गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची आढावा बैठक संपन्न
Posted On:
09 JAN 2025 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे आज पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची आढावा बैठक झाली. केंद्रीय गृहसचिव, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच ब्युरोचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
गृहमंत्र्यांनी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे सहा विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांची (CAPT भोपाळ आणि CDTIs) उपलब्धी, विद्यमान कामे आणि भविष्यातील रुपरेषेचा आढावा घेतला. त्यांनी नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोने केलेल्या प्रयत्नांचा आणि पुढाकारांचाही विशेष आढावा घेतला.
मोडस ऑपरेंडी ब्युरोमध्ये पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो, राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो , तुरुंग अधिकारी आणि न्यायवैद्यक तज्ञांनी गुन्ह्यांच्या मोडस ऑपरेंडीचे विश्लेषण केले पाहिजे, असे या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोने तळागाळातील देखरेखीत येणारी आव्हाने ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवीन फौजदारी कायद्यांचे प्रशिक्षण आणि अंमलबजावणी, सध्याच्या तुरुंग आणि पोलिस प्रक्रिया आणि पद्धतींच्या सुधारणांद्वारे पोलिस दलांचे आधुनिकीकरण तसेच नवीन युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्यूरोच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मंत्रालयाला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी जोडणारी नोडल एजन्सी म्हणून पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. फौजदारी न्याय व्यवस्थेच्या सर्व स्तंभांना त्यांच्या विशिष्ट आवश्यकतांच्या आधारे लक्ष्यित मदतीसाठी ब्युरोच्या कार्यात सुधारणा करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. ब्युरोच्या सुरळीत कामकाजासाठी पाठिंबा आणि मदत करण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091620)
Visitor Counter : 20