गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे सीबीआय द्वारे विकसित भारतपोल पोर्टलचे केले उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज 'भारतपोल ' चा प्रारंभ करून भारत आंतरराष्ट्रीय तपासात एका नव्या युगात प्रवेश करत आहे

'भारतपोल' आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील

तीन फौजदारी कायद्यांमधील 'ट्रायल इन ॲबसेन्शिया ' या तरतुदीद्वारे, फरार व्यक्तींच्या अनुपस्थितीत खटले चालवून त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते

'भारतपोल' तपास संस्था आणि सर्व राज्यांच्या पोलिसांना 195 देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी जोडून गुन्हेगारी नियंत्रणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल

'भारतपोल' नेटवर्क अंमली पदार्थ , शस्त्रे, मानव तस्करी आणि सीमेपलीकडून होणाऱ्या इतर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी 195 देशांबरोबर सहकार्य करण्यास सक्षम करेल

'भारतपोल' वर इंटरपोलचे 19 प्रकारचे डेटाबेस उपलब्ध असतील, जे गुन्ह्यांचे विश्लेषण,त्यांना प्रतिबंध आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरतील

Posted On: 07 JAN 2025 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचे उद्घाटन केले. अमित शाह यांनी पुरस्कार विजेत्या 35 सीबीआय  अधिकाऱ्यांना पोलीस पदके देखील प्रदान केली, ज्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी गृहमंत्री पदक देऊन गौरवण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहसचिव, सीबीआयचे संचालक, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज 'भारतपोल ' चा प्रारंभ  करून भारत आंतरराष्ट्रीय तपासात एका नव्या युगात प्रवेश करत आहे.  त्यांनी नमूद केले की भारतपोलच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक संस्था  आणि पोलिस दल इंटेरपोलशी वेगाने जोडले जाऊ  शकतील आणि तपासाला गती मिळेल.

अमित शाह म्हणाले की, 2047 मध्ये देश  स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सध्याचा काळ अमृत काल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, देशातील 140 कोटी जनतेनेही हा काळ अमृत काल म्हणून स्वीकारला आहे आणि 2047 पर्यंत भारताला जगातील प्रत्येक क्षेत्रात पहिले स्थान मिळवून देण्याचा सामूहिक संकल्प केला  आहे. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी अनेक टप्पे गाठायचे आहेत आणि 2027 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा पहिला टप्पा असेल असे ते म्हणाले. शाह म्हणाले की,2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचा  संकल्प पूर्ण करण्याचा  कालावधी  हा 'अमृत काल' आहे. ते म्हणाले की, 'अमृत काल' ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक नेतृत्वापासून ते जागतिक नेतृत्वापर्यंतचा भारताचा प्रवास हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कार्यक्रमांच्या कालबद्ध अंमलबजावणीमुळे आकाराला आला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. या मार्गावर भारताने सातत्याने उत्तम प्रगती केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करताना भारताला आपली व्यवस्था आणि यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे, आणि भारतपोल हे त्या दिशेने योग्य वेळी उचललेले पाऊल आहे, यावर शाह यांनी भर दिला.

भारतपोलचे पाच प्रमुख मॉड्यूल म्हणजे कनेक्ट, इंटरपोल सूचना, संदर्भ, प्रसारण आणि संसाधने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आपल्या सर्व संस्थांना सहाय्य करण्यासाठी एक तांत्रिक मंच प्रदान करतात, असे शाह यांनी सांगितले. कनेक्ट च्या माध्यमातून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संस्था इंटरपोलच्या राष्ट्रीय केंद्रीय अन्वेषण (एनसीबी - दिल्ली) चा विस्तार म्हणून कार्य करतील. या प्रणालीमुळे इंटरपोलच्या सूचनांबद्दल आलेल्या विनंतीला जलदरितीने, सुरक्षित आणि संरचित प्रसारण केले जाईल, ज्यामुळे भारतातील आणि जगभरातील गुन्हेगारांना भारतातूनच त्वरीत शोधण्यासाठी वैज्ञानिक यंत्रणा सक्षम होईल. 195 देशांमधील इंटरपोलचे संदर्भ प्राप्त झाल्याने परदेशात तपासासाठी आंतरराष्ट्रीय सहाय्य शोधणे आणि प्रदान करणे अधिक सोपे करेल. या 195 देशांकडून मदतीसाठी आलेल्या विनंत्या आता ब्रॉडकास्ट मॉड्यूलद्वारे त्वरित उपलब्ध होतील, तर संसाधन मॉड्यूल दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि व्यवस्थापन आणि क्षमता-निर्माण उपक्रम सुलभ करेल, असे त्यांनी सांगितले.

या पोर्टलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचवेळी डेटा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया - यामुळे गुन्हेगारी नियंत्रण उपाययोजना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित संस्थांना सुरळीत आणि परिणामकारक संवाद प्रक्रिया सक्षम होईल. हे पोर्टल जागतिक नेटवर्कद्वारे रेड कॉर्नर नोटीस जारी करणे आणि इतर अलर्टसह रीअल-टाइम डेटा सामायिक करण्यासाठी  देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विनंत्यांना जलद  प्रतिसाद देईल. गेली कित्येक वर्षे भारतात गुन्हेगारी करून भारतीय कायद्यांच्या कचाट्यात न सापडता गुन्हेगार परदेशात आश्रय घेत असत. मात्र भारतपोल सारख्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे अशा गुन्हेगारांना न्यायाच्या कक्षेत आणता येईल, असे शाह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन नवीन फौजदारी कायद्यांमध्ये आरोपीच्या गैरहजेरीत खटला चालविण्याची तरतूद केली आहे, ज्यामुळे न्यायालयीन आदेशांद्वारे फरारी गुन्हेगारांवर खटला चालवता येऊ शकतो, तसेच न्याय्य न्यायिक प्रक्रिया सुनिश्चित करता येते. या तरतुदीमुळे  शिक्षा झालेल्या परदेशात असलेल्या भारतीय गुन्हेगारांना भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतपोल पोर्टलच्या प्रभावी क्षमतेमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय संस्थांना कुठेही लपून बसलेल्या फरारी आरोपींना न्यायाच्या कक्षेत आणणे सोपे होईल. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने भारतपोलची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तळागाळापर्यंत  व्यापक स्तरावर त्याविषयी  प्रशिक्षण  देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन शाह यांनी केले. यामुळे न्यायव्यवस्था बळकट होईल, पारदर्शकता वाढेल आणि एकंदर कार्यक्षमता तसेच न्यायाच्या अंमलबजावणीच्या प्रयत्नांची परिणामकारकता वाढेल, असे अमित शाह यांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, मानवी तस्करी आणि सीमापार दहशतवाद यांसारख्या गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यासाठी नवीन प्रणालीच्या परिवर्तनीय क्षमतेवर प्रकाश टाकला. भारतपोल (BHARATPOL) नेटवर्क अशा गुन्ह्यांसंबंधी रीअल-टाइम माहितीची देवाणघेवाण करत 195 देशांतील कायदा अंमलबजावणी संस्थांशी सहकार्य करून राज्य पोलिस दलांना मोठ्या प्रमाणात मदत करेल, अशी माहिती त्यांनी दिली. इंटरपोल नोटिसांबद्दल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि ही प्रणाली संस्थात्मक करणे यावर अमित शाह यांनी भर दिला. यामुळे 19 प्रकारचे इंटरपोल डेटाबेस उपलब्ध होऊन तरुण अधिकाऱ्यांना डेटाचे विश्लेषण करणे, गुन्हेगारी प्रतिबंधक धोरणे विकसित करणे आणि गुन्हेगारांना अधिक प्रभावीपणे पकडणे हे महत्त्वाचे फायदे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांमधील उदयोन्मुख आव्हानांना अधिक गतीने आणि कार्यक्षमतेने तोंड देण्याच्या या प्रणालीच्या क्षमतेवरही त्यांनी भर दिला. तपास प्रक्रिया पुन्हा परिभाषित करण्याची आणि कायद्याची अंमलबजावणी नवीन उंचीवर नेण्याची क्षमता असलेल्या या संपूर्ण उपक्रमाचे क्रांतिकारक असे वर्णन शाह यांनी केले.

नॅशनल सेंट्रल ब्युरो फॉर इंटरपोल इन इंडिया (NCB-नवी दिल्ली) म्हणून, सीबीआय देशभरातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विविध एजन्सींच्या सहकार्याने, गुन्हेगारी प्रकरणांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हा समन्वय केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरांवर विस्तारित आहे आणि इंटरपोल संपर्क अधिकाऱ्याद्वारे (ILOs) व्यवस्थापित केला जातो. हे इंटरपोल संपर्क अधिकारी, विशेषत: पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त किंवा त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये शाखा प्रमुख यांसारखी पदे धारण करणाऱ्या युनिट ऑफिसर्सच्या (UOs) संयोगाने काम करतात. सध्या, सीबीआय, इंटरपोल संपर्क अधिकारी आणि युनिट ऑफिसर्स यांच्यातील संप्रेषण प्रामुख्याने पत्र, ईमेल आणि फॅक्स यासारख्या पारंपारिक पद्धतींद्वारे केले जाते.

S.Patil/ S.Kane/B.Sontakke/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

(Release ID: 2090974) Visitor Counter : 113