कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
चौथ्या सुशासन सप्ताहादरम्यान 19 डिसेंबर 2024 रोजी ‘प्रशासन गांव की ओर’ या देशव्यापी मोहीमेचा प्रारंभ होणार
19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्लीसह राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एक आठवडाभर विविध उपक्रम आयोजित केले जाणार
विशेष मोहीम 4 दरम्यान, 23 डिसेंबर 2024 रोजी विविध मंत्रालये, सरकारी विभाग यांनी आचरणात आणण्याच्या सर्वोत्तम कार्यपद्धतीबाबत एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार
विशेष मोहीम 4 चा मूल्यांकन अहवाल, सुशासन निर्देशांक 2023 व केंद्रिय तक्रार निवारण आणि नियंत्रण विभागाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला जाणारप्रशासकीय सुधारणा व नागरिक तक्रार निवारण विभाग ‘केंद्रिय सचिवालयाची वाढती निर्णयक्षमता’ या उपक्रमाच्या यशाची माहिती प्रकाशित करणार तसेच स्वच्छता अभियानाचे संस्थात्मकीकरण व 2 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान प्रलंबितता कमी करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांची माहिती प्रकाशित करणार
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2024 10:46AM by PIB Mumbai
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शासकीय सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान प्रशासन गांव की ओर ही देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार आहे. प्रशासन गांव की ओर ही मोहीम 2 ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात केंद्रिय मंत्रालये, शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमांनी राबवलेल्या विशेष मोहीम 4 चे विकेंद्रित स्वरुप आहे.या अभियाना 700 पेक्षा जास्त जिल्हाधिकारी सहभागी होतील.
अभियानाअंतर्गत प्रशासकीय अधिकारी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालयांना भेट देतील. सरकारी सेवा सुधारणा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण यासाठी केंद्र सरकार तालुकास्तरावर ही देशव्यापी मोहीम तिसऱ्यांदा राबवत आहे. प्रशासन गांव की ओर अभियानामुळे सुशासनाची राष्ट्रीय चळवळ उभी राहील आणि त्यातून भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.सुशासन सप्ताह 2024 ची पूर्वतयारी 11 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत सुरू होईल. सुशासन सप्ताह 2024 उपक्रम सुरू होण्याआधी 11 डिसेंबर 2024 रोजी https://darpgapps.nic.in/GGW24 या पोर्टलचे उद्घाटन होईल.
जिल्हाधिकारी या पोर्टलवरुन सुशासनासाठी केलेल्या उपाययोजनांच्या प्रगतीची माहिती सादर करतील आणि त्यांच्या पूर्वतयारी व अंमलबजावणीदरम्यानच्या ध्वनीचित्रफीतीदेखील सादर करतील.अंमलबजावणीच्या काळात जिल्हाधिकारी खालील बाबींची माहिती सादर करतील आणि 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान त्यावर विचारविनिमय केला जाईल.
1. निकाली काढलेले अर्ज
2. राज्याच्या तक्रार निवारण पोर्टलवरुन दखल घेतली गेलेल्या तक्रारी
3. केंद्रिय तक्रार निवारण आणि नियंत्रण विभागाअंतर्गत दखल घेतली गेलेल्या तक्रारी
4. ऑनलाइन सेवा पुरविण्यासाठी सुरू केलेल्या नव्या सेवांची संख्या
5. सुशासनासाठी योजलेले सर्वोत्तम उपाय
6. तक्रार निवारणात यशस्वी झाल्याचे प्रसंग
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय नवोन्मेष कार्यशाळा घेतली जाईल. या कार्यशाळेत शासकीय संस्थांचे डिजिटल रुपांतरण व नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यासाठी राबवलेल्या नवकल्पनांवर भर देण्यात येईल.
***
H.Akude/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2081859)
आगंतुक पटल : 96