सांस्कृतिक मंत्रालय
प्रयागराज मध्ये होणाऱ्या हरित महाकुंभ मेळ्यात पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करून 1,000 पर्यावरणप्रेमींना एकत्र आणले जाणार
महाकुंभासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रयागराज महानगरपालिकेने स्वच्छता रथ यात्रेचे आयोजन केले, पथनाट्य आणि वाद्यवृंदांच्या सादरीकरणाने स्वच्छताविषयक संदेशाचा प्रसार केला
Posted On:
07 JAN 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2025
प्रयागराज मधले महाकुंभ सांस्कृतिक आणि अध्यात्मिकतेसोबतच पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांची सशक्त कथा गुंफत आहे. प्रयागराज मध्ये 31 जानेवारीला हरित कुंभ होणार असून यानिमित्ताने देशभरातील 1,000 पर्यावरणप्रेमी आणि जलसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. हा अनोखा कार्यक्रम ज्ञान महाकुंभ - 2081 मालिकेचा एक भाग असून शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाने तो आयोजित केला आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचे मुख्य संयोजक म्हणून कार्य करत आहेत.
हरित महाकुंभाचा भाग म्हणून निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि स्वच्छता या विषयांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संवाद आयोजित करण्यात आला आहे. निसर्गातील पंचमहाभूतांचे संतुलन राखण्याबाबत तसेच त्यासमोरील आव्हानांविषयी उपस्थित तज्ञांमध्ये विचारमंथन होणार असून ते आपले विचार आणि अनुभव मांडतील. याशिवाय महाकुंभासाठी येणाऱ्या अभ्यागतांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता याविषयी जाणीवजागृती निर्माण करण्याचे विविध मार्ग आणि या प्रयत्नांना चालना देणाऱ्या अभियानांबद्दल देखील विचारविनिमय होणार आहे.
स्वच्छ महाकुंभ प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि या ऐतिहासिक घटनेला यशस्वी करण्यासाठी सरकारी संस्था, जनप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक एकजुटीने कार्य करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रयागराज येथे आज स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रथयात्रा आयोजित करण्यात आली होती, या यात्रेत अनेक समुदाय सहभागी झाले होते.
महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी स्वच्छतेचे महत्व जाणावे या उद्देशाने स्वच्छता रथ यात्रा काढण्यात आली. महाकुंभ नगर मार्ग, शहरातून जात असल्याने, या भव्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो अभ्यागतांनी येथील वातावरण प्रसन्न आणि स्वच्छ ठेवावे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
प्रयागराज स्वच्छ, निरोगी आणि शिस्तबद्ध बनवण्याच्या उद्देशाने काढलेली ‘जन जागरण यात्रा’ असे प्रयागराजचे महापौर उमेशचंद्र गणेश केसरवाणी यांनी या कार्यक्रमाचे वर्णन केले. नागरिकांनी कचरा टाकणे टाळावे, डस्टबिनचा वापर करावा आणि एकेरी प्लास्टिकचा वापर टाळावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकांचा उत्साहपूर्ण पाठिंबा मिळाला आणि अनेकांनी यात सक्रीय सहभाग घेतला.
यावेळी सादर झालेल्या पथनाट्यातील कलाकारांनी विविध रंगांचे कचऱ्याचे डबे घेऊन सादरीकरण केले, यामध्ये ओला आणि सुका असे कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण करण्याचा संदेश देण्यात आला. या संदेशात भर घालत, संपूर्ण यात्रेत वाद्यवृंदाने स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारित संगीत सादर करून महाकुंभ दरम्यान स्वच्छ प्रयागराज राखण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमांत सफाई मित्र (स्वच्छता कर्मचारी) आणि महानगरपालिका कर्मचारी यांनी देखील मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून दिले.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091034)
Visitor Counter : 37