आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाबाबत अद्ययावत माहिती.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील श्वसनाच्या आजारांची सद्यस्थिती आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांच्या स्थितीचा घेतला आढावा.
श्वसनाच्या आजाराची देशात साथ नाही; अशी प्रकरणे शोधण्यासाठी मजबूत निगराणी यंत्रणा.
प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता वाढवण्याचा राज्यांना दिला सल्ला.
ILI/SARI निगराणी आणखी बळकट करण्याचा आणि निरंतर पुनरावलोकन करण्याचा राज्यांना दिला सल्ला.
Posted On:
07 JAN 2025 10:26AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रसार माध्यमातील वृत्तानंतर एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाच्या रुग्ण स्थितीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य संशोधन विभागाचे (DHR) सचिव डॉ राजीव बहल, आरोग्य सेवा महासंचालनालयाचे (DGHS) डॉ (प्रा.) अतुल गोयल; राज्यांचे आरोग्य सचिव आणि अधिकारी तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाच्या (IDSP) च्या राज्य निगराणी युनिटचे तज्ञ या बैठकीला उपस्थित होते.
एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाच्या (IDSP) माहितीनुसार देशात कुठेही इन्फ्लुएंझा आणि सारी (ILI/SARI) प्रकरणांमध्ये कसलीही असामान्य वाढ झाल्याचे दिसून येत नाही याचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. याची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सजग निगराणी द्वारे प्राप्त माहितीने देखील पुष्टी केली आहे.
2001 पासून जागतिक स्तरावर उपस्थित असलेल्या एचएमपीव्ही बद्दल जनतेने चिंता बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, यावर केंद्रीय आरोग्य सचिवांनी भर दिला. राज्यांनी इन्फ्लुएंझा आणि सारी (ILI/SARI) आजाराबाबत निगराणी आणखी बळकट करण्याचा आणि स्थितीचे वारंवार पुनरावलोकन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. श्वसन संस्थेच्या आजारांमध्ये हिवाळ्याच्या काळात सर्वसाधारण वाढ दिसून येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. श्वसन संस्थेच्या आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही संभाव्य वाढीला तोंड देण्यासाठी देश सज्ज आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसन संस्थेला संसर्ग करणाऱ्या अनेक विषाणूंपैकी एक आहे. या विषाणूमुळे सर्व वयोगटातील लोकांना विशेषतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात श्वसन संस्था संसर्ग होऊ शकतो. विषाणूचा संसर्ग ही सामान्यतः सौम्य आणि स्वत: ची मर्यादित स्थिती असते आणि बहुतेक रुग्ण कोणत्याही उपचारांशिवाय स्वतःच बरे होतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा (ICMR-VRDL) मध्ये पुरेशा निदान सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
राज्यांनी या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) वाढवण्याचा तसेच
वारंवार साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळणे; रोगाची लक्षणे दिसणाऱ्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे; खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे, यासारख्या सोप्या उपायांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवावी, असा सल्ला देण्यात आला आहे .
***
JPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2090834)
Visitor Counter : 245
Read this release in:
Odia
,
Urdu
,
Gujarati
,
English
,
Hindi
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam