानांनी जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली आणि बिमस्टेक, आसियान आणि मेकाँग गंगा सहकार्यासह उप-प्रादेशिक, प्रादेशिक तसेच बहुपक्षीय मंचांवर निकट सहकार्य स्थापन करण्यावर  चर्चा केली.

दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत  भारत-थायलंड धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्याच्या संयुक्त घोषणापत्राचे आदानप्रदान झाले.  हातमाग आणि हस्तकला; डिजिटल तंत्रज्ञान; सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई); आणि सागरी वारसा या क्षेत्रातील सामंजस्य करारांची देवाणघेवाण देखील त्यांच्या साक्षीने झाली. दोन्ही नेत्यांनी भारत-थायलंड कॉन्सुलर संवाद स्थापनेचे स्वागत केले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील जनतेचा संपर्क अधिक सुलभ होईल. फलनिष्पत्तीची यादी येथे पाहता येईल.

पंतप्रधानांच्या भेटीचे औचित्य साधून थायलंड सरकारने सद्भावनेचे प्रतीक म्हणून 18 व्या शतकातील रामायण भित्तिचित्रांचे चित्रण असलेले एक विशेष टपाल तिकीट जारी केले. दोन्ही देशांमधील घनिष्ठ सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अधोरेखित करताना पंतप्रधान शिनावात्रा यांनी पंतप्रधानांना पाली भाषेतील बौद्ध पवित्र ग्रंथ "‘तिपिटक’  ची विशेष आवृत्ती भेट दिली.

भारत आणि थायलंडमधील घनिष्ठ सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी गुजरातमधून उत्खनन केलेल्या भगवान बुद्धांच्या अवशेषांना थायलंडला पाठवण्याची तयारी दर्शविली, जेणेकरून लोक त्यांना आदरांजली वाहू शकतील. गेल्या वर्षी भगवान बुद्ध आणि त्यांच्या दोन शिष्यांचे पवित्र अवशेष भारतातून थायलंडला नेण्यात आले होते आणि 40लाखांहून अधिक लोकांनी त्यांना आदरांजली वाहिली होती.

भारत आणि थायलंड हे सागरी शेजारी आहेत आणि त्यांनी सामायिक केलेल्या सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक अशा सभ्यता संबंधांमध्ये रामायण आणि बौद्ध धर्माचा अंतर्भाव होतो. थायलंडशी भारताचे संबंध हे आमचे'अ‍ॅक्ट ईस्ट' धोरण, आसियानसोबतची व्यापक धोरणात्मक भागीदारी, व्हिजन महासागर आणि हिंद-प्रशांतचा आमचा दृष्टिकोन यांचा अविभाज्य आधारस्तंभ आहेत. दोन्ही देशांमधील शाश्वत संवादांमुळे जुन्या संबंधांवर तसेच सामायिक हितसंबंधांवर आधारित एक मजबूत आणि बहुआयामी नातेसंबंध निर्माण झाला आहे.

 

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2118502) Visitor Counter : 41