भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय संस्था अर्थात आय आय आय डी इ एम येथे 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांसाठीच्या (बीएलओ) पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू
बी एल ओ चे देशव्यापी नेटवर्क मजबूत करण्यासाठी कुशलरित्या प्रशिक्षित झालेले हे मतदान केंद्र पातळीवरील अधिकारी विधानसभा स्तरीय मास्टर प्रशिक्षक म्हणून काम करणार
Posted On:
26 MAR 2025 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय संस्था (आय आय आय डी इ एम) येथे निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांच्यासह मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले. येत्या काही वर्षांमध्ये प्रत्येकी 10 मतदान केंद्रांसाठी सरासरी एक बी एल ओ याप्रमाणे सुमारे एक लाख अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाणार आहे. हे कुशलरित्या प्रशिक्षित अधिकारी विधानसभा स्तरीय मास्टर प्रशिक्षकांची (ALMTs) एक तुकडी तयार करतील जे देशभरातील बी एल ओ चे संपूर्ण नेटवर्क मजबूत करतील, हे अधिकारी 100 कोटी मतदार आणि आयोग यांच्यातील सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा दुवा असतील. हा वैशिष्ट्यपूर्ण क्षमता बांधणी कार्यक्रम टप्प्याटप्प्याने निरंतर सुरु राहणार असून बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी कायदा 1950, मतदारांची नोंदणी नियम 1960 आणि निवडूक आयुक्तांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांची जबाबदारी आणि भूमिका समजावी तसेच अचूक मतदार याद्या तयार करण्यासाठी संबंधित अर्ज भरण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि माहिती असावी यादृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यांच्या कामाला हातभार लागेल अशा माहिती तंत्रज्ञान ऍप्लिकेशन्सबद्दल त्यांना माहिती दिली जाईल.
बी एल ओ हे राज्य सरकारचे अधिकारी असतात आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (EROs), जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या (DEOs) मान्यतेनंतर त्यांची नियुक्ती करतात. मतदार याद्यांचे त्रुटीमुक्त अद्ययावतीकरण करण्यातील निवडणूक नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्र पातळीवरील अधिकारी, यांच्या योगदानाचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उल्लेख केला.
घटनेच्या कलम 326 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 20 नुसार, केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि मतदारसंघात सामान्यतः रहिवासी असलेले भारतातील नागरिक मतदार म्हणून नोंदणी करू शकतात, हे ज्ञानेश कुमार यांनी अधोरेखित केले.
सर्व मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे सर्वपक्षीय बैठका आयोजित करून त्यांच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी मतदार यादीच्या अचूक अद्ययावतीकरणाचे निर्देश आपण दिले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांविरोधात आलेली तक्रार खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी घरोघरी पडताळणी करताना अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौहार्द्रपूर्ण वर्तन करावे असे ते म्हणाले. निवडणूक आयोग सुमारे 100 कोटी मतदारांच्या पाठीशी उभा होता, आहे आणि नेहमीच राहील, असे त्यांनी सांगितले.
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115258)
Visitor Counter : 31