पंतप्रधान कार्यालय
पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
11 FEB 2025 11:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!
मला या सभागृहात प्रचंड उर्जा, उत्सुकता आणि उत्साह अनुभवायला मिळत आहे. हा केवळ एक व्यावसायिक कार्यक्रम नाही. भारत आणि फ्रान्समधल्या सर्वोत्कृष्ट व्यावसायिक व्यक्तींचा हा मिलाप आहे. नुकत्याच इथं सादर केल्या गेलेल्या सीइओ मंचाच्या अहवालाचं मी स्वागत करतो.
नवोन्मेष, सहकार्य आणि प्रगती ही त्रिसूत्री जपत तुम्ही सगळे आपली वाटचाल करत आहात हे दिसून येत आहे. तुम्ही तुमचे व्यावसायिक संबंध केवळ संचालक मंडळाच्या बैठकीपुरते जपलेले नाहीत; तर तुम्ही भारत - फ्रान्स धोरणात्मक भागीदारीदेखील सशक्त करत आहात.
मित्रांनो,
माझे मित्र राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांच्यासह या कार्यक्रमात सहभागी होता आलं याचा मला अतिशय आनंद आहे. गेल्या दोन वर्षांतली आपली ही सहावी भेट आहे. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ भारतात प्रजासत्ताक दिन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आले होते.
आज सकाळी झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती परिषदेचे आम्ही दोघं सहअध्यक्ष होतो. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी मी राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ याचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारत आणि फ्रान्स हे फक्त लोकशाही मूल्यामुळे जोडले गेलेले देश नाहीत. दृढ विश्वास, नवोन्मेष आणि लोककल्याण हा आमच्या मैत्रीचा भक्कम आधार आहे.
ही केवळ दोन देशांमधली भागीदारी नाही. आम्ही जागतिक समस्या आणि आव्हानांचा सामना करण्यासाठीही एकमेकांना सहकार्य करत आहोत. माझ्या गेल्या फ्रान्स भेटीत आम्ही आमच्या भागीदारीचा 2047 पर्यंतचा पथदर्शी आराखडा तयार केला. त्यानुसार आम्ही प्रत्येक क्षेत्रात व्यापक पद्धतीनं सहकार्य करत आहोत.
मित्रांनो,
तुमच्या बऱ्याच कंपन्या आधीपासूनच भारतात आहेत. तुम्ही अंतराळ विज्ञान, बंदरं, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, दुग्धव्यवसाय, रसायनं आणि ग्राहकोपयोगी उत्पादनं अशा विविध क्षेत्रात भारतात काम करत आहात.
भारतातही अनेक कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मला मिळाली. गेल्या दशकभरात भारतात झालेले बदल तुम्ही सगळे जाणताच. आम्ही एक स्थिर राजकीय परिस्थिती आणि अंदाज बांधता येईल अशी धोरणात्मक परिसंस्था निर्माण केली आहे.
सुधारणा, कार्यकारी वृत्ती आणि बदल हा मार्ग अनुसरत; आज भारताच्या अर्थव्यवस्थेनं जगात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
लवकरच भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. कुशल युवा मनुष्यबळ आणि नवोन्मेषी वृत्ती ही भारताची जगातली ओळख बनली आहे.
जगात आता गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त प्राधान्य भारताला दिलं जात आहे.
आम्ही भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम अभियान सुरू केलं आहे. संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड’ या धोरणाला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. तुमच्यापैकी बरेच जण या अभियानाशी जोडले गेले आहेत. अंतराळ विज्ञानात आम्ही यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहोत. हे क्षेत्र आता थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं करण्यात आलं आहे. भारताला लवकरच जैवतंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
पायाभूत सुविधांच्या विकासाला आम्ही नेहमीच प्राधान्य दिलं आहे. यासाठी आम्ही दरवर्षी 114 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करत आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्ग उभारण्यास सुरुवात केली असून तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वेचं आधुनिकीकरण आणि दर्जा सुधारण्याचं काम करत आहोत.
2030 पर्यंत 500 गिगावॅटस नवीकरणीय उर्जानिर्मिती करण्याचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या दिशेनं आम्ही वेगानं वाटचाल करत आहोत. यासाठी आम्ही सौर सेल उत्पादनाला प्रोत्साहन दिलं आहे. आम्ही दुर्मिळ खनिज अभियानदेखील सुरू केलं आहे.
आम्ही हायड्रोजन अभियानही सुरू केलं आहे. या अभियाना अंतर्गत इलेक्ट्रोलायजर निर्मितीवर भर दिला जात आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅटस अणुउर्जा निर्मितीचं आमचं उद्दीष्ट आहे. आता हे क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुलं केल्याचं सांगताना मला आनंद होत आहे. छोट्या मॉड्यूलर अणुभट्ट्या आणि आधुनिक मॉड्यूलर अणुभट्ट्या सुरू करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.
मित्रांनो,
भारत व्यवसायाच्या दृष्टीनं कमी जोखीम आणि विविधता यांचं सर्वात मोठं केंद्र ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या अंदाजपत्रकात नव्या आधुनिक सुधारणा निश्चित केल्या आहेत.
व्यवसाय सुलभतेसाठी नवीन उपाययोजना केल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 40000 पेक्षा जास्त तक्रारींचं निवारण केलं आहे. विश्वासावर आधारित आर्थिक प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी, नियामक सुधारणा घडवून आणण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. सीमा शुल्काची रचनाही सुटसुटीत केली आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांच्या सहाय्यानं ‘इंडिया ट्रेड नेट’ सुरू करण्यात येत आहे. जीवन सुलभतेसाठी आम्ही नवीन साधीसोपी प्राप्तीकर नियमावली तयार करत आहोत.
राष्ट्रीय उत्पादकता अभियानाचीही घोषणा करण्यात आली आहे. विमा क्षेत्रासारखी नवी क्षेत्रं 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. तुम्ही या सर्व उपायांचा लक्षपूर्वक अभ्यास करा.
मी तुम्हाला सांगतो, भारतात गुंतवणूक करण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे. भारताच्या प्रगतीशी प्रत्येकाची प्रगती निगडित आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात ज्यावेळी भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विमान खरेदीची मागणी नोंदवली; तेव्हा याचं उदाहरण आपण पाहिलं आहेच. आता जेव्हा आम्ही नवीन 120 विमानतळ सुरू करायचं ठरवलं आहे; तेव्हा भविष्यात या क्षेत्रात तुम्हाला केवढी मोठी संधी मिळणार आहे याची कल्पना तुम्ही करू शकता.
मित्रांनो,
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय 140 कोटी भारतीयांनी केला आहे. संरक्षण क्षेत्र असो अथवा आधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान असो किंवा औषधनिर्माण, तंत्रज्ञान असो वा वस्त्रोद्योग, कृषी क्षेत्र असो किंवा हवाई वाहतूक, आरोग्य क्षेत्र किंवा महामार्ग, अंतराळ अथवा शाश्वत विकास या सर्वच क्षेत्रात तुम्हा सगळ्यांसाठीच गुंतवणुकीच्या आणि सहकार्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो.
जेव्हा फ्रान्सचं कौशल्य आणि भारताची विशालता एकत्र येईल...
जेव्हा भारताची गती आणि फ्रान्सची अचूकता जोडली जाईल...
जेव्हा फ्रान्सचं तंत्रज्ञान आणि भारताची बुद्धीमत्ता यांचा मेळ साधला जाईल...
तेव्हा केवळ व्यावसायिक परिप्रेक्षच बदलणार नाही; तर जागतिक बदलही घडून येईल.
तुम्ही सगळ्यांनी इथं येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.
प्रगटन – हा पंतप्रधानांच्या भाषणाचा साधारण अनुवाद आहे. मूळ भाषण हिंदी भाषेतील होतं.
S.Tupe/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102757)
Visitor Counter : 20