पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025‘ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 17 JAN 2025 2:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, दि. 17 जानेवारी, 2025

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी, जीतन राम मांझी, मनोहर लाल, एच.डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, देश-विदेशातून आलेले ऑटो उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर, इतर पाहुणे मंडळी, महिला आणि सद्गृहस्थ हो!

मागच्यावेळी ज्यावेळी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो, त्यावेळी लोकसभा निवडणुकांना काही फार अवधी राहिलेला नव्हता. त्यावेळी आपल्या सर्वांवर असलेल्या विश्वासामुळे मी म्हटले होते की, पुढच्यावेळीही भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मी जरूर उपस्थित राहीन. देशाने तिस-यांदा आम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केले आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त  करतो.

मित्रांनो,

मला आनंद वाटतो की, यावर्षी भारत मोबिलिटी एक्स्पोची व्याप्ती खूप जास्त वाढली आहे. गेल्यावर्षी 800 पेक्षा जास्त प्रदर्शनकर्त्यांनी भाग घेतला होता. तर दीड लाखांहून अधिक  लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. यंदा भारत मंडपमबरोबरच व्दारका इथल्या यशोभूमी  आणि ग्रेटर-नोएडाच्या इंडिया एक्स्पो केंद्रामध्ये हे प्रदर्शन सुरू आहे. आगामी 5-6 दिवसांमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक इथे येतील. अनेक नवीन गाड्याही इथल्या  प्रदर्शनामध्ये  पहिल्यांदा ‘लॉन्च’  केल्या जाणार आहेत. यावरून भारतामध्ये दळणवळण क्षेत्राच्या भविष्याविषयी किती सकारात्मक वातावरण आहे, हे दिसून येते. इथल्या प्रदर्शनातील काही दालनांना भेट देवून, ती पाहण्याची संधीही मला मिळाली. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग खूप चांगला आहे आणि भविष्यासाठी सुसज्जही आहे. याबद्दल आपणा सर्वांना मी खूप-खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

भारतातील ऑटो क्षेत्रातील इतक्या मोठ्या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये, आज रतन टाटा जी आणि ओसामू सुझुकी जी यांचेही मी स्मरण करतो. भारताच्या ऑटो क्षेत्राच्या वृद्धीमध्ये, मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दोन्ही महान व्यक्तींनी खूप मोठे योगदान दिले आहे. मला विश्वास आहे की, रतन टाटा जी आणि ओसामू सुझुकी जी यांचे कार्य आणि त्यांचा वारसा भारताच्या  संपूर्ण वाहतूक, दळणवळण क्षेत्राला निरंतर प्रेरणा देत राहील.

मित्रांनो,

आजचा भारत आशा-आकांक्षांनी भरलेला आहे. युवकांच्या ऊर्जेने भरलेला आहे. अशाच आकांक्षा आपल्याला भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये दिसून येत आहेत. गेल्या वर्षामध्ये भारताच्या ऑटो उद्योगाने जवळपास 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या मंत्राचा जप करीत वाटचाल करताना, भारत आता निर्यातीमध्येही वाढ नोंदवत आहे.  जगातील अनेक देशांची जितकी लोकसंख्याही नाही, तितक्या गाड्यांची  भारतामध्ये दरवर्षी विक्री होत आहे. देशात  एका वर्षात जवळपास अडीच कोटी गाड्यांची विक्री होत आहे. यावरून भारतामध्ये गाड्यांना असलेली मागणी सातत्याने कशी वाढत आहे, हे समजते. ज्यावेळी मोबिलिटीच्या भविष्याविषयी चर्चा केली जाते, त्यावेळी भारताकडे इतक्या मोठ्या अपेक्षेने का पाहिले जाते, हे लक्षात घेतले पाहिजे.

मित्रांनो,

भारत आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेच्या स्वरूपामध्ये पहायचे झाले तर, आपण जगामध्ये तिस-या क्रमांकावर आहोत. आता आपण कल्पना करा की, ज्यावेळी भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थेमध्ये असेल, त्यावेळी आपली ऑटो बाजारपेठ कुठे असेल? विकसित भारताच्या यात्रेमध्ये मोबिलिटी क्षेत्रातही अभूतपूर्व संक्रमण होवून त्याचा  अनेक पटींनी विस्तार होत आहे. भारतामध्ये मोबिलिटीच्या भविष्याला गती देणारे अनेक घटक आहेत. ज्याप्रमाणे भारताची सर्वात जास्त लोकसंख्या युवा आहे, आणि देशात मध्यमवर्गाचा विस्तार वेगाने होत आहे. तसेच देशात शहरीकरण वेगाने होत आहे. भारतामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. मेक इन इंडियामुळे सर्वांना परवडणारी वाहने उत्पादित केली जात आहेत. अशा सर्व घटकांमुळे भारतामध्ये ऑटो क्षेत्राची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होत असून, या क्षेत्राला नवीन ताकद मिळणार आहे.

मित्रांनो,

ऑटो उद्योगाच्या विकासासाठी गरज आणि आकांक्षा, या दोन्हींची खूप गरज असते. आणि सुदैवाने भारतामध्ये आज या दोन्ही गोष्टी ‘व्हायब्रंट‘ -सळसळत्या  आहेत. आगामी अनेक दशकांपर्यंत भारत दुनियेतील सर्वात युवा देश असणार आहे. यामुळे हा युवावर्गच  तुमचा सर्वात मोठा ग्राहक असणार आहे. इतका मोठा युवा वर्ग, किती प्रचंड मोठी मागणी निर्माण करेल, याचा अंदाज तुम्हा मंडळींना नक्कीच येवू शकेल. तुमचा आणखी एक मोठा ग्राहकवर्ग असणार आहे, तो म्हणजे -मध्यमवर्गीय ! गेल्या 10 वर्षांमध्ये 25 कोटी भारतीय दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत. या  नवीन मध्यमवर्गातील लोक आपले पहिले वाहन घेत आहेत. जसजशी प्रगती होत जाईल, तसतसे हे लोक आपले वाहनही अद्यतन करीत जातील. आणि त्याचा लाभ ऑटो क्षेत्राला मिळणार, हे नक्कीच आहे.

मित्रांनो,

कधी काळी भारतामध्ये गाड्या खरेदी न करण्यामागे  कारण सांगितले जायचे   कीइथे चांगले रस्ते नाहीत, रूंद रस्ते नाहीत.  आता ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. सहज, सुकर प्रवास, आज भारताच्या दृष्टीने मोठी आणि महत्वाची बाब बनली आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी 11 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त तरतूद केली होती. आज भारतामध्ये बहुमार्गिका असलेले महामार्ग, द्रुतगती मार्ग यांचे जाळे तयार केले जात आहे. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार बहुविध संपर्क यंत्रणेला वेग मिळत आहे. यामुळे मालाच्या वाहतुकीचा खर्च कमी हेात आहे. राष्ट्रीय वाहतूक धोरणामुळे भारत जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक वाहतूक प्रणाली मूल्य असणारा देश होणार आहे. या सर्व प्रयत्नांमुळे ऑटो उद्योगाच्या दृष्टीने अनेक शक्यतांसाठी नवीन दारे मुक्त होत आहेत. देशामध्ये गाड्यांना असलेल्या वाढत्या मागणीमागे, हेही एक मोठे कारण आहे.

मित्रांनो,

आज उत्तम पायाभूत सुविधांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाशीही  जोडले जात आहे. फास्टॅगमुळे भारतामध्ये गाडी चालविण्याचा अनुभव खूप उत्तम मिळू लागला आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमुळे भारतामध्ये विनाअडथळा प्रवासाचे प्रयत्न आता अधिक चांगल्या पद्धतीने साध्य होत आहेत. आता आपण स्मार्ट मोबिलिटीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत. सर्व स्तरावर केलेली  वाहनांची असलेली नोंदणी आणि जोडणी, स्वायत्तपणे वाहन चालविण्याच्या दिशेने भारत वेगाने काम करीत आहे.

मित्रांनो,

भारतातील  ऑटो उद्योगामध्ये विकासाच्या अनेक शक्यतांमध्ये ‘मेक इन इंडिया’च्या बळकटीकरणाचीही मोठी भूमिका आहे. मेक इन इंडिया मिशनमुळे पीएलआय योजनेला नवीन गती मिळाली आहे. पीएलआय योजनेमुळे सव्वा दोन लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त विक्री होण्यास मदत झाली आहे. या योजनेमुळेच, या क्षेत्रामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त थेट नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही  आपल्या या ऑटो वाहन क्षेत्रामध्ये तर नवीन नोक-या निर्माण करीत आहातच. त्याचबरोबर या वाहन उद्योगांमुळे  तुम्ही इतर क्षेत्रांमध्येही अनेक पटींमध्ये प्रभाव निर्माण करीत आहात. मोठ्या संख्येने ऑटोमोबाइलच्या सुट्या भागांचा व्यवसाय, आपल्या एमएसएमई क्षेत्रामध्ये सुरू झाले आहेत. ज्यावेळी ऑटो क्षेत्र विस्तारले जाते, त्यावेळी एमएसएमई तसेच लॉजिस्टिक्स, टूर आणि ट्रान्सपोर्ट, अशा सर्व क्षेत्रांमध्येही नवीन नोकरींच्या संधी आपोआपच वाढत आहेत.

मित्रांनो,

वाहन उद्योग क्षेत्राला केंद्र सरकार हरेक पातळीवर प्रोत्साहन देते आहे. गेल्या एका दशकाच्या कालावधीत या उद्योगामध्ये परकीय थेट गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वैश्विक भागीदारीचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. गेल्या चार वर्षात या उद्योगक्षेत्रात, 36 हजार बिलियन डॉलरहून अधिक परकीय थेट गुंतवणूक झाली आहे. येत्या काही वर्षांत ही गुंतवणूक कित्येक पटीने वाढणार आहे. भारतातच वाहन उद्योग निर्मिती निगडीत संपूर्ण परिसंस्था विकसित व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

मित्रांनो,

गतिशीलतेशी निगडीत एका कार्यक्रमात सात सी - कॉमन , कनेक्टेड , कन्व्हिनियंट  , कन्जेशन -फ्री , चार्ज्ड , क्लीन , कटिंग एज  या सी च्या दृष्टीकोनाची चर्चा केली होती, हे मला आठवतंय. आपल्या गतीशीलता उपाययोजना अशा असाव्या ज्या, सर्वसाधारण असतील, संपर्कयुक्त असतील, सुलभ असतील, रहदारीमुक्त असतील, विद्युतभारीत असतील, स्वच्छ आणि प्रगत असाव्यात. हरित गतिशीलतेवर आमचा भर हा याच दृष्टीकोनाचा भाग आहे. आज आमही अशा एका गतिशील व्यवस्थेच्या निर्मिती करण्यात गुंतलो आहोत, जी अर्थव्यवस्था, पर्यावरण दोन्हींना आधार देऊ शकेल. एक अशी व्यवस्था जी जीवाश्म इंधनासाठीच्या आयात देयकात घट करेल . आज हरीत तंत्रज्ञान, इलेक्ट्रीक वाहने, हायड्रोजन इंधन, जैवइंधन सारख्या तंज्ञज्ञानाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत. राष्ट्रीय इलेक्ट्रीक गतीशीलता मोहीम आणि हरित हायड्रोजन मोहिम सारख्या अभियांनांची सुरूवातही याच दृष्टीकोनातून करण्यात आली आहे.

दोस्तहो,

गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रीक गतिशीलतेत भारताचा वेगाने विकास होत असल्याचे पहायला मिळते. गेल्या दशकात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये 640 पट वृद्धी झाली होती, 640 पट. दहा वर्षांपुर्वी जेव्हा एका वर्षात केवळ 2600 इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली होती, तर 2024 मध्ये 16 लाख 80 हजाराहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. म्हणजेच 10 वर्षांपुर्वी एक वर्षात जेवढी इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली जात होती, आज त्याच्या दुप्पट इलेक्ट्रीक वाहनांची फक्त एका दिवसात विक्री होत आहे. या दशकांच्या शेवटापर्यंत भारतात इलेक्ट्रीक वाहनांची संख्येत 8 पट वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. यावरून या क्षेत्रात आपल्यासाठी किती जास्त संधी आहेत हे ही लक्षात येते.

मित्रानो,

देशात इलेक्ट्रीक गतिशीलतेच्या विस्तारासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहे, उद्योगांना पाठिंबा देत आहे. पाच वर्षापुर्वी फेम-2 योजना सुरू केली होती. त्या आंतर्गत 8 हजार कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन रक्कम देण्यात आली होती. या रकमेतून इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठीही अनुदान देण्यात आलं होतं, चार्जिंग इन्फ्रास्टक्चर उभारले गेले. त्यामुळे 16 लाखाहून अधिक इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन मिळाले, त्यात 5 हजारहून अधिक इलेक्ट्रीक बसगाड्यांचा समावेश आहे. दिल्लीत केंद्राकडून दिलेल्या 1200 हून अधिक इलेक्ट्रीक बसगाड्या धावतात. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात पीएम ई-ड्राईव योजना आम्ही आणतो आहोत. त्याअंतर्गत दुचाकी, तीनचाकी, ई रुग्णवाहिका, ई-ट्रक अशी सुमारे 28 लाख इलेक्ट्रीक वाहान खरेदीसाठी मदत दिली जाईल. सुमारे 14 हजार इलेक्ट्रीक बसगाड्याही खरेदी केल्या जातील. देशभरात विविध प्रकारच्या वाहनांसाी 70 हजारहून अधिक वेगवान चार्जर लावले जातील. तिसऱ्या कार्यकाळातत, पीएम ई-बससेवा देखील सुरू केली आहे. त्या अंतर्गत देशातल्या लहान लहान शहरांमध्ये जवळपास 38हजार इ बसगाड्या धावण्यासाठई केंद्र सरकार मदतीचा हात देणार आहे. सरकार, इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीसाठी उद्योगांना सतत पाठिंबा देत आहे. इलेक्ट्रीक कार उत्पादनासाठी जागतिक गुंतवणूकदार भारतात येऊ इच्छितात, त्यासाठीही मार्ग आहेत. भारतात गुणवत्तापूर्ण इलेक्ट्रीक वाहन उत्पादन परिसंस्थेच्या विस्तारात, मूल्य साखळी निर्माणासही मदत मिळेल.

दोस्तहो,

जागतिक पर्यावरण बदलाची, वातावरणाच्या आव्हानांना पेलताना आपल्याला सौर उर्जा, पर्यायी इंधन याचा सातत्याने प्रचार करत रहावे लागणार आहे. भारताने जी-20 गटाच्या बैठकीच्या अध्यक्षपदादरम्यान, हरित भविष्यावर भर दिला होता. आज भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांबरोबरच सौर उर्जेवरही मोठ्या पातळीवर काम सुरू आहे. पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेमधून, घराच्या छतांवर सौर हीटर- रूफटॉप सोलरसंदर्भात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या परिस्थितीत या क्षेत्रातही बॅटरी, साठवणूक व्यवस्थेची मागणी सातत्याने वाढत आहे. सरकारने प्रगत रासायनिक सेल बॅटरी साठवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची पीएलआय योजना सुरू केली आहे. म्हणजेच आपल्याला या क्षेत्रातही मोठ्या गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ आहे. मी देशातील अधिकाधिक युवकांनाही उर्जा साठवणूक क्षेत्रात स्टार्टअपसाठी आमंत्रित करतो. आपल्याला, भारतातच उपलब्ध सामग्रीपासून बॅटरी निर्माण करणे, साठवणूक व्यवस्था निर्माण करू शकतो, अशा नवोन्मेषांवर आपल्याला काम करायचे आहे. या संदर्भात देशात खूप काम होत आहे, परंतु त्याला अग्रक्रमाने पुढे नेण्याची गरज आहे.

दोस्तहो,

केंद्र सरकारचा हेतू आणि वचनबद्धता स्पष्ट आहे. नवीन धोरणे तयार करणे असो किंवा सुधारणा करणे आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. आता आपल्याला ते पुढे न्यायचे आहेत, त्याचा फायदा घ्यायचा आहे. जसे गाड्या भंगारात काढण्याचे धोरण आहे. जे कोणी उत्पादक आहेत, त्या सर्वांना माझा आग्रह आहे की या योजनेचा फायदा घ्यावा. आपल्या कंपनीतही, आपली स्वतःची प्रोत्साहन योजना आणू शकता. त्यामुळे अधिकाधिक लोक आपली जुनी गाडी भंगारात काढण्यासाठी पुढे येतील. ही प्रेरणा खूप गरजेची आहे. देशाच्या पर्यावरणाप्रती आपल्याकडून ही मोठी सेवा असेल. 

मित्रांनो,

वाहन उद्योग, नवोन्मेषावर, तंत्रज्ञानावर आधारीत आहे. नवोन्मेष असो, तंत्रज्ञान असो, कौशल्य असो किंवा मागणी नजीकचा भविष्यकाळ हा पूर्वेचा आहे, आशियाचा आहे, भारताचा आहे. गतिशीलतेमध्ये आपले भविष्य जोखणाऱ्या प्रत्येक क्षेत्रासाठी आणि एक उत्कृष्ट गुंतवणूकदारांसाठीही भारत उत्तम ठिकाण आहे. आपल्या सर्वांनाच मी खात्री देतो, सरकार हर प्रकारे तुमच्यासमवते आहे. आपण मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्डचा मंत्र जपत अशाच प्रकारे पुढे जात रहा. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद

***

JPS/SB/VSS/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2093995) Visitor Counter : 21