आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ मेळ्यात आयुषच्या सेवा सुविधा:


1.21 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी घेतले मोफत वैद्यकीय मार्गदर्शन आणि औषधे

मेळ्याला भेट देणाऱ्या विदेशी भाविकांमध्ये आयुष केंद्रांचे आकर्षण

Posted On: 23 JAN 2025 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025

 

प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आरोग्य सुविधांच्या अंतर्गत आयुष बाह्यरुग्ण विभाग, उपचार  केंद्र, विविध दुकाने आणि सत्रे यांसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सुविधा भाविक, यात्रेकरू आणि या मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत. या महासोहळ्याअंतर्गत आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आयुष अभियानाच्या उत्तर प्रदेशातील विभागाच्या सहकार्याने आयुष विषयक अनेक सोयी सुविधांची व्यवस्था केली आहे, या सोयी सुविधांच्या माध्यमातून या मेळ्याला आलेल्या देश - विदेशातील भाविकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आत्तापर्यंत या मेळ्याला भेट दिलेल्या 1.21 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी या आयुष सेवांचा लाभ घेतला आहे.

या महाकुंभात सहभागी झालेल्या आयुषच्या पथकामध्ये 80 डॉक्टरांचा समावेश आहे. हे सगळेजण मेळ्याच्या ठिकाणी स्थापन केलेल्या 20 बाह्यरुग्ण सुविधा केंद्रांच्या माध्यमातून दिवसरात्र वैद्यकीय सेवा देत आहेत. ही सर्व बाह्यरुग्ण सुविधा केंद्र सामान्यपणे उद्भवणाऱ्या आजारांवर तसेच आधीपासून अस्तित्वात असलेल्या अनेक आजारांवर उपचार करण्याच्या दृष्टीने सुसज्ज आहेत. मेळ्याला भेट देत असलेले परदेशी भाविक बाह्यरुग्ण सुविधा केंद्रांसोबतच इतर आयुष सेवांचाही लाभ घेत आहेत. यासोबतच आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील नवी दिल्ली इथल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, संगम परिसर तसेच सेक्टर 8 मधील ठराविक शिबिरांमध्ये दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेत उपचारात्मक योग सत्रांचेही आयोजन केले जात आहे. या सत्रांना आंतरराष्ट्रीय भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या या सहभागातून स्थानिक तसेच जगभरातील लोकांमध्ये आयुष सेवांबद्दलचा वाढता ओढा आणि विश्वासच अधोरेखित होत आहे.

अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांना आयुष वैद्यकपद्धती, औषधी वनस्पती याबाबतीतील प्रगतीविषयची माहिती मिळावी यावरही भर दिला जात आहे. याच उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (NMPB) औषधी वनस्पतींचे अभिनव  प्रदर्शन देखील भरवले असून, या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना या वनस्पतींचे सामान्य फायदे आणि इतर माहिती देण्यासाठी मंडळाने तशा तज्ञांची नेमणूकही केलेली आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या भाविकांना या रोपांच्या लागवडीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक फायद्यांबाबतही माहिती दिली जात आहे, तसेच त्यांना मोफत रोपांचे वाटपही केले जात आहे.

इथे कार्यरत असलेले आयुषचे पथक हे रुग्णांवर उपचार करण्यासोबतच त्यांना औषधी वनस्पतींच्या आर्थिक क्षमतेबद्दलची देखील माहिती देत असल्याचे महाकुंभ मेळ्यातील आयुषच्या या उपक्रमाचे समन्वयक अधिकारी डॉ. अखिलेश सिंह यांनी सांगितले. या रोपांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून, लोकांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना उपजीविकेसाठी अधिकचे साधन मिळवून द्यावे असे यामागचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वयोवृद्धांची सेवा शुश्रृषा आणि मोफत औषध वाटप

या महाकुंभ मेळ्यात आयुष पथकाच्या वतीने रोगप्रतिकारशक्ती वर्धक आणि कॅल्शियमच्या गोळ्यांसह इतर औषधांच्या मोफत वाटपाची व्यवस्था केली गेली आहे. वृद्धांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अंतर्गत, या महाकुंभ मेळ्यात कार्यरत असलेले आयुषचे पथक समर्पण भावनेने वयोवृद्ध भाविकांची सेवा शुश्रृषा करत आहे. आतापर्यंत आयुषच्या या सेवा सुविधांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 45 टक्के लाभार्थी हे वयोवृद्ध भाविक आहेत. आयुषच्या या सेवाअंतर्गत सामान्यपणे उद्भवणारे आजार आणि त्यांचे आयुष उपाय याविषयी माहितीपर पत्रकांचे देखील वाटप केले जात आहे.

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2095652) Visitor Counter : 22