गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसाममधील डेरगाव येथे लचित बोरफुकन पोलीस अकादमीचे केले उद्घाटन
Posted On:
15 MAR 2025 5:15PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज आसाममधील डेरगाव येथे लचित बोरफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केले. या प्रसंगी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

लचित बोरफुकन पोलीस अकादमी येत्या 5 वर्षांत देशभरातील सर्व पोलिस अकादमींमध्ये प्रथम क्रमांकावर असेल, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. आसामचे शूर योद्धा आणि महान व्यक्तीमत्व लचित बोरफुकन यांनी आसामला मुघलांवर विजय मिळवून देणाऱ्या लढाईचे नेतृत्व केले होते, असेही त्यांनी सांगितले. लचित बोरफुकन यांच्या शौर्याची गाथा एकेकाळी आसामपुरती मर्यादित होती, परंतु मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे आज त्यांचे चरित्र 23 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि देशभरातील ग्रंथालयांमध्ये बालकांसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आसामच्या या महान सुपुत्राबद्दल संपूर्ण देशाला माहिती व्हावी आणि सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी यासाठी काम करणाऱ्या आसाम सरकारचे शाह यांनी कौतुक केले. लचित बोरफुकन पोलिस अकादमीच्या रूपात आज रोवण्यात आलेल्या बीजाचे एके दिवशी वटवृक्षात रुपांतर होईल आणि संपूर्ण देशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करेल. ज्याप्रमाणे भाविकांसाठी काशी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते त्याच प्रमाणे ही केवळ आसाममधलीच नव्हे तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यांसाठी एक सर्वोच्च पोलिस अकादमी असे ,असेही ते म्हणाले. ही अकादमी या प्रदेशात शांततेसाठी एक नवीन सुरुवात असेल.

लचित बोरफुकन अकादमीचा पहिला टप्पा 167 कोटी रुपये खर्चून उभारण्यात झाला आहे, अकादमीच्या तिन्ही टप्प्यांवर एकूण 1050 कोटी रुपये खर्च केले जातील, असे शाह म्हणाले. ही अकादमी अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून लवकरच ती संपूर्ण देशातील सर्वोत्तम पोलिस अकादमी बनेल, असे त्यांनी नमूद केले. पूर्वी आसामच्या पोलिसांना प्रशिक्षणासाठी इतर राज्यात जावे लागत असे, परंतु गेल्या 8 वर्षांत, राज्याच्या कारभारात असे परिवर्तन घडले आहे की आता गोवा आणि मणिपूरमधील 2000 पोलिस कर्मचाऱ्यांनी या पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे, हे शाह यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आसाम आता विकासाच्या मार्गावर प्रगती करत आहे, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक शांतता करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून 2020 मध्ये आसाम-बोडोलँड करार, 2021 मध्ये कार्बी आंगलोंग करार, 2022 मध्ये आदिवासी शांतता करार आणि 2023 मध्ये उल्फा, आसाम-मेघालय आणि आसाम-अरुणाचल करार करण्यात आल्याचे शाह यांनी नमूद केले. मोदी सरकारने केलेल्या या शांतता करारांमुळे 10,000 हून अधिक तरुणांनी शस्त्रे टाकली असून ते आता मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत, असेही शाह म्हणाले. एकेकाळी चळवळी, बंडखोरी आणि बंदुकीच्या गोळीबारासाठी ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये 27,000 कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर उद्योग स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शाह यांनी दिली.

मोदी सरकारने आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ प्रयत्न केले नाहीत तर ते यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहेत. मोदी सरकारने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील आसाम राज्यात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ घातली आहे, ज्यामुळे आसाममधील तरुणांसाठी रोजगाराच्या सुवर्ण भविष्याचा पाया रचला जाईल, असे शाह यांनी नमूद केले. आसाममध्ये आता गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 5 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.

पूर्वी लोक एफआयआर तक्रार दाखल करू इच्छित नव्हते, कारण पोलिसांकडे फक्त दहशतवाद्यांशी लढणारे म्हणून पाहिले जात होते, परंतु आज पोलिस नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असेही शाह यांनी अधोरेखित केले.

***
S.Patil/S.Mukhedkar/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111551)
Visitor Counter : 14