माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

गोवा इथे सुरू असलेल्या ‘इफ्फी’ मध्‍ये ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ च्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन


तरुण आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सिनेनिर्मितीची गूढगर्भ प्रक्रिया अधिक स्पष्‍ट करणे महत्त्वाचे : प्रसून जोशी

‘सीएमओटी’ मुळे युवा निर्मात्यांना कौशल्ये दाखवण्याची आणि विविध क्षेत्रात सहयोग करण्याची अनोखी संधी : संजय जाजू

#IFFIWood, 21 नोव्‍हेंबर 2024

 

55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ (सीएमओटी) च्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. अनोख्‍या कल्‍पना प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी नवनिर्मितीच्‍या क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा चित्रपट निर्मात्यांच्या पुढच्या पिढीचे पालनपोषण आणि सक्षमीकरणाच्या दिशेने भारताच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून  ‘सीएमओटी’ हा मंच ओळखला  जातो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्‍वातंत्र्याच्‍या  अमृत महोत्सवाअंतर्गत सुरू केलेला सीएमओटी  उपक्रम, प्रसार माध्‍यम  आणि मनोरंजन उद्योगातील उदयोन्मुख प्रतिभेसाठी देशातील एक प्रमुख व्यासपीठ म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत असल्याने वेगळी ओळख निर्माण करीत  आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी उद्घाटनपर भाषणात,  सीएमओटीच्या विस्तारित कार्यक्षेत्रावर प्रकाश टाकला, यामध्‍ये  13 चित्रपट निर्मिती कलाकृतींमधून 100 आशादायक तरुण प्रतिभावंताच्‍या कलाकृती  निवडण्‍यात आल्या आहेत.  गेल्या वर्षी 10 विषयांमध्ये 75 जण सहभागी होते. "यावर्षी, ‘सीएमओटी’च्या माध्‍यमातून  तरुण निर्मात्यांना त्यांची कौशल्ये दाखवण्याची आणि विविध क्षेत्रात सहयोग करण्याची एक अनोखी संधी देत आहे. ही गोष्‍ट फिल्म बाजाराच्या दिशेने एक पाऊल टाकणारी आहे. त्‍यामुळे  जागतिक सहयोग आणि वाढीसाठी नवीन दालने  उघडतील," असे  यावेळी जाजू म्हणाले.

फेब्रुवारी 2025  मध्ये होणाऱ्या आगामी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) बद्दलही त्यांनी यावेळी माहिती दिली. ‘वेव्‍हज्’ चा उद्देश जागतिक प्रसार माध्‍यमाच्‍या  क्षेत्रामध्ये भारताचे स्थान मजबूत करणे आहे. ‘’ तुम्हा सर्वांना  क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1 (सीआयसी) मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.  या आव्‍हानात्‍मक  पहिल्‍या ‘सीझन’ चा उपयोग  आंतरराष्ट्रीय  स्‍तरावर पोहोचण्‍यासाठी एक पायरी (लॉंचपॅड) म्हणून तुम्‍हाला करता येईल", असे यावेळी जाजू म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर यांनी सीएमओटी ज्‍या पद्धतीने वि‍शिष्‍ट गतीने वृध्दिंगत होत आहे, त्‍याविषयी  अभिमान व्यक्त केला. "गेल्या चार वर्षांमध्ये, सीएमओटीचे रूपांतर  तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी व्यासपीठात  झाले आहे. यावर्षी, आम्हाला 13 वेगवेगळ्या कलाकृतींचा प्रचार करण्यात अभिमान वाटतो.  या कलाकृतींमध्‍ये कार्यक्रमाच्या विस्ताराचे आणि सर्जनशील करिअरसाठी भारतातील तरुणांमधील वाढत्या उत्साहाचे प्रतिबिंब दिसून येत आहे," असेही त्या  म्हणाल्या.  देशातील आर्थिक वाढ आणि सर्जनशील नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत, त्‍यांनी सीएमओटीच्‍या वाढीचे कौतुक केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माजी सचिव अपूर्व चंद्रा यांनी 48 तासांच्या फिल्म मेकिंग आव्‍हानाचे महत्त्व सांगितले  आणि  हेच ‘सीएमओटी’चे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

नेटफ्लिक्सच्या सार्वजनिक धोरण संचालक महिमा कौल यांनी 'क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो' उपक्रमाला त्याच्या उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन आणि एक स्ट्रीमिंग जायंट म्हणून स्वतः ची बांधिलकी या दोन्ही बाबींच्यां  समन्वयासाठी  नेटफ्लिक्सचा पाठींबा दिला असल्याचे सांगितले. "व्हॉईसबॉक्स उपक्रमांतर्गत भारतभरातील व्हॉईस-ओव्हर कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारोला सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या. आमच्या सहभागींपैकी 50% पेक्षा जास्त महिला आहेत, जे विविध गटांना सशक्त बनवण्याचे आमचे ध्येय प्रतिबिंबित करतात, असे त्या म्हणाल्या. याशिवाय, क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो मधील उत्कृष्ट कलाकार ‘आझादी की अमृत कहानीयां’ या नेटफ्लिक्सच्या विशेष कार्यक्रमात योगदान देतील.  या विशेष कार्यक्रमात  स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित कथा प्रेक्षकांसमोर मांडल्या जाणार आहेत.”, हे देखील महिमा  कौल यांनी स्पष्ट केले.

प्रसिद्ध गीतकार तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे अध्यक्ष, प्रसून जोशी यांनी आपल्या  अभ्यासपूर्ण भाषणात, संपूर्ण भारतातील सर्जनशील प्रतिभेचे संवर्धन करण्याचे महत्व उजागर केले. "आपल्या देशात कथा आणि कलागुणांची कमतरता नाही; आपल्याला या सर्जनशील प्रक्रियेचा उलगडा करून या आवाजांना  व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जर आपण कथाकथन फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित ठेवले तर, आपल्या देशाच्या अतुलनीय विविधतेला आपण नक्कीच मुकणार.  क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो हा उपक्रम भारताच्या कानाकोपऱ्यातील निर्मात्यांना एक व्यासपीठ प्रदान करुन ही दरी भरून काढण्यासाठी मदत करतो,” असे जोशी यांनी सांगितले.

शॉर्ट्स इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्टर पिल्चर यांनी भारतीय चित्रपटांच्या आशादायक भविष्यावर भर दिला. "क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो उपक्रमातील सहभागी हजारो अर्जदारांमधून निवडले गेले आहेत, आणि पुढील 48 तास या सहभागींना सहयोग, नाविन्यपूर्ण आणि अविश्वसनीय चित्रपट तयार करण्यास प्रवृत्त करतील, असे पिल्चर यांनी सांगितले. हा उपक्रम भारतातील तरुणांच्या सर्जनशील क्षमतेचा पुरावा आहे," असे पिल्चर म्हणाले,  पिक्चर यांनी रोमांचक आव्हान स्वीकारण्यास तयार असणाऱ्या पाच संघांची घोषणा केली.

या उपक्रमाच्या मागील आवृत्त्यांच्या यशाची आठवण म्हणून, मागील वर्षांतील पाच क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो चॅम्पियन्सना उद्योगातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.  हे माजी विजेते 48 तासांच्या चित्रपट निर्मिती आव्हानादरम्यान सहभागींच्या वर्तमान तुकडीचे मार्गदर्शन करतील, तसेच निर्मात्यांच्या नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपली मौल्यवान अंतर्दृष्टी आणि अनुभव सामायिक करतील.

क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) बाबत अधिक माहिती :

क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी) उपक्रम हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे, जो भारतातील सर्वात प्रतिभावान तरुण चित्रपट निर्मात्यांना शोधून, त्यांच्या गुणांचे संवर्धन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आरेखित करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स आणि पर्ल अकादमी सारख्या नामांकित उद्योग श्रेष्ठींच्या पाठिंब्याने, भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर भरभराटीस येऊ शकेल असे भविष्य निर्माण करणे हेच क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टूमारो चे उद्दिष्ट आहे.  

अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2073892

 

* * *


PIB IFFI CAST AND CREW | Chippalkatti/Suvarna/Shraddha/Darshana | IFFI 55

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

iffi reel

(Release ID: 2075624) Visitor Counter : 16