पंतप्रधान कार्यालय
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
23 DEC 2024 12:13PM by PIB Mumbai
नमस्कार!
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित इतर मान्यवर आणि माझ्या युवा मित्रहो,
मी काल रात्री उशिरा कुवेतहून परत आलो आहे… तिथे मी भारतीय युवा आणि व्यावसायिकांची भेट घेतली आणि खूप गप्पा मारल्या. आता इथे आल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम देशातील युवा वर्गासोबत आयोजित केला आहे. हा अतिशय सुखद योगायोग आहे. आज देशातील हजारो युवांसाठी,आपणा सर्वांच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आहे. तुमचे कित्येक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. 2024 हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नवीन आनंद देऊन जाते आहे. मी तुम्हा सर्व युवांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
भारतातील युवा वर्गाची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे, ही आमच्या सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आम्ही या दिशेने सातत्याने काम करत आहोत. गेल्या 10 वर्षांपासून सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू आहे. आजही 71 हजारपेक्षा जास्त युवक-युवतींना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. गेल्या दीड वर्षात आमच्या सरकारने सुमारे 10 लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या काळात भारत सरकारमध्ये अशा मिशन मोडमध्ये तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मात्र आज देशातील लाखो युवक-युवतींना सरकारी नोकऱ्याच मिळत आहेत, असं नाही तर या नोकऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने दिल्या जात आहेत. या पारदर्शी परंपरेतून येणारे युवक-युवतीसुद्धा पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे देशसेवा करत आहेत याचा मला आनंद वाटतो.
मित्रहो
कोणत्याही देशाचा विकास हा तेथील युवक-युवतींची मेहनत, क्षमता आणि नेतृत्वातून होत असतो. भारताने 2047 सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे वचन दिले आहे. आमचा या संकल्पावर विश्वास आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करू असा विश्वास आम्हाला वाटतो. भारतातील प्रतिभावान युवक-युवती भारताचे प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी असतात. तुम्ही गेल्या दशकातील धोरणे पहा, मेक इन इंडिया, स्वावलंबी भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडिया, अशा प्रत्येक योजना युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.
भारताने आपल्या अंतराळ क्षेत्रातील धोरणे बदलली, भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रात उत्पादनाला चालना दिली आणि याचा सर्वाधिक फायदा भारतातील युवा वर्गाला झाला. आज भारतातील युवा वर्ग नवीन आत्मविश्वासाने भरलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात ते मुसंडी मारत आहेत. आज आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इको-सिस्टम बनली आहे. आज, जेव्हा एखादा तरुण स्वत:चा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी एक संपूर्ण परिसंस्था मिळते. आज युवा वर्ग जेव्हा खेळात करिअर करण्याचा विचार करतो, तेव्हा तो अपयशी ठरणार नाही, असा आत्मविश्वास त्याच्यात असतो. आज प्रशिक्षणापासून ते क्रीडा स्पर्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर युवा वर्गासाठी आधुनिक व्यवस्था केली जात आहे. आज आपण अनेक क्षेत्रांमध्ये संपूर्ण परिवर्तन पाहत आहोत. आज भारत मोबाईल उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. आज अक्षय ऊर्जेपासून ते सेंद्रिय शेतीपर्यंत, अवकाश क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत, पर्यटनापासून ते आरोग्यापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात देश नवीन उंची गाठत आहे आणि नवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो,
देशाची प्रगती साधण्यासाठी युवा वर्गाच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. ही जबाबदारी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर असते. त्यामुळेच अनेक दशकांपासून देशाला नवीन भारत घडवण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीची गरज भासत होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देशाने आता त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना ओझे वाटत होती, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम-श्री शाळांद्वारे लहानपणापासूनच नवोन्मेषाची मानसिकता आकाराला येत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील युवा, दलित, मागास, आदिवासी समाजातील युवा वर्गासाठी भाषा ही मोठी अडचण ठरत असे. आम्ही मातृभाषेतून अभ्यास आणि परीक्षा असे धोरण तयार केले. आज आमचे सरकार युवा वर्गाला 13 भाषांमध्ये भरती परीक्षा देण्याचा पर्याय देत आहे. सीमावर्ती जिल्ह्यातील युवा वर्गाला अधिक संधी देण्यासाठी आम्ही त्यांचा कोटा वाढवला आहे. सीमाभागातील युवा वर्गाला कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या देण्यासाठी आज विशेष भरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. आजच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी 50 हजारपेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. या सर्व युवांना मी विशेष शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज चौधरी चरण सिंह जी यांची जयंती आहे. चौधरी साहेबांना यावर्षी भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची संधी मिळाली हे आमच्या सरकारचे सद्भाग्य आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. आजचा दिवस आपण शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने मी देशातील सर्व शेतकरी आणि अन्नदाते यांना अभिवादन करतो.
मित्रांनो,
चौधरी साहेब म्हणायचे की भारताच्या ग्रामीण भागाची प्रगती होईल, तेव्हाच भारताची प्रगती होईल. आज आमच्या सरकारची धोरणे आणि निर्णयांमुळे ग्रामीण भारतातही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळाला आहे, त्यांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा सरकारने गोबरधन (शेण) योजने अंतर्गत देशात शेकडो गोबर गॅस प्लांट (शेणापासून ज्वलनशील वायू निर्मिती प्रकल्प) उभारले तेव्हा त्यातून वीजनिर्मिती तर झालीच शिवाय आपल्या हजारो तरुणांना रोजगारही मिळाला. जेव्हा सरकारने देशातील शेकडो कृषी बाजारांना ई-नाम योजनेच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू केले तेव्हाही तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या. जेव्हा सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामुळे शेतकऱ्यांना मदत तर झालीच, सोबत साखर क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या. जेव्हा आम्ही सुमारे 9 हजार शेतकरी उत्पादक संघटना…एफपीओ( फार्मर प्रॉडक्ट ऑर्गनायझेशन) तयार केल्या, तेव्हा यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण करण्यात मदत झाली आणि ग्रामीण भागात रोजगारही निर्माण झाला. आज सरकार अन्न साठवणुकीसाठी हजारो गोदामे बांधण्याची जगातील सर्वात मोठी योजना राबवत आहे. या गोदामांच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. काही दिवसांपूर्वीच सरकारने विमा सखी योजना सुरू केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षणाशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे देखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ड्रोन दीदी अभियान ही मोहीम असो, लखपती दीदी अभियान ही मोहीम असो, बँक सखी योजना असो…या सर्व प्रयत्नांमुळे… या सर्व मोहिमांमुळे.. आपल्या कृषी क्षेत्रात आणि आपल्या ग्रामीण भागात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो
आज इथे हजारो मुलींना देखील नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मुलींनो, तुमचे हे यश इतर महिलांना प्रेरणा देईल. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. गर्भवती महिलांना 26 आठवड्यांची रजा देण्याच्या आमच्या निर्णयामुळे लाखो मुलींची नोकरीची कारकीर्द वाचली आहे, त्यांच्या स्वप्नांचा भंग होणे टळले आहे. महिलांच्या प्रगती आड येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे. स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे, शाळांमध्ये स्वतंत्र (स्वतःची वेगळी) स्वच्छतागृहे नसल्यामुळे अनेक विद्यार्थिनी शाळेला मुकून अभ्यास थांबल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत होत्या. स्वच्छ भारत अभियानाच्या मध्यमातून, आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला. मुलींना त्यांच्या शिक्षणात आर्थिक समस्या येऊ नयेत याची काळजी सुकन्या समृद्धी योजनेने घेतली. आमच्या सरकारने 30 कोटी महिलांची जन धन खाती उघडली, ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळू लागला. महिलांना मुद्रा योजनेअंतर्गत, तारणा विना कर्ज मिळू लागले. महिला संपूर्ण घर सांभाळायच्या, पण घर-मालमत्ता- संपत्ती त्यांच्या नावावर नसायच्या. आज पीएम आवास योजने अंतर्गत उपलब्ध घरांपैकी बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत. पोषण अभियान, सुरक्षित मातृत्व अभियान आणि आयुष्मान भारत या मोहिमांच्या माध्यमातून महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. आपल्या सरकारमुळे महिलांना नारीशक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण मिळाले आहे. आज आपला समाज, आपला देश, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
मित्रांनो
आज ज्या तरुण मित्र- मैत्रिणींना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत, ते एका नव्या प्रकारच्या सरकारी यंत्रणेचा भाग होणार आहेत. सरकारी कार्यालये आणि सरकारी कामाची जुनी प्रतिमा गेल्या 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक कार्यक्षमता- कर्तव्यदक्षता आणि उत्पादकता दिसून येते. शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मन लावून काम करण्याच्या वृत्तीने आणि मेहनतीने हे यश मिळवले आहे. शिकण्याची तळमळ आणि पुढे जाण्याची आस असल्यामुळेच तुम्ही देखील या टप्प्या पर्यंत पोहोचला आहात. तुम्ही भविष्यातही हा दृष्टिकोन असाच कायम ठेवा. iGOT कर्मयोगी या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला शिकत राहण्यासाठी खूप मदत मिळेल. तुमच्यासाठी iGOT मध्ये 1600 हून अधिक विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही विविध विषयांमधील अभ्यासक्रम अतिशय कमी वेळात आणि परिणामकारकतेने पूर्ण करू शकता. तुम्ही तरुण आहात, तुम्ही देशाची ताकद आहात. आणि, असे कोणतेही ध्येय नाही जे आमची तरुणाई साध्य करू शकत नाहीत. तुम्हाला, नव्या उर्जेसह नव्याने सुरुवात करावी लागेल. आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या तरुण-तरुणींचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!
***
SonalT/Madhuri/AshutosS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087545)
Visitor Counter : 32
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada