गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसामच्या कोक्राझार येथे ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयु) च्या 57 व्या वार्षिक परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
Posted On:
16 MAR 2025 5:24PM by PIB Mumbai
बोडोलँड क्षेत्रात शांतता, विकास आणि उत्साह प्रस्थापित करण्यात ऑल बोडो स्टुडंट्स युनियनने महत्त्वाची भूमिका निभावली आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. आसामच्या कोक्रझार येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित करत होते. ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या भूमिकेशिवाय बोडो करार शक्य झाला नसता आणि बोडोलँड मध्ये शांतता प्रस्थापित झाली नसती, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. यावेळी शाह यांनी बोडोलँडच्या शांततेसाठी लढणाऱ्या 5 हजार हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

बोडोलँडचे नेते उपेंद्रनाथ ब्रह्माजी यांनी दाखवलेल्या मार्गावर सगळा बोडोलँड मार्गस्थ आहे, आणि म्हणूनच केंद्र सरकारने दिल्लीतील एका प्रमुख रस्त्याचे नाव बोडोपा उपेंद्रनाथ ब्रम्हा मार्ग असे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपेंद्रनाथ ब्रह्माजींच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती देखील शाह यांनी दिली.

आसामच्या शेकडो तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले असून अनेक शस्त्रे खाली टाकण्यात आली आहेत असे शाह म्हणाले.गेल्या तीन वर्षात आसाम मधील नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या 4,881 सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आजवर 287 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून, यातील 90 टक्के रक्कम ही मोदी सरकारने दिली आहे, अशी माहिती शाह यांनी दिली.

आसाम कमांडो बटालियनमध्ये 400 बोडो तरुणांची भरती करून आसामचे मुख्यमंत्री डॉ. सर्मा यांनी एक नवी सुरुवात केली आहे, असे देखील शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आसाम मधील एकूण नऊ बंडखोर गटांशी करार केले असून, ज्यामुळे 10 हजारहून अधिक तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती गृहमंत्री शाह यांनी दिली.


***
S.Kane/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111651)
Visitor Counter : 33
Read this release in:
Odia
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil