पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन

Posted On: 03 APR 2025 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2025

 

महामहीम, पंतप्रधान शिनावात्रा,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी

प्रसारमाध्यमांमधील मित्रगण,

नमस्कार!

सवादी क्रॅप!

पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.

मित्रांनो,

भारत आणि थायलंड यांच्यातील अतिशय प्राचीन संबंधांची मूळे आमच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक  नातेसंबंधांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. बौद्ध धर्माने आपल्या जनतेला एकत्र आणले आहे.

अयुथ्थयाकडून नालंदाकडे विद्वानांची देवाणघेवाण झालेली आहे. थाई लोककथांमध्ये रामायणाची कथा अतिशय खोलवर रुजलेली आहे. आणि संस्कृत आणि पालीचा आपल्या आजच्या भाषा आणि परंपरांवर प्रभाव आहे.

माझ्या भेटीचा एक भाग म्हणून 18 व्या शतकातील रामायणाच्या म्युरल पेंटिंगवर आधारित एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्याबद्दल मी थायलंड सरकारचा ऋणी आहे.

पंतप्रधान शिनावात्रा यांनी नुकतेच मला त्रि-पीटक भेट म्हणून दिले. बुद्धांची भूमी असलेल्या भारताच्या वतीने, मी दोन्ही हात जोडून त्याचा स्वीकार करतो. गेल्या वर्षी भारतातून थायलंडला  भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पाठवले होते. चाळीस लाखांपेक्षा जास्त भाविकांना त्यांचे दर्शन घेऊन अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे. गुजरातमध्ये अरवली येथे 1960 मध्ये सापडलेले पवित्र अवशेष  देखील थायलंडमध्ये दर्शनासाठी पाठवले जातील, असे जाहीर करताना मला आनंद होत आहे.  

यावर्षी आमच्या जुन्या संबंधांचे भारतातील महाकुंभातही दर्शन घडले. थायलंडसह परदेशातून 600 पेक्षा जास्त बुद्ध भाविकांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात भाग घेतला. या सोहळ्याने जागतिक शांतता आणि सौहार्दाचा संदेश दिला.

मित्रहो,

भारताचे "ऍक्ट ईस्ट" धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टीकोनात थायलंडला एक विशेष स्थान आहे. आम्ही आज आमच्यातील संबंधांना धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त आमच्या सुरक्षा दलांमध्ये धोरणात्मक संवाद स्थापन करण्यावर देखील आम्ही चर्चा केली.

सायबर गुन्ह्याचे बळी ठरलेल्या भारतीयांना  मायदेशी परत आणण्यासाठी  सहकार्य केल्याबद्दल आम्ही थायलंडच्या सरकारचे आभार मानतो. मानवी तस्करी आणि बेकायदेशीर स्थानांतरण रोखण्यासाठी आमच्या संस्था एकत्रितपणे काम  करतील यावर आम्ही सहमती दर्शविली आहे.

थायलंड आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांदरम्यान पर्यटन, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर आम्ही भर दिला आहे.

आम्ही परस्पर व्यापार, गुंतवणूक आणि उद्योगांबाबत देवाणघेवाण वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. एम एस एम ई, हातमाग आणि हस्तकला या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार देखील करण्यात आले आहेत.

आम्ही नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, ई वाहन, रोबोटिक्स, अंतराळ, जैव तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप्स यामधील सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रत्यक्ष संपर्क यंत्रणा वाढवण्याबरोबरच फिन टेक संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देश कार्य करतील.

दोन्ही देशांच्या नागरिकांचे आपसातले संबंध वाढावेत या दृष्टीने भारताने थाई पर्यटकांसाठी निःशुल्क  ई व्हिसा सुविधा सुरु केली आहे.

मित्रांनो,

आसियान हा भारताचा व्यापक धोरणात्मक भागीदार आहे आणि या प्रदेशातील शेजारी सागरी राष्ट्र म्हणून प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीमध्ये आपले सामायिक हित  आहे.

भारत ठामपणे आसियान एकता आणि आसियान केंद्रीकरणाचे समर्थन करतो.  हिंद प्रशांत क्षेत्रात  एका मुक्त, खुल्या,  सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित व्यवस्थेला दोन्ही देशांचा पाठिंबा आहे.

आम्ही विकासवादावर विश्वास ठेवतो, विस्तारवादावर नव्हे. हिंद प्रशांत सागर उपक्रमातील 'सागरी पर्यावरणशास्त्र' स्तंभाचे सह-नेतृत्व करण्याच्या थायलंडच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

मित्रांनो,

मी उद्या होणाऱ्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. थायलंडच्या अध्यक्षतेखाली या मंचाने क्षेत्रीय सहकार्याच्या दिशेने नवीन गती प्राप्त केली  आहे. या कामगिरीबद्दल आम्ही पंतप्रधान आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.

आदरणीय महोदय,

पुन्हा एकदा, या स्वागताबद्दल आणि सन्मानाबद्दल मी तुमचे आभार मानतो. त्रिपिटकाच्या या भेटीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

खूप खूप धन्यवाद.

खोप खुन खाप!

 

* * *

S.Kane/Shailesh/Bhakti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2118486) Visitor Counter : 17