गृह मंत्रालय
अर्थसंकल्प 2025 म्हणजे विकसित आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल भारताची निर्मिती करण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनाची ब्लूप्रिंट असल्याचे सांगत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केली अर्थसंकल्पाची प्रशंसा
मध्यमवर्ग नेहमीच पंतप्रधानांच्या हृदयात आहे
शेतकरी, गरीब, मध्यमवर्गापासून ते महिला आणि बालकांचे शिक्षण, पोषण आणि आरोग्य, तसेच स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्राला सामावून घेणारा हा अर्थसंकल्प मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचा आराखडा आहे
हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे
अर्थसंकल्प-2025 युवा वर्गाची स्वप्ने आणि आकांक्षांना पंख देणारा आहे
सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्पासाठी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे केले अभिनंदन
Posted On:
01 FEB 2025 7:20PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 म्हणजे विकसित आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल भारताची निर्मिती करण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनाची ब्लूप्रिंट असल्याचे सांगत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्पासाठी अभिनंदन केले आहे.
एक्स या मंचावर केलेल्या पोस्टच्या एका मालिकेत अमित शाह म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्प 2025 म्हणजे विकसित आणि प्रत्येक क्षेत्रात अव्वल भारताची निर्मिती करण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनाची ब्लूप्रिंट आहे. शेतकरी, गरीब, मध्यमवर्गापासून ते महिला आणि बालकांचे शिक्षण, पोषण आणि आरोग्य, तसेच स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्राला सामावून घेणारा हा अर्थसंकल्प मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचा आराखडा आहे, असे त्यांनी सांगितले.
मध्यमवर्ग नेहमीच पंतप्रधानांच्या हृदयात राहिला आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही यासंदर्भातल्या अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित करसवलतीमुळे प्रदीर्घ काळासाठी मध्यमवर्गाच्या आर्थिक कल्याणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे, असे अमित शाह म्हणाले. कृषी उत्पादकता अत्यल्प असणाऱ्या 100 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचे उद्दिष्ट आहे, ज्याचा फायदा सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय डाळी स्वयंपूर्णता मिशन आणि कापूस उत्पादकता मिशन शेतकऱ्यांच्या समृद्धीला चालना देईल आणि पोषण सुरक्षेत वाढ करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
युरियाच्या उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी सरकारने आसाममध्ये 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
2025 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाला अनुसरून पादत्राणे, चर्मोद्योग आणि खेळणीनिर्मिती उद्योगांवर भर दिल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असे शहा म्हणाले.
पंतप्रधानांनी या अर्थसंकल्पाद्वारे युवकांच्या आशाआकांक्षा आणि स्वप्नांना नवी उभारी दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
येत्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय नव्या पिढीतील संशोधक वृत्तीला प्रेरणा देणारा असल्याचे शहा यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून बिहारवासीयांना महत्त्वाच्या भेटी मिळाल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या भारतीय भाषा पुस्तक योजनेमुळे भारतीय भाषांमधील पुस्तके डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार असून त्यामुळे भारतीय भाषांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पातील एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडमुळे शहरी जीवनाला नवी उर्जा मिळणार असून शहरांच्या विकासालाही चालना मिळेल असे ते म्हणाले.
2025 च्या अर्थसंकल्पात 20,000 कोटी रुपयांच्या अणुऊर्जा मिशनची घोषणा करण्यात आली. हे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रचंड ताकदीचे द्योतक आहे असे त्यांनी सांगितले.
सागरी आणि नौवहन उद्योगांना सुसज्ज करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प असंघटित कामगारांच्या समृद्धीसाठी नवीन संधी आणि साधने उपलब्ध करून देणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
***
N.Chitale/S.Patil/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098810)
Visitor Counter : 29