संरक्षण मंत्रालय
एअरो इंडिया 2025 ची भरारी, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते बंगळुरू इथं आशिया खंडातील सर्वात मोठ्या हवाई आणि विमान प्रदर्शनाचे उद्घाटन
एअरो इंडिया 2025, सध्याच्या युगातील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी समविचारी राष्ट्रांमधील संबंध वृद्धिंगत करेल : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग
Posted On:
10 FEB 2025 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025
अतिशय महत्वपूर्ण आणि अग्रणी तंत्रज्ञानाचा संगम असलेला एअरो इंडिया 2025 हा उपक्रम सध्याच्या युगातील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी परस्परांप्रती आदर, परस्परांचे हितसंबंध जपणे आणि परस्परांचा लाभ या तत्वानुसार सम विचारी राष्ट्रांमधील संबंध वृद्धिंगत करेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळुरू मधील येलाहंका हवाई दल स्थानकावर आयोजित एअरो इंडिया 2025 चे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. एअरो इंडिया 2025, जगासमोर देशाच्या औद्योगिक क्षमतेचे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे शानदार प्रदर्शन करेल आणि मित्र राष्ट्रांबरोबरचे परस्पर संबंध दृढ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व राष्ट्र एकत्र येऊन एक मजबूत शक्ती निर्माण झाली आणि चांगल्या जागतिक व्यवस्थेसाठी काम केले तरच शाश्वत शांतता प्राप्त होऊ शकते, असे ते म्हणाले.
या पाच दिवसीय कार्यक्रमात सरकारचे प्रतिनिधी, उद्योजक, हवाई दल अधिकारी, शास्त्रज्ञ, संरक्षण क्षेत्रातील तज्ञ, स्टार्ट-अप, शैक्षणिक आणि जगभरातील इतर भागधारकांचा सहभाग असेल आणि हा संगम भारताच्या सर्व भागीदारांना सर्वांच्या लाभासाठी एकत्र आणेल, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
वित्त वर्ष 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी 6.81 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली असून भांडवली संपादनासाठी 1.80 लाख कोटी रुपयांचा समावेश केला आहे, यावरून सरकारच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्र हे सर्वोच्च प्राधान्य असलेले क्षेत्र असल्याचे दिसून येते.
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या हवाई आणि विमान प्रदर्शनाच्या 15 व्या आवृत्तीत पुढील पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत, यामध्ये भारताचे अवकाश क्षेत्रातील प्रभुत्व आणि स्पर्धात्मक युगात कसोटीवर खरे उतरणारे स्वदेशी नवोन्मेष तसेच जागतिक हवाई कंपन्यांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने यांचे दर्शन होईल. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ दूरदृष्टीनुसार हा कार्यक्रम स्वदेशीकरण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याकरता एक मंच देखील प्रदान करेल. यामुळे वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या संकल्पाला बळ मिळेल.
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101320)
Visitor Counter : 33