माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 6

भारतीय चित्रपटसृष्टीच्या भवितव्याचे संगोपन हे इफ्फी 2024 चे उद्दिष्ट

#IFFIWood, 24 नोव्‍हेंबर 2024

 

#TheFutureIsNow. 55 वा इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, देशभरातली युवा चित्रपट निर्मात्यांची प्रतिभा, सृजनशीलता आणि उत्कट ध्यास प्रकाशात आणून, भारतीय चित्रपटाच्या  उज्वल भविष्याचा उत्सव साजरा करतो. सिनेमा माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सिनेमॅटिक कला कौशल्य आणि कथाकथनातील सर्वोत्तम कामगिरीचा परिचय करून देण्याचे महत्व ओळखून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC), अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहयोगाने, सिनेमा आणि संवाद माध्यमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या जवळजवळ 350 विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित महोत्सवात आमंत्रित केले आहे.

यंदाच्या यंग फिल्ममेकर प्रोग्राममध्ये ईशान्येकडील राज्यांमधील 67 प्रतिभावान फिल्ममेकर्ससह (चित्रपट निर्माते) भारतभरातील 13 प्रसिद्ध चित्रपट संस्थांमधील 279 नवोदित चित्रपट निर्मात्यांना या महोत्सवाने एकत्र आणले आहे. या सर्व सहभागींना विविध सत्रांमध्ये सिनेमाच्या गतिशील विश्वात मनसोक्त डुंबण्याची अनोखी संधी मिळत आहे:

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचे स्क्रिनिंग: विविध कथाकथन शैलींचे सखोल ज्ञान मिळवून देणारे सध्याचे गाजलेले जागतिक चित्रपट आणि सर्वोत्तम भारतीय चित्रपटांचे खेळ.

मास्टरक्लासेस आणि चर्चा सत्र: जागतिक आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मितीची कला आणि कौशल्य याबद्दल अमूल्य दृष्टीकोन विकसित करणारी सत्रे.

इफिएस्टा सांस्कृतिक कार्यक्रम: उत्सवाची सांस्कृतिक समृद्धता आणि कलात्मक अविष्कार याचा अनुभव.

फिल्म बझार: विद्यार्थ्यांचा फिल्म बझार मध्ये फेरफटका आणि फिल्म बझारच्या प्रत्येक पैलूची ओळख.

कथाकथनकारांच्या पुढील पिढीचे संवर्धन करून, भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्याला आकार देण्यासाठी त्यांना साधने आणि प्रेरणा देऊन सुसज्ज करण्याप्रति असलेली इफ्फीची वचनबद्धता या कार्यक्रमातून प्रतिबिंबित होते. या उपक्रमाद्वारे, तरुण चित्रपट निर्मात्यांना केवळ जागतिक सिनेमॅटिक उत्कृष्टतेची ओळख करून दिली जात नाही, तर त्यांना त्यांचा स्वतःचा आगळा  अविष्कार आणि दृष्टीकोन जगासमोर मांडण्याचे प्रोत्साहन दिले जाते.

या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेचा उत्सव साजरा करताना, आपल्याला भारतीय चित्रपटांच्या सीमा नव्याने परिभाषित करण्याच्या त्यांच्या क्षमतांची देखील जाणीव करून दिली जाते. त्यांचा नवोन्मेश आणि उत्कट अविष्कार चित्रपट उद्योगावर दीर्घकालीन प्रभाव पाडेल, हे नक्कीच!

55 वा इफ्फी (IFFI) महोत्सव, संस्कृती आणि प्रेरणादायी कथांना जोडणाऱ्या सिनेमॅटिक  उत्कृष्टतेसाठी, दीपस्तंभ म्हणून आपली भूमिका बजावत आहे. हे युवा चित्रपट निर्माते त्यांच्या सृजनशील प्रवासाला सुरुवात करत असताना, इफ्फी (IFFI) 2024 मधील अनुभव त्यांना चित्रपटसृष्टीतील उज्जवल भविष्याच्या दिशेने घेऊन जाणारा महत्वाचा टप्पा ठरेल.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076664) Visitor Counter : 10