गृह मंत्रालय
तामिळनाडूमध्ये थक्कोलम येथे आयोजित सीआयएसएफच्या स्थापना दिन संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची उपस्थिती
सीआयएसएफ केवळ देशाचा विकास, प्रगती आणि गतिशीलता यांचेच संरक्षण करत नाही तर त्यांच्या सुरळीत कार्यान्वयनात देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे
Posted On:
07 MAR 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आज तामिळनाडूमध्ये थक्कोलम येथे आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 56 व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन आणि सीआयएसएफचे महासंचालक राजविंदर सिंह भट्टी देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गेल्या 56 वर्षांत सीआयएसएफने केवळ देशाचा विकास, प्रगती आणि गतिशीलता यांचीच सुनिश्चिती केली असे नव्हे तर त्यांच्या सुरळीत कार्यान्वयनात देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की सीआयएसएफविना बंदरे, विमानतळ, महत्त्वाच्या व्यापारी, पर्यटन तसेच संशोधन संस्थांसह देशाच्या औद्योगिक विकासाशी संबंधित सर्व इमारतींच्या सुरक्षिततेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. सीआयएसएफ मधील कर्मचाऱ्यांची अविचल निष्ठा, मेहनत आणि समर्पित वृत्ती यामुळेच आपला देश औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात सुरक्षितपणे आगेकूच करत आहे. सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक कार्यांमध्ये देखील रस घेतला आहे आणि ती कार्ये पुढे चालवली आहेत असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की तामिळनाडूच्या संस्कृतीने भारताच्या संस्कृतीला बळकटी देण्यासाठी अनेक बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशासकीय सुधारणा असोत, आध्यात्मिक उंची गाठणे असो, शैक्षणिक मापदंड निश्चित करणे असो किंवा देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश देणे असो, तामिळनाडूने प्रत्येक क्षेत्रात भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. ते म्हणाले की तमिळ भाषा, संस्कृती आणि परंपरा ही भारतीय संस्कृतीमधील अनमोल रत्ने आहेत आणि संपूर्ण देशाला याची जाणीव आहे. याच अनुषंगाने, सीआयएसएफच्या थक्कोलम येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राला चोला राजवंशातील राजादित्य चोला या महान योद्ध्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या भूमीवर राजादित्य चोला या वीराने शौर्य आणि त्यागाच्या असंख्य कहाण्या निर्माण करत हौतात्म्य पत्करले आणि चोला साम्राज्याची वैभवशाली परंपरा पुढे नेली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की गेल्या वर्षी सीआयएसएफमध्ये 14,000 हून अधिक पदे भरण्यात आली. आपण जर सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा (सीएपीएफ) विचार केला तर एक लाखाहून अधिक युवकांना या दलांमध्ये रोजगार देण्यात आला असून आणखी 50,000 युवकांच्या भर्तीची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, सीआयएसएफने नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. गेल्या 56 वर्षांमध्ये सीआयएसएफने देशातील प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षेचे सोनेरी मापदंड स्थापित केले आहेत. देशातील बंदरे, विमानतळ आणि मेट्रो यांसह असंख्य ठिकाणी सुमारे एक कोटी लोकांच्या हालचालींच्या दरम्यान सर्व प्रकारच्या धोक्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी सीआयएसएफ कर्मचारी सतत कार्यरत असतात हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
देशाच्या औद्योगिक आणि शैक्षणिक विकासासाठी आणि देशाच्या सुरळीत कामकाजासाठी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या देखरेखीखाली, बंदरे, विमानतळ आणि महानगरांसह सर्व आस्थापना सुरक्षित आहेत. नवीन संसद भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. शाह यांनी नमूद केले की सीआयएसएफ कर्मचारी दिल्ली मेट्रोमध्ये दररोज 70 लाखांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक अत्यंत शिस्तीने आणि संयमाने, कोणत्याही चुका न होऊ देता सुनिश्चित करतात. याव्यतिरिक्त, ते 250 बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात बंदर सुरक्षेसाठी सीआयएसएफच्या जबाबदाऱ्या वाढण्याची अपेक्षा आहे.

सरकारने सीआयएसएफला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले आहे आणि त्यांना सतत आधुनिक तांत्रिक सुविधा पुरवत आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. अनेक विमानतळांवर 'डिजी यात्रा' राबविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे असे त्यांनी नमूद केले. सीआयएसएफने विमानतळ सुरक्षेत केवळ आंतरराष्ट्रीय मानके स्वीकारली नाहीत तर या संदर्भात विक्रम प्रस्थापित करण्याच्या ते अगदी जवळ पोचले आहे. त्यांनी नमूद केले की सीआयएसएफ मध्ये अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण युनिट देखील स्थापन करण्यात आले आहे, ज्याद्वारे सतत प्रशिक्षण देऊन उच्च सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित केले जात आहे. सीआयएसएफने ड्रोन-विरोधी क्षमतेसाठी एक विशेष प्रशिक्षण केंद्र देखील स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशातील जेवर विमानतळ आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई विमानतळ लवकरच सीआयएसएफच्या सुरक्षेत समाविष्ट केले जातील, असे शाह यांनी नमूद केले. यासाठी, गृह मंत्रालयाने गेल्या तीन वर्षात बटालियन लोकशाहीला मान्यता दिली, संपूर्ण महिला बटालियन असेल.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सीआयएसएफच्या वार्षिक मासिक 'सेंटिनेल'चे देखील प्रकाशन केले. त्यांनी 10 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, 2 कर्मचाऱ्यांना जीवन रक्षा पदक आणि 10 कर्मचाऱ्यांना शौर्य पदक देऊन सन्मानित केले. शाह म्हणाले की, या सर्व कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या उत्कृष्ट परंपरा पुढे नेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीआयएसएफ कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरळीत कर्तव्य बजावणी आणि सुविधा सुधारण्यासाठी ₹88 कोटी खर्चाच्या सहा वेगवेगळ्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यांनी एसएसजी नोएडा येथे नव्याने बांधलेल्या जिम/व्यायामशाळा आणि पप हॉलचे उद्घाटनही केले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीआयएसएफ सायक्लोथॉन 2025 ला दूरदृश्य प्रणालीच्या मदतीने हिरवा झेंडा दाखवला. ही सायकल रॅली देशातील प्रत्येक किनारपट्टीवरील गावाला भेट देत कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलपर्यंत पोहोचेल असे त्यांनी सांगितले. या प्रवासादरम्यान, सीआयएसएफ कर्मचारी किनारी गावांमध्ये सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करतीलच, शिवाय गावकऱ्यांना विकासाबद्दल माहिती देतील. याव्यतिरिक्त, सीआयएसएफ कर्मचारी सुरक्षा आणि गाव विकासाशी संबंधित सूचना गोळा करतील. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या 'ग्राउंड झिरो इनपुट'मुळे या किनारी गावांमध्ये चांगल्या सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चित होण्यास मदत होईल यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी भर दिला.
* * *
S.Patil/Sanjana/Hemangi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109283)
Visitor Counter : 21