सहकार मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसह नव्याने स्थापन केलेल्या 10,000 बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे उद्घाटन
Posted On:
25 DEC 2024 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसह नव्याने स्थापन झालेल्या 10,000 बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे (MPACS) उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल आणि मुरलीधर मोहोळ, तसेच सहकार मंत्रालयाचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करून अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसह 10,000 नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (MPACS) सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. अटलजींच्या कार्यकाळातच 97 वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली होती, त्यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या सहकार क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या अटलजींच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत, हा टप्पा त्याच वचनपूर्ततेचे मूर्तिमंत प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला.
केंद्रीय सहकार मंत्र्यांनी 10,000 PACS ची नोंदणी प्रक्रिया सोपी करण्यात नाबार्ड, राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ (NDDB) आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (NFDB) ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मान्य केले. सर्व PACS चे संगणकीकरण हा सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतरच्या सर्वात महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
माननीय मंत्र्यांनी, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या 10 सहकारी संस्थांना रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो-एटीएमचे वाटप केले. त्यांनी सांगितले की सुरु असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक प्राथमिक दुग्धशाळा लवकरच मायक्रो-एटीएमने सुसज्ज केली जाईल.
मोदी सरकारने पुढील पाच वर्षांत 2 लाख नवीन PACS स्थापन करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे अशी माहिती देत, हे लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वी साध्य केले जाईल असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्र्यांनी व्यक्त केला. नाबार्डने पहिल्या टप्प्यात 22,750 PACS आणि दुसऱ्या टप्प्यात 47,250 PACS तयार करून या उपक्रमासाठी टप्प्याटप्प्याने आखलेल्या दृष्टिकोनाची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.
त्याचप्रमाणे, NDDB 56,500 नवीन सहकारी संस्थांची स्थापना करेल आणि 46,500 विद्यमान संस्थांना बळकट करेल आणि NFDB 5,500 विद्यमान सहकारी संस्थांना सक्षम करताना 6,000 नवीन मत्स्यपालन सहकारी संस्थांची स्थापना करेल. याव्यतिरिक्त, राज्य सहकारी विभाग 25,000 PACS तयार करून योगदान देतील, अशी माहिती त्यांनी दिली. आजपर्यंत 11,695 नवीन प्राथमिक सहकारी संस्थांची, नवीन प्रारुप उपविधी (न्यू मॉडेल बायलॉज) अंतर्गत नोंदणी करण्यात आली असून, हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे शाह यांनी अधोरेखित केले.
* * *
M.Pange/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087958)
Visitor Counter : 46
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam