अर्थ मंत्रालय
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या कार्यक्रमांतर्गत पोषण सहाय्याचा विस्तार
सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पूर्ण दिवसासाठी कर्करोग सुश्रृषा आणि उपचार केंद्र करणार सुरू; 2025-26 पर्यंत अशा 200 केंद्रांची करणार स्थापना
खाजगी क्षेत्राबरोबर भागीदारीमध्ये वैद्यकीय पर्यटन आणि ‘हील इन इंडिया’ उपक्रमाला देणार प्रोत्साहन
36 जीवनरक्षक औषधे आणि उपचारविषयक साधने केली मूलभूत सीमाशुल्कातून मुक्त
Posted On:
01 FEB 2025 1:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025
गुंतवणूक हे विकासाचे तिसरे इंजिन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे. विविध गुंतवणुकीअंतर्गत लोकांमध्ये गुंतवणूक करणे, अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणे आणि नवोन्मेषाधारीत क्षेत्रात गुंतवणूक करणे या संकल्पनांचा समावेश असल्याचे त्या अर्थसंकल्प भाषणात म्हणाल्या.
लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक भाग म्हणून, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमांतर्गत पोषण आहारासाठी खर्चाच्या निकषांचा विस्तार करण्याची बाब प्रस्तावित केली गेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील 8 कोटींपेक्षा जास्त मुले-मुली, 1 कोटी गर्भवती महिला आणि स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्हे आणि ईशान्य भारातातील सुमारे 20 लाख किशोरवयीन मुलींना पोषण आहार मिळावा, यासाठीच्या उपाययोजनांना पाठबळ दिले जाणार आहे.
आगामी तीन वर्षांत देशभरातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये दिवसभर सुरू असणारी कर्करोग सुश्रृषा आणि उपचार केंद्र सुरू करण्याची घोषणाही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली. याअंतर्गत 2025-26 या वर्षात 200 केंद्र स्थापन केली जातील असे त्यांनी सांगितले. पुढच्या पाच वर्षांत वैद्यकीय प्रवेशाच्या 75 हजार जागा वाढवण्याचे उद्दिष्ट असेल, आणि यादृष्टीनेच पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये प्रवेशाच्या 10 हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार आहेत, असेही या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.
देशात खाजगी क्षेत्रासोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून वैद्यकीय पर्यटन आणि ‘हील इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाणार आहे, यात क्षमता वृद्धी आणि व्हिसाविषयक सुलभ नियमांसारख्या उपाययोजनांचा समावेश असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

औषधे आणि उपाचारविषयक साधनांच्या आयातीवर दिलासा
गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना विशेषत: कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने 36 जीवनरक्षक औषधे आणि उपचार विषयक साधनांचा, पूर्णतः सीमाशुल्क मुक्त (Basic Customs Duty - BCD) औषधांच्या यादीत समावेश करण्याचा प्रस्तावही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात मांडला.
त्याचप्रमाणे सीमा शुल्कावर 5% सवलत असलेल्या औषधांच्या यादीमध्ये इतर 6 जीवनरक्षक औषधांचा समावेश करण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी मांडला. या सर्व औषधांच्या मोठ्या प्रमाणात आयातीकरता उत्पादकांनादेखील संबंधित शुल्कमाफी आणि शुल्क सवलत लागू असणार आहे.
औषधनिर्माण कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्ण सहाय्य कार्यक्रमांतर्गत जर का रुग्णांना संबंधित औषधे विनामूल्य पुरवली जात असतील तर, औषधे आणि उपचार विषयक साधनांसाठी, पूर्णतः सीमाशुल्क मुक्तीची (Basic Customs Duty - BCD) सवलत लागू असेल, असेही या प्रस्तावात स्पष्ट केले गेले आहे. या सवलतींअंतर्गत 13 नवे रुग्ण सहाय्य कार्यक्रम आणि आणखी 37 औषधांचा अंतर्भाव करावा, असेही या अर्थसंकल्पात प्रस्तावित केले गेले आहे.
आहार आणि पोषण कार्यक्रमांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता इथे क्लिक करावे: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2098449
* * *
S.Bedekar/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2098744)
Visitor Counter : 111
Read this release in:
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam