माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुंबईमध्ये 1 मे 2025 पासून होणाऱ्या विश्व दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर,या महत्त्वाच्या जागतिक माध्यम संवादामधील सहभागाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकार जागतिक समुदायासोबत साधणार संवाद
केंद्रीय मंत्री एस.जयशंकर,अश्विनी वैष्णव,राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन आणि यजमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीत 100 हून अधिक राजदूत आणि उच्चायुक्तांना देणार, वाढत्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात समन्वयित दृष्टिकोनासाठी एक जागतिक मंच म्हणून वेव्हजच्या फायद्यांविषयी माहिती
जागतिक सौहार्दाला चालना देण्याच्या दृष्टीने, वेव्हजच्या छत्राखाली माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात सर्व देशांना उपलब्ध असलेल्या सामाईक संधी आणि भेडसावणाऱ्या समस्या याविषयी होणारे विचारमंथन हे या जागतिक माध्यम संवादाच्या विषयपत्रिकेतील महत्त्वाचे मुद्दे
Posted On:
12 MAR 2025 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून मुंबईमध्ये 1 मे 2025 पासून होणाऱ्या विश्व दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज)2025 च्या पार्श्वभूमीवर, या महत्त्वाच्या जागतिक माध्यम संवादामधील सहभागाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकार 13 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवनमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता जागतिक समुदायासोबत संवाद साधणार आहे. मुंबईत 2 मे 2025 रोजी होणाऱ्या पहिल्या वेव्हज जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारांच्या जागतिक माध्यम संवादामध्ये जास्तीत जास्त सहभागाला आमंत्रित करणे हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या संवाद कार्यक्रमाचा उद्देश आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह या कार्यक्रमाचे यजमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झपाट्याने वाढणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एक एकीकृत जागतिक मंच म्हणून वेव्हजच्या परिवर्तनकारक क्षमतेविषयी यावेळी सविस्तर माहिती देणार आहेत. या कार्यक्रमात 100 हून जास्त राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत. यात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील समन्वयित दृष्टीकोनासाठी असलेल्या संधी अधोरेखित होतील.
जागतिक माध्यम संवाद
मुंबईमध्ये 2 मे 2025 रोजी विश्व दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद 2025(वेव्हज) मध्ये जागतिक माध्यम संवादात जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योगातील हितधारक, माध्यम व्यावसायिक आणि कलाकारांना एकत्र आणून आंतरराष्ट्रीय सहकार्य, तंत्रज्ञान नवोन्मेष आणि नीतीमत्ता जपणाऱ्या पद्धतींवर भर देत दृक-श्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी एक विधायक आणि गतिशील संवाद घडवून आणणे हा या आयोजनाचा उद्देश आहे.
चर्चेचे ठळक मुद्दे
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा निष्पक्ष आणि पारदर्शक विकास सुनिश्चित करण्यासाठी सहभागी देशांमधील मुक्त संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हे या संवादाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सीमेपलीकडील सहकार्य वाढवण्यासाठीची धोरणे आणि सामायिक आव्हाने व संधींची हाताळणी करण्यासाठी ज्ञानाचे आदानप्रदान आणि भागीदारीला चालना देण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करण्यावर चर्चेचा भर असेल. या संवादात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील मुक्त आणि निष्पक्ष व्यापार पद्धतींच्या महत्त्वावरही भर दिला जाईल, ज्यामुळे सर्व भागधारकांसाठी समान प्रवेश आणि विकास सुनिश्चित होईल. जागतिक सुसंवाद वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व देशांपुढील सामायिक संधी आणि समस्या यावर चर्चा करणे हे 'वेव्ह्ज' अंतर्गत जागतिक माध्यम संवादाच्या प्रमुख उद्दिष्टांच्या मुद्द्यांमध्ये समाविष्ट आहे.
वेव्ह्ज 2025
महाराष्ट्रात मुंबई येथे 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान आयोजित होत असलेला वेव्ह्ज (WAVES), हा एक भव्य जागतिक कार्यक्रम असून, या कार्यक्रमात संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र एकाच व्यासपीठावर एकत्र येईल. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक बाजारपेठेशी आणि जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला भारतीय बाजारपेठेशी जोडून विकास, सहयोग आणि नवोन्मेषाला चालना देणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला एकत्र आणणे, हे ‘वेव्ह्ज’ चे उद्दिष्ट आहे. आशयसंपन्न सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करून, भारताच्या सृजनशीलतेला बळ देण्यासाठी हे व्यासपीठ सज्ज आहे. यामध्ये ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, साउंड अँड म्युझिक, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, जेनेरेटिव्ह एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर) या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या दृष्टिकोनावर आधारित, वेव्ह्ज 2025 मध्ये सहयोग आणि नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गतिशील प्लॅटफॉर्म असतील. वेव्ह्ज बझार, व्यवसाय भागीदारी आणि आशय प्राप्तीसाठी बाजारपेठ उपलब्ध करेल, ज्यामध्ये वर्षभर जागतिक आशय व्यापारासाठी प्रथमच ई-बाजार सुरू करण्यात येईल. वेव्हएक्सेलेरेटर (WaveXcelerator), नवोन्मेश आणि वित्तपोषणाला चालना देण्यासाठी लाइव्ह पिचिंग सत्रांद्वारे माध्यम आणि मनोरंजन स्टार्टअप्सना गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडेल. क्रेटोस्फीअर (CreatoSphere), मास्टरक्लास, कार्यशाळा, गेमिंग क्षेत्र आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजच्या अंतिम फेरीचा अनोखा अनुभव देईल, आणि त्याची सांगता वेव्ह्ज सीआयसी (WAVES CIC) पुरस्कारांच्या वितरणाने होईल. वेव्ह्ज 2025 ला जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी एकात्मिक आणि समन्वयवादी दृष्टिकोन अंगीकारणारी परिवर्तनशील घटना म्हणून स्थान देणे, हे या एकत्रित प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे.
S.Kakade/S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110957)
Read this release in:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu