गृह मंत्रालय
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे 38 व्या 'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप
Posted On:
14 FEB 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे 38 व्या 'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला.समारोप कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले.
38 व्या राष्ट्रीय खेळांच्या यशस्वी आयोजनामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विकसित झालेल्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या मदतीने देवभूमी (उत्तराखंड) आता ‘खेळभूमी’ बनली आहे, असे शाह यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रयत्नांमुळे, देशातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या बाबतीत देवभूमी 21 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या संख्येने पदके जिंकणाऱ्या उत्तराखंडमधील खेळाडूंचे अभिनंदन करताना शाह यांनी सांगितले की, त्यांनीच खऱ्या अर्थाने देवभूमीला क्रीडाभूमी बनवले आहे.
केंद्रीय मंत्री शाह यांनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे आणि क्रीडा महासंघांचे कौतुक केले.आयोजन समिती आणि महासंघांच्या प्रयत्नांमुळेच उत्तराखंडसारखे छोटे राज्य इतक्या उच्च पातळीवर या खेळांचे यशस्वी आयोजन करू शकले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले .राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुमारे 16,000 खेळाडूंनी सुमारे 435 स्पर्धाप्रकारांमध्ये भाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले.खेळाचा खरा संदेश विजिगिषू वृत्ती आणि पराभवाने निराश न होणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.पुढील राष्ट्रीय स्पर्धा मेघालयात होणार असून तिथे खेळाडूंना पदके जिंकण्याची आणखी एक संधी मिळेल,असे ते म्हणाले.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पर्यावरणपूरक पद्धतींसह पर्यावरणपूरक खेळ संकल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या, असे शाह यांनी सांगितले. भारोत्तोलन, नेमबाजी आणि अॅथलेटिक्ससह अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय विक्रम झाल्याचे नमूद करत यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याच्या आशा अधिक पल्लवित झाल्याचे त्यांनी सांगितले. मेघालयात होणाऱ्या पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांदरम्यान ईशान्येकडील इतर राज्यांमध्येही काही कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यामुळे संपूर्ण ईशान्य क्षेत्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांशी जोडले जाईल, असेही ते म्हणाले. उत्तराखंड आणि मेघालयसारख्या छोट्या राज्यांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन, हे या राज्यांचे खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे, असे शाह यांनी सांगितले.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103418)
Visitor Counter : 35